नात्याची नवी पालवी भाग-७

अपूर्ण राहिलेल्या संसाराला दुसऱ्या संधीने दोन जीवांच्या नात्याला फुटलेली पालवी!
नात्याची नवी पालवी भाग - ७

सकाळी उजाडल्यानंतर तिकडे प्रवाशांनी रेल्वेचालकाला शोधून काढले आणि त्याला बांधलेले सोडून पुन्हा रेल्वे चालू करण्यास सांगितली.

ह्या प्रकाराने सर्वच घाबरले होते. चालकाने थकलेला असूनही आधी तिथून रेल्वे बाहेर काढून एका स्थानकावर जावून ह्याची माहिती दिली व पुढे जाण्याचे ठिकाण गाठले.

सगळीकडे ह्याची बातमी पसरली होती. ही बातमी सर्व बातम्यांची मुख्य बातमी म्हणून सगळीकडे दाखवू लागले. जे त्यांचे नातेवाईक होते त्यांनी रेल्वे स्थानके गाठली. आपली लोकं सुखरूप पाहून काही लोकं खूश तर जे बेपत्ता होते त्यांच्या काळजीने त्यांचे घरचे आणि प्रशासनही खडबडून जागे झाले.

"आम्ही लवकरात लवकर ह्या प्रकरणाचा शोध लावू तसेच बेपत्ता झालेली माणसे त्यांनाही शोधून काढू. फक्त आम्हाला त्यासाठी थोडा वेळ द्या आणि संयम पाळा." असे रेल्वेमंत्र्यांनी सांगून थोडा तरी दिलासा त्या नातेवाईकांना दिला.

"ह्या शरूचा फोन कालपासून लागत नाहीये. सोबत ती छोटी पोरगी पण आहे. कसे होणार?" शरण्याची आई चिंता दर्शवत म्हणाली.

"काय ओ, तुमची मुलगी ह्या गाडीत बसली होती का?" तिच्या सासूचा फोन तिच्या आईला आलेला.

" हो. ह्याच गाडीने ती येणार होती. तिचा फोन लागत नाहीये. आम्हीही खूप वेळ झाला, तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय पण तिचा फोन बंद येतोय. " तिची आई दबकतच म्हणाली.

"तुमच्या मुलीने काय जीवाला घोर लावला आहे. काही समजले तर आम्हाला कळवण्याचे कष्ट घ्या." असे बोलून तिच्या सासूने फोन ठेवला.

आपली मुलगी एका दिवसातच लगेच सासरी का निघाली ह्याचे कारण तिच्या सासूबाईंच्या बोलण्यावरून आता त्यांना समजले होते.

गावात आता पाऊस थांबला होता. शरण्याचा तापही उतरला होता पण अंगात कणकण ही होतीच. अभयने जास्त वेळ थांबून इथल्या लोकांना त्रास देणे उचित वाटणार नाही म्हणून सर्वांना एकत्र जमा होण्याचा इशारा केला.

तेवढ्यातच काही गाड्यांचा आवाज त्यांच्याजवळ आला आणि त्यांना समजले की हे सर्व पोलीस आहेत. पुढे येऊन त्यांनी सर्व माहिती घेतली व त्यांना पुन्हा त्यांच्या घरी सुखरूप पाठवले जाईल असे सांगण्यात आले.

सर्व प्रवाशांनी गावकऱ्यांचे आभार मानले आणि अभयने गावात ज्या सुविधा नाहीत त्या देण्याचे सरकारकडे रीतसर अर्ज करेन असे वचन दिले. त्याने तिथे राहून सरकारी डॉक्टर नसणे आणि गावात मोबाईल असून त्याला रेंज नसल्याचे आणि वीजपुरवठा सारखा खंडीत होतो ह्या समस्यांचे निरीक्षण केले होते. म्हणून जे काही पुढारी लोकं तिथे श्रेय लाटायला आले होते त्यांच्याकडून मीडियासमोर त्याने सारे वदवून घेतले.

"बेपत्ता झालेले लोकं बहात्तर तासाच्या आत सरकारने शोधून काढले."अशी बातमी सगळीकडे वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. मीडियाने गावकऱ्यांचे, सरपंच आणि प्रमुखांचे तसेच ह्या बेपत्ता लोकांचे पटापट फोटो काढले आणि वर्तमानपत्रात उद्या बातमी येईपर्यंत त्याआधीच सर्वत्र सामाजिक माध्यमांद्वारे पसरवून टाकली.

ते गाव अजूनही दुर्लक्षित होते आणि शहरापासून दूर होते. सर्वांना आपल्या घरी पोहोचायला रात्र झाली होती.

अभयला श्रावणीला, शरण्याकडे सुपूर्त करताना आपल्या जवळचे काहीतरी खूप मौल्यवान देतोय असे वाटत होते.

"तुमचे खूप आभार. आम्हाला ह्यातून बाहेर काढले." घरी जाताना शरण्या त्याला हसून आणि डोळ्यांत कृतार्थ भाव आणून म्हणाली.

सगळ्यांत शेवटी अभय जाणार होता म्हणून श्रावणीला सोडतांना पाहून त्याचे मन भरून आले होते.

"कधी काही गरज लागली तर सांगा. हा माझा मोबाईल नंबर आहे."

त्याने मघाशी एका हवालदारकडून एक कागदाचा तुकडा आणि पेन घेऊन नाव आणि नंबर लिहून तिच्या हातात दिला.

तिने मानेनेच होकार दिला. तो मागे फिरून पुढे चालायला लागला.

"थांब. तू जिथे आहे तिथेच थांब." एक मोठा आवाज आला.

"काय झालं आई?" शरण्या घाबरतच आपल्या सासूला पाहून म्हणाली.

"कोण होता तो?" त्यांनी विचारले.

तो आवाज ऐकून अभय पण मागे वळून पाहू लागला.

"त्यांनी आम्हाला मदत केली. आम्ही दरोडेखोरांपासून त्यांच्यामुळेच वाचलो." ती सासूला सांगत होती.

"दोन-तीन दिवस तू बाहेर होतीस. ते पण ह्या परपुरुषासोबत आणि हे बघ सगळीकडे तुमचे फोटो गेलेत त्यात तुझे आणि ह्या मुलीचे नाव शरण्या आणि श्रावणी सरंजामे असे लिहिले आहे. काय समजायचे आम्ही?" त्यांच्या आवाजात रागाची तीव्रता जास्त होती.

"काकू, तुमचा काही तरी गैरसमज होतोय. तशी परिस्थितीच उद्भवली होती म्हणून तसे आम्हाला खोटे सांगावे लागले. मी तुमच्या मुलाला वाटल्यास समजावतो." अभय त्यांच्याजवळ जात म्हणाला.

"माझा मुलगा तर तुला भेटणार नाही कारण ही विधवा आहे आणि हिने कोणा दुसऱ्याच्या नावाचे मंगळसूत्र घातले आहे.
तुला गं, खरे सांगायला लाज वाटत होती का ? की तुलाच ते आवडत होते? " सासू तोंडाला येईल ते बोलत होती.

'विधवा' शब्द ऐकल्यावर तो जागीच थिजला कारण खोटे असले तरी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून त्याने चूक केलीच होती. त्यात तिची नकार देणारी नजर आणि बायको म्हंटल्यावर उदासीन चेहरा पाहून आता त्याचा अर्थ त्याला समजत होता.

"आम्ही जीव वाचवण्यासाठी हे नाटक केले. कृपया आम्हाला माफ करा. त्या जशा आधी होत्या तशाच अजूनही आहेत. दरोडेखोर आणि गावकरी लोकं ह्यांना त्या एकट्या आहेत असे समजले असते तर त्यांना त्रास दिला असता. म्हणून मीच त्यांना माझी बायको आहे, असे सांगितले." तो तिला अजून काही ऐकावे लागू नये म्हणून म्हणाला.

"मला काही ऐकायचे नाही. तुला ह्या घरात आता स्थान नाही.
तू इथून निघून जा. दोन- तीन दिवस तू बाहेर होतीस, तू काय केले आम्ही होतो का पाहायला ? असली बाई मला ह्या घरात नको. आमचा मुलगा गेला आणि आता तुझे असे हे वागणे पाहून मला तुला घरात घेवून समाजात माझी अब्रू चव्हाट्यावर आणायची नाहीये. " तिची सासू तणतणतच म्हणाली.

"असे करू नका. मी कुठे जाणार? एकदा श्रावणीकडे तर पाहा, तिच्या बाबांचे हे घर आहे. माझी काही चूक झाली असेल तर मला माफ करा." रडतच शरण्या बोलत होती.

"असेही आम्हाला मुलगा हवा होता तर तू ही मुलगी दिलीस त्यानंतर आमचा मुलगा गेला आता त्यासोबत तुम्हीही दोघी आमच्यासाठी मेल्याच आहात." असे म्हणून त्यांनी दरवाजा बंद केला.

सासरे बाहेरगावी गेल्याने तिथे नव्हते.

सासूने दरवाजा बंद केला तरी ती जोरजोरात ओरडत " सासूबाई दार उघडा. मी कुठे जाऊ?" असे म्हणत रडत दरवाजा ठोठावत होती.

आजूबाजूचे फक्त तमाशा पाहत होते. दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात बोलणे त्यांना बरोबर वाटतं नव्हते. म्हणून हळू आवाजात त्यांची कुजबुज चालूच होती.

"मला माफ करा,माझ्यामुळे हे सर्व झाले." अभयला वाईट वाटत होते.

खूप वेळ झाले तरी त्या दरवाजा उघडत नव्हत्या आणि भुकेने व्याकूळ झालेली श्रावणी तिथे काय चालले आहे ह्याने अनभिज्ञ असल्याने रडत होती.

त्याने पुढे जावून श्रावणीला उचलले आणि पुढे होत म्हणाला, "चला इथून."

ती "कुठे?"

तो "माझ्या घरी."

"नको, अजून तमाशा मला पाहायचा नाही. झाली ती मदत खूप झाली." ती श्रावणीला स्वतःकडे घेत होती तर ती येत नव्हती.

तिने वैतागून मारण्यासाठी हात वरती उगारला तर हवेतच त्याने तो पकडला आणि म्हणाला, " मी तुमची परिस्थिती समजू शकतो पण ह्या निरागस मुलीचा काय दोष ह्यात? पुन्हा माझ्या चिऊला कधी मारू नका."

तिचा हात सोडला आणि माझी चिऊ हा शब्द तिच्या कानात गुंजत होता.

"चिऊ चल आपण जाऊ, आईला इथेच बाहेर बसू दे." श्रावणीला हृदयाशी कवटाळून तो पुढे चालू लागला.

अभयचा निर्णय योग्य होता का?

क्रमशः


🎭 Series Post

View all