नात्याची नवी पालवी भाग-१०

अपूर्ण राहिलेल्या संसाराला दुसऱ्या संधीने दोन जीवांच्या नात्याला फुटलेली पालवी!
नात्याची नवी पालवी भाग-१०

श्रावणीला दुसऱ्यादिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. तिने एक मिनिटही अभयला स्वतःपासून दूर केले नव्हते.

अभय, शरण्या, श्रावणी आणि तिचे सासरे शरण्याच्या फ्लॅटमध्ये गेले.

अभय श्रावणीसोबत गप्पा मारत असताना तिचे सासरे तिला घेऊन बाल्कनीमध्ये गेले.

"तुम्हाला काही बोलायचे होते का?" शरण्या त्यांच्या गंभीर मुद्रेकडे पाहून विचारत होती.

"मला जरा तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे होते. आधी शांतपणे ऐकून घे. मग विचार कर." ते म्हणाले.

डॉक्टरांनी अभयबद्दल श्रावणीच्या मनातील इच्छा आणि कसे तिच्या आरोग्यावर त्याचा आता झालेला परिणाम हे सारे त्यांनी तिला सांगितले.

"तुमचे काय मत आहे? मी काय करावे पुढे?" तिला थोडी कल्पना आली होतीच तरीही स्पष्टपणे तिने विचारले.

"तू अभयशी लग्न करावे,असे मला वाटते. त्याच्या बायकोचा आणि त्याचा घटस्फोट झाला आहे. माझा मुलगा या जगात नाही. तुला वाचवण्यासाठी जरी त्याने तुला त्याची खोटी पत्नी म्हंटले तरी तुझी आणि आपल्या श्रावणीची काळजी तो नीट घेत आहे." तिचे सासरे सांगत होते.

"श्रावणीसाठी मी समजू शकते की तिला वडिलांचे प्रेम मिळावे पण मला पुन्हा लग्न करून त्यांना नवऱ्याचा मान देता येईल का? हे तडजोडीचे नाते जरी म्हंटले तरी पत्नी म्हणून त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकेन का?"

पुनर्विवाह म्हणजे पुन्हा लग्न करणे. तेही अभय आणि शरण्याच्या बाबतीत असे दुसऱ्या व्यक्तीसोबत गठबंधन. सोपे असते का तर नाही. आपल्या ज्या भावना आणि विचार आपण आधीच एका व्यक्तीसाठी समर्पित केलेल्या असतात त्याच पुन्हा नव्याने दुसऱ्या व्यक्तीसोबत नाते जोडताना करणे अशक्य असते का ? तर नाही पण कठीण मात्र असते. त्यात पहिलेपणाची ओढ आणि नाविन्यता असेलच असे नाही. तडजोडीचे नाते हे आधीपासूनच त्यात तडजोड जास्त आणि कमी प्रेमाच्या अपेक्षा असलेले असेच असते. विधवा झालेली स्त्री तिच्या नवऱ्यामुळे त्याचे मरणाचे दुःख पचवत आपल्या शारीरिक आणि मानसिक भावनांना त्याच्या चितेसोबतच तिलांजली देते.

विधवा स्त्री सुवासिनी सोबतच नंतर पतीचे निधन हे दोन्ही अनुभवते. मध्येच सुखाची ओंजळ भरलेली असतानाच ती रिकामी व्हावी अशी परिस्थिती येताना पुन्हा ती भरावी ह्याची ती आशा सोडून देते.

भारतात पुनर्विवाह कायद्याला संमती देवून खूप वर्ष झाली. तरीही विधवेचा असो की घटस्फोटित स्त्रीचा दुसऱ्या विवाहाचा विषय आजही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतो. कारण पहिले मुलांचे वय जास्त असायचे आणि मुलीचे कमी. त्यातून शिक्षित लोक असेल तर ठीक नाहीतर मुलाच्या घरच्या पसंतीनेच मुलींचे विवाह व्हायचे.

आता काळ बदलला त्यात नात्यात भावनिक गुंतणे आले. दोघांमध्ये समन्वय आहे का ? एकमेकांस अनुरूप आहेत का? विचार करण्याची पध्दत किंवा स्वभाव हे सारे लग्न करतांना प्रथम पाहिले जाते.

दुःख सहन करणाऱ्या माणसाला सुखाची आस असली तरी ते प्रत्यक्षात समोर असेल तरी शंका येते कारण त्या माणसाला दुःख एवढे अंगवळणी पडलेले असते की समोर आलेल्या सुखावर त्याची नजर जात नाही.

"मला सांग अभयमध्ये काही कमी आहे का? तो घटस्फोटित आहे म्हणून की अजून काही कारण?" त्यांनी विचारले.

"खरे तर त्यांच्यात कमी नाही, पण त्यांच्या काही अपेक्षा असतील ना. त्यांच्या आईने सांगितले होते की त्यांना मुलांची आवड आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना न विचारता गर्भपात केला. उद्या पुढे जाऊन आमचे लग्न झाले. त्यांना स्वतःच्या बाळाची इच्छा झाली आणि श्रावणीला सावत्रपणा.." ती मध्येच थांबली.

"आपण बोलून पाहू ना. मी तुला विचारण्या आधी त्या दोघांना विचारले होते."

हे ऐकून तिने विस्फारलेल्या डोळ्यांनी त्यांना विचारले, " मग काय बोलले ते ?"

"त्यांनी नकारच दिला तरीही सर्वात आधी तुला विचारावे असे त्यांनी सांगितले मग पुढे बोलू." सासरे म्हणाले.

त्यावेळीही त्याने आपल्या निर्णयाचा विचार केला ह्याने ती सुखावून गेली.

दोन-तीन दिवस असेच गेले. अभय सकाळी श्रावणीला भेटायला यायचा नंतर आपले काम आवरून रात्री ती झोपेपर्यंत तो फ्लॅटवर थांबून त्याच्या घरी झोपायला जायचा.

शरण्या सर्व पाहत होती. तिला लग्नाचा विचार करायला वेळ दिला होता.

एकदा अभय सकाळी आलेला तेव्हा श्रावणी झोपली होती. शरण्याने त्याला चहा दिला. तो पित असताना तिने विषय काढला.

"बाबांनी तुम्हाला आपल्या लग्नाबद्दल विचारले होते. त्याबद्दल बोलायचे होते." ती हिंमत करून बोलली.

"हो. मी त्यांना नकार दिला तसेच तुमचाही नकार असेल हेच मला वाटले." तो चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाला.

ती अचानकच "माझा होकार असेल तर?"

त्याला पण थोडा धक्काच बसला कारण तिच्या स्वभावानुसार तिने स्वतःहून हा विषय काढणे अनपेक्षित होते.

"तुम्हाला काय वाटते ते बोला." तो म्हणाला.

"मला माहीत आहे, तुमच्याही तुमच्या बायकोकडून काही अपेक्षा असतील. आपले दोघांचे संमतीने झाले तर हे दुसरे लग्न असेल. पहिल्या जोडीदाराच्या आठवणी आपल्याजवळ असणारच पण सध्या मला श्रावणीला प्राधान्य द्यायचे आहे. डॉक्टर म्हणतात तसे तिला तिच्या वडिलांचे प्रेम तुम्ही द्याल ह्यात वादच नाही परंतु पुढे जर दुसऱ्या अपत्याची इच्छा तुम्हाला झाली आणि देव न करो श्रावणीला सावत्रपणाची जाणीव.. " पुढे तिचे शब्दच बाहेर पडले नाहीत.

"एक आई म्हणून मी तुमची चिंता आणि काळजी समजू शकतो. खरे तर मी खोटे बोलणार नाही पण श्रावणीला मी माझ्या मुलीसमानच मानतो. तुम्ही इथे राहायला आलात तेव्हा मला अनामिक भीती होती. असे वाटत होते की, माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून दूर झाला. काकांना मी नकार ह्यासाठी दिला होता, कारण तुमचे मत इथे सर्वात आधी महत्त्वाचे आहे. तडजोड ही जीवनात करावीच लागते. आपल्या दोघांचे आधीचे लग्न हे आईवडिलांच्या पसंतीनेच झाले होते. मलाही समजून घेणारी आणि माझ्या आईला ओझे न समजता आपल्याच घरातील मोठी व्यक्ती म्हणून मान देणारी सहचारिणी हवी होती. मला थोडा वेळ द्या आणि पुढे आपले लग्न झालेच तर श्रावणीला मी तिचा सावत्र बाबा आहे हे कधीच जाणवून देणार नाही हे मी वचन देतो." असे बोलून तो श्रावणीकडे गेला.

एका रात्री त्याच्या आईने, शरण्या आणि तिच्या सासऱ्यांना श्रावणीसह जेवायला बोलावले होते.

श्रावणी तर घरात स्वतःचे घर असल्यासारखी पळत होती. तिच्या हसण्याचा खळखळाट पाहून सर्वांना समाधान वाटत होते.

लहान मुलांना ना आजची चिंता असते ना उद्याची त्यामुळे ते प्रत्येक क्षण खेळण्यात आणि आनंदात घालवत असतात. त्यांच्या हास्याने घरात चैतन्य पसरते. त्यांचा निरागसपणा बघून कपटी ही माणसेच असतात आणि निर्मळ देवाघरची फुले ही लहान मुलेच असतात हे समजते.

पूर्ण एक आठवडा वेळ घेवून अभयने खूप विचार केला.

"मी लग्न करण्यास तयार आहे." अभय म्हणाला.

ते ऐकून त्याच्या आईने आणि तिच्या सासऱ्यांनी मनोमन देवाचे आभार मानले.

"पण मला तरीही काही गोष्टी स्पष्ट व्हाव्यात म्हणून शरण्या आणि श्रावणीशी एकांतात बोलायचे आहे." तो गंभीर चेहरा करून म्हणाला.

अभयला त्या दोघींशी असे काय बोलायचे होते ?
एवढा वेळ घेण्यामागे अभयचे काही कारण होते का?
आयुष्यात जसे सर्व दिसते तसेच खरे असते का?

क्रमशः

🎭 Series Post

View all