Login

नात्याची नवी पालवी भाग -१

अपूर्ण राहिलेल्या संसाराला दुसऱ्या संधीने दोन जीवांच्या नात्याला फुटलेली पालवी!
नात्याची नवी पालवी भाग -१


रेल्वेची निघण्याची वेळ झाल्याने सर्व घाई घाईत चढत-उतरत होते. कोणी सोडायला आले होते,कोणी आपली जागा नीट आहे की नाही, हे बसायची जागा आणि त्याच्यावरचा आसन क्रमांक पाहून शहानिशा करत होते.

मोठ्या लोकांसोबत लहान मुलांचा पण आवाज त्यात मिसळला होता. आपल्या सोबत आलेल्या सामानाच्या पिशव्या नीट ठेवण्याचे आणि जागा मिळेल तिथे बसण्याचे काम चालू होते.

ज्यांना जागा मिळाली त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता तर ज्यांना मिळाली नाही ते उभे राहून तर काहीजण रेल्वे सुरू झाल्यावर आत-बाहेर करण्यासाठी दरवाजा असतो तिथे बसण्याचा विचार करत होते.

रेल्वेने गाडी निघण्याचा इशारा केला आणि जे दूर होते आणि गाडीत बसले नव्हते ते रेल्वेच्या आसपास असल्याने घाई करत प्रसंगी पळत ती गाडी गाठण्याचा प्रयत्न करत होते.

कोल्हापूर वरून गाडी सुटली. रात्रीची वेळ असल्याने गाडी सुरू झाल्यावर पहिले सर्व जेवण्याच्या बेतात होते. मग कोणी घरून आणलेले डब्बे काढले तर कोणी रेल्वेमध्ये बनवलेले जेवण विकत घेत होते. काही लोकांनी पार्सल आणले होते तर काहीजण चिप्स आणि शेंगदाणे ह्यावर आपली भूक शमवत होते.

एक तीस वर्षाची बाई, तिच्या हातात साधारणपणे तीन वर्षाची मुलगी होती. हातातले सामान आणि त्या मुलीला सांभाळत तिने कसेतरी आपल्या जागेवर बसून घेतले.

"नाही बाळा, असे रडायचे नाही. थांब हा आता आपण लवकरच घरी पोहोचणार." रडणाऱ्या मुलीला शांत करत ती म्हणाली.

"एकट्याच दिसत आहात." तिला पाहून त्यातली एक सहप्रवासी असलेली बाई त्या मुलीच्या आईला म्हणाली.

"हो." ती म्हणाली.

"शेवटपर्यंत आहात का?" त्या बाईच्या नवऱ्याने विचारले.

"म्हणजे?" तिने विचारले.

"अहो, म्हणजे कुठे उतरणार आहात? का शेवटच्या स्थानकाला उतरणार?" आपल्या नवऱ्याला बोलून न देताच ती विचारत होती.

ह्या लोकांना कशाला एवढ्या चौकशा लागतात हे तिला समजत नव्हते. त्यात मुलगी त्रास देत होती ते वेगळचं.

"शेवटपर्यंत नाहीये, पण मध्येच उतरणार आहे." असे म्हणून ती मुलीला एक एक घास भरवत होती.

मग तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तीन मजले असल्यासारख्या त्या बसण्याच्या सीट्स होत्या. तिकीट तपासनीस येवून गेला.

हिची सर्वात खाली असणारी जागा होती. त्यात दोन स्त्रिया होत्या. जेमतेम त्या वयाने तिच्यापेक्षा लहान वाटत होत्या. जेवण होईपर्यंत सर्व खाली बसले होते.

"ओ ताई, तुम्ही वरच्या सीट वर झोपाल का? मला वरती चढताना त्रास होतो." तिला वरच्या बाजूला झोपण्याची विनंती करत ती बोलली.

ती म्हणजे शरण्या तांबे. एक - दीड वर्षापूर्वी एका अपघातात तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. पदरात ही तीन वर्षाची श्रावणी नावाची मुलगी होती. आता माहेराहून ती सासरी जात होती. विधवा असल्याने लोकांच्या नजरा तिच्या अंगावर भिरभिरत असायच्या. आपल्या नवऱ्याच्या माघारी मुलीला सांभाळण्याचे अवघड काम ती करत होती. त्यामुळे जरी नवरा नव्हता तरी ती गळ्यात छोटेसे मंगळसूत्र घालतच होती. तिच्या सासूला आणि काही बायकांना हे पसंत नव्हते पण स्वत:च्या संरक्षणासाठी आणि लहानग्या मुलीसाठी तिने हा निर्णय घेतला होता.

शरण्या "माफ करा ताई, पण माझी मुलगी लहान आहे. त्यामुळे मला जमणार नाही. तुम्ही तुमच्या जागेसाठी दुसरे कोणाला तरी विचारा."

"एवढी काय नाटकं करायची. वरती चढायला जमत नाही म्हणून विचारले. तर काही लोकांना मदत पण करायची नसते." ती बाई वाद घालण्याच्या जणू तयारीतच होती.

"एवढेच होते तर मग तिकीट काढतांना बघून घ्यायचे होते ना. जसा तुम्हाला त्रास आहे तशी माझी मुलगी वरून खाली पडेल ही भीती मलाही आहे. स्पष्ट शब्दांत सांगून पण तुम्हाला वाद घालायचा आहे." शरण्या पण ऐकून न घेता बोलली.

तेवढ्यात एका व्यक्तीने तिला त्याची जागा दिली आणि हा वरती झोपायला गेला.

मध्यरात्री सर्व गाढ झोपेत असताना अचानक गोंधळ सुरू झाला. खूप माणसे हातात कोयता,कुऱ्हाडी आणि चाकू घेत इकडे तिकडे धावत होते.

कित्येक लोक आरडाओरडा करत होते. गुंडांची मोठी टोळी त्यात घुसली होती. लोकांकडून पैसे, अंगावरचे दागिने आणि पिशव्या मधून काही मिळतंय का म्हणून त्यातले सामान उपसून सर्व बाजूला फेकत होते.

गाडी मध्येच थांबली होती, कारण रेल्वेच्या चालकाला त्यांनी त्याचे हात- पाय बांधून आणि डोळ्यांवर पट्टी बांधून वेठीस ठेवले होते. बरोबर आजूबाजूला जंगल असलेल्या ठिकाणीच ते थांबले होते.

त्यातले दोन- तीन जण शरण्याजवळ आले.

"तुमचे सर्व पैसे आणि दागिने काढा लवकर." त्यातला एक गुंड जोरात बोलला.

घाबरलेली ती आपल्या मुलीला हृदयाशी कवटाळून घेत तशीच त्यांच्याकडे पाहून शांतच बसली. मुलगी झोपलेली होती. पुन्हा त्या गुंडाने तिच्या मुलीला हात लावणार त्या आधीच तो मघासचा वरती बसलेला माणूस म्हणाला, "द्या सर्व त्यांना."

बाकीचे आजूबाजूची लोकं घाबरून आपला जीव वाचण्यासाठी त्यांना त्यांच्याजवळ असलेले मोबाईल,हातातल्या अंगठ्या,गळ्यातील मंगळसूत्र आणि चैन देत होते.

आता आपल्याकडे कोणताच पर्याय नाही म्हणून शरण्याने जेवढे पैसे होते तेवढे दिले.

"ते पण काढ." तो गुंड व्यक्ती जोरात ओरडला.

तसे त्याचा आवाज ऐकून ती छोटी मुलगी रडायला लागली.

त्या माणसाने तिचे मंगळसूत्र मागितले होते. आता ते द्यायचे म्हणजे त्याची निशाणी द्यायची असे वाटत होते.

"दे लवकर. तुझा नवरा तर इथेच आहे ना. हे मंगळसूत्र मग कशाला हवेय ?" तो तिच्यादिशेने ते काढण्यासाठी पुढे सरसावला.

तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते म्हणून मानेनेच ती नाही म्हणत होती सोबतच त्या मुलीचे सतत रडणे चालूच होते.

वरच्या सीटवरून उडीच मारून तो मघासचा माणूस खाली उतरला आणि म्हणाला "द्या ह्यांना मंगळसूत्र, मी असताना काळजी करू नका."

तसा तो गुंड माणूस तिथेच थांबला. जवळजवळ संपूर्ण रेल्वे मधल्या लोकांना बळजबरीने धमकावून आणि धारदार वस्तूंचा धाक दाखवून त्यांनी लुटले होते.

आपल्या मुलीला काही करू नये म्हणून त्या अनोळखी माणसाचे शरण्याला पटले आणि मनावर दगड ठेवून तिच्या लग्नातले नवऱ्याने घातलेले मंगळसूत्र त्या चोरट्यांच्या हवाली केले.

"ए हिरो तुझा मोबाईल दे. नाहीतर तुझ्या बायकोला आणि मुलीला आम्ही सोडणार नाही." पुन्हा दुसरा चोरटा साथीदार तिथे येऊन त्या माणसाकडून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्याआधीच त्याने स्वतःहून त्याचा मोबाईल त्याच्या हवाली केला.

भीतीचे सावट सगळीकडे पसरले होते. सर्व प्रवासी थरथर कापत होते. त्यांना पाहून हे चोरटे हसत होते. पुढे काय होणार हाच विचार ते करत होते. कारण अजूनही त्या चोरट्यांनी पोबारा केला नव्हता. त्यामुळे पुढ्यात अजून काय वाढून ठेवले आहे याचा विचार करत सर्व मनात देवाचा धावा करत होते.

कोण होता तो माणूस ज्याने शरण्याला मदत केली होती?
चोरटे फक्त चोरीच करतील की आणखी काही?