नात्याची नवी पालवी भाग -२

अपूर्ण राहिलेल्या संसाराला दुसऱ्या संधीने दोन जीवांच्या नात्याला फुटलेली पालवी!
नात्याची नवी पालवी भाग -२

"अरे, आता काय करायचे?" चोराच्या टोळीतील एक जण म्हणाला.

"सर्वांना सांग रे, जर तुम्हाला वाचायचे असेल तर त्याबद्दल कुठेही वाच्यता करायची नाही. नाहीतर ह्या मोबाईलमध्ये जे काही असेल ते सगळीकडे पसरवण्यात येईल." त्यातला त्यांचा म्होरक्या म्हणाला.

पुन्हा धमकावण्याचे सत्र सुरू झाले. सगळ्यांनी त्याला घाबरून संमती दिली.

"ह्यातल्या ज्या बायका आणि मुली आहेत त्यांना बाजूला कर. त्यांना शेटला विकून आपल्याला अजून पैसे मिळतील." असे म्हणून तो म्होरक्या खुनशी हसत होता.

"हे काम खूप जिकिरीचे आहे. आपल्याला हे काम पहाटे करावे लागेल. आता पहाट होण्यासाठी दोन तास आहेत." त्यातल्या एका गुंडाने सांगितले.

"हो, नीट लक्ष ठेव. कोणी हे काम करताना पळून जायला नको." असे बोलत तो म्होरक्या तिथून निघून गेला.

अर्धे जण दुसऱ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देवून तिथून निघून गेले.

तो माणूस ज्याने शरण्याला मदत केली त्याचे नाव अभय होते. अभय हा पस्तीस वर्षीय घटस्फोटित होता. बायकोने एका वर्षाच्या आतच पटत नाही म्हणून काडीमोड घेतला.
पोटगी म्हणून काही पैसे पण घेतले होते. अभयसोबत त्याची एक विधवा आई राहत होती. स्वभावाने सरळ मार्गी आणि पेशाने शिक्षक असलेला हा अभय सरंजामे नावाचा व्यक्ती सर्वांना मदत करण्यास नेहमी तत्पर असायचा.

त्याने ह्यांचे सर्व बोलणे ऐकले होते. आता त्याने ज्यांना शक्य आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करायचे ठरवले होते.

असाच तो त्याचा जागेच्या इथे गेला.

"काय ओ ताई.तुम्ही सांगितले नाही की हे तुमचे यजमान आहेत. " सहप्रवासी असलेला माणूस म्हणाला.

एकतर मुलीच्या रडण्याने ती बेजार झाली होती त्यात ह्या माणसाचे असे विचारणे म्हणून ती वैतागली होती.

"आमचे भांडण झाले होते म्हणून तिने सांगितले नाही." अभयने सांगितले.

तसे त्याचे ऐकून शरण्या विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहू लागली.

'एकतर ह्याने न मागता मदत केली आणि पुन्हा हा स्वतःला माझा नवरा म्हणवतोय. अजून पुढे काही केले ना तर मी गप्प बसणारच नाही.' ती मुलगीला शांत करत स्वतः शी म्हणाली.

त्याचे लक्ष बाहेर गेले. अंधार होता आणि काहीपण करून इथून बाहेर पडायचे म्हणजे खायचे काम नव्हते. त्या गुंडांनी थांबवलेली लोकं पाहून तो कसे बाहेर पडता येईल हाच विचार करत होता.

"तुम्ही जरा इकडे येता का?" अभय शरण्याला म्हणाला.

आता काय असेच तिच्या चेहऱ्यावरचे भाव जणू त्याला सांगत होते.

"बोला." ती एका कडेवर मुलीला घेवून म्हणाली.

त्याने तिच्या कानात जे सांगितले ते ऐकून तिचे डोळे भीतीने मोठे झाले की आश्चर्याने ह्याचा अंदाज त्याला घेता आला नाही.

"पण त्यांनी आपल्याला पकडले तर?" तिला काही कळतच नव्हते.


"असेही ते मारून टाकतील. स्त्रियांना विकणार आहेत असे बोलणे त्यांचे चालू आहे. लवकर निर्णय घ्या." तो इकडे तिकडे पाहत म्हणाला.

जोखीम तर होतीच पण जीव वाचवण्यासाठी प्रयत्नच केले नाही असे नको व्हायला म्हणून ती तयार झाली.

दोन- तीन पहारा देण्यासाठी गुंड होते ते पेंगत होते.

त्यातले एक आजोबा जे आजन्म अविवाहित होते त्यांनी तिथे स्वेच्छेने ह्या चोरांना थोपवण्यासाठी थांबण्याची तयारी दर्शवली. एकमेकांच्या कानात हळूच सांगत त्यांनी योजना बनवली.

दोन गुंड एकदा पाहून पुन्हा त्यांच्या जागेवर जाऊन बसले. तेव्हा सर्वांनी झोपण्याचे नाटक केले.

थोडावेळ वाट पाहून हळू हळू काही लोकं रेल्वेमधून उतरली. काही लोकांचा आवाज झाला की एका तुकडीप्रमाणे काही लोकं पुढे होऊन काही ना काही कारण सांगायचे जसे की वॉशरूम वापरायचे आहे. काहीजण उगाच मुलांना रडवत गप्प करायचे आहे असे सांगत होते. तर काहीजण उलट्या करण्याचे नाटक करत होते.

त्यामुळे ते गुंड हे खरंच वाटून त्यांना जाऊ देत होते.

पहिले बायका आणि लहान मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. नंतर काही पुरुष मंडळी हळू हळू बाहेर पडत होते. काहींनी भीतीने ह्या लोकांना नाही म्हंटले त्यामुळे त्यांना जास्त वेळ मनवण्याचा प्रयत्न न करता तिथून जाण्याचा विचार केला.

थोड्या वेळाने ते गुंड सर्वांना एकत्र जमा करून त्यांचे काय करायचे हे ठरवणार होते तेव्हाच त्यांना समजले की ऐंशी टक्के लोकं हे तिथे नव्हतेच. जाताना कोणाला संशय येवू नये म्हणून प्रवासी असलेल्या लोकांनी आपल्या सामानातून वस्तू काढून झोपल्यासारखे घालून त्यावर पांघरूण टाकले होते. फसवल्या गेल्याची जाणीव होऊन रागाने तिथले सामान इकडे तिकडे ढकलत होते.

म्होरक्याला सांगणे अवघड काम असले तरी त्याला सांगणे जरुरीचे होते. जेवढा जास्त वेळ त्याला सांगायला लावणार तेवढी कठोर शिक्षा तो करणार असे होते.

घाबरत त्यातला एक गुंड पुढे गेला आणि म्हणाला, "भाऊ.. ते.."

"काय झालं नीट आणि स्पष्ट बोल. आणलेस का सर्वांना?"
त्याच्या करारी आवाजात त्यांचा म्होरक्या बोलला.

"भाऊ, ते.. खूप कमी लोकं इथे राहिले, बाकीचे.."
थरथर कापत पुढचे शब्द त्याच्या तोंडातून निघत नव्हते.

"बाकीचे ?" त्याचा डावा हात असलेला माणूस हातातले कडे बाजूला करत विचारत होता.

"प.. पळून गेले." त्याने मान खाली घालत सांगितले.

"काय? आणि तुम्ही काय करत होता रे?" रागाने म्होरक्याने पुढे येवून त्याला मारले.

ते आजोबा उगाच हे दुखतयं ते दुखतयं असे करत नाटक करत होते. त्यांच्या आवाजाने ह्या गुंडांची डोकी पुढे काय करायचे ह्या विचाराने बधीर झाली होती.

" वाचवा मला. छातीत दुखतंय." पुन्हा ते आजोबा ओरडायला लागले.

"ए, गप्प बस म्हाताऱ्या. एवढ्या लवकर काय तू मरत नाहीस. गप्प बस नाहीतर हा चाकू आरपार घुसवून तुला आताच यमाकडे पाठवतो बघ." त्या म्होरक्याचा उजवा हात असलेला गुंड म्हणाला.

तेवढ्यात पोलिसांची शिट्टी वाजतो तसा आवाज आला आणि जे ह्या चोरीतून सापडले ते पण जाईल ह्या भीतीतून ते गुंड तिथून पळून गेले.

"वाह कमाल केलीस बघ पोरा. " त्या आजोबांनी एका पंधरा वर्षाच्या मुलाची पाठ थोपटली.

खरचं पोलीस आले होते का?
आजोबांनी त्या मुलाची पाठ का थोपटली?
अभय, शरण्या आणि बाकी सर्व प्रवासी कुठे गेले?

क्रमशः


🎭 Series Post

View all