नात्याची नवी पालवी भाग -३

अपूर्ण राहिलेल्या संसाराला दुसऱ्या संधीने दोन जीवांच्या नात्याला फुटलेली पालवी!
नात्याची नवी पालवी भाग -३

"वाह! कमाल केलीस बघ पोरा." त्या आजोबांनी एका पंधरा वर्षाच्या मुलाची पाठ थोपटली.

त्या पंधरा वर्षाच्या मुलाने पोलिसांच्या गाडीचा जसा आवाज येतो तसा आवाज काढला होता. त्यामुळे ते सर्व गुंड पळून गेले होते.

तिकडे अभय आणि बाकीचे लोकं एका जंगलाच्या दिशेने जोर जोरात पाऊले उचलत जात होते. पाहतात तर काय त्यांच्यातील बरेचसे लोक वेगवेगळ्या दिशेने जाण्यासाठी भांडत होते. कारण आत जंगलात एका ठिकाणी गेल्यावर तिथे तीन मार्ग दिसत होते.

शरण्या तर सर्व जात आहेत तिथेच जात होती पण आता ही चाललेली भांडणे पाहून तिला काही सुचत नव्हते.

"मला वाटते आपण ह्या उजव्या रस्त्यानेच जायला हवे. सर्व एकत्र गेलो तर काही समस्या आली तर त्यातून बाहेर जाता येईल." अभय म्हणाला.

"आम्ही तुमचेच का ऐकायचे ?" त्यातला एक व्यक्ती रागाने म्हणाला.

असे म्हणताच लोक भांडायला सुरुवात करायला लागले.

शेवटी अभयने जोरात ओरडून बोलायला सुरुवात केली,
"ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांनी माझ्यासोबत या.
बाकीचे तुम्हाला जे करायचे ते करा. मी जातोय इथून जास्त वेळ आपल्याला इथे थांबून चालणार नाही."

अभय शरण्याजवळ गेला आणि म्हणाला, " तुम्ही येताय ना माझ्यासोबत?"

"ह.. हो." माहीत नाही का पण शरण्याच्या तोंडून आपसूकच होकार निघाला.

"मग चला लवकर ." त्याने असे म्हणता आपल्या मुलीला कडेवर घेवून ती त्याच्या मागे चालू लागली.

तिला बघून बाकीचे पण काहीजण त्यांच्या मागे चालू लागले. एके ठिकाणी खड्डा होता त्यात शरण्याचा पाय अडकला आणि ती मुलीला घेवून खाली पडली.

"आ.. ह.. " ती जोरात ओरडत म्हणाली.

पुढे जाणारा तो तिच्या आवाजाने थांबला आणि पाहतो तर ती मागे पडली होती. तो तिथे गेला आणि आधी तिच्याजवळच्या मुलीला उचलून बाजूला उभे केले. तिला हात देवून उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हळूहळू उठली.

पावसाचे दिवस त्यात त्या जंगलात असणारा गडद अंधार आणि त्यामुळे तिला नीट दिसत नव्हते म्हणून ती खाली पडली.

"ठीक आहात ?" त्याने काळजीने विचारले.

चिखलाने तिची साडी भरलेली होती त्यामुळे तिचे लक्ष त्याच्याकडेच होते.

"आई.. आई.." तिचे लेकरू रडायला लागले आणि तिच्या सोबत त्याचेही लक्ष त्या मुलीकडे गेले.

"काय झाले चिऊला, आई इथेच आहे." त्याने तिला उचलून घेतले.

आणि शरण्या आश्चर्याने दोघांकडे पाहू लागली. कारण तिची मुलगी श्रावणी ही कधीच कोणाजवळ जात नव्हती, पण मुलीने आपल्या खांद्यावर जसा विश्वासाने हात ठेवते तसाच त्याच्या खांद्यावरही ठेवलेला हात पाहून तिला नवल वाटले.

"ठीक आहात का?" त्याने पुन्हा शरण्याला विचारले.

"हो. ठीक आहे." पायाला तर थोडे लागले होते पण आता ते सांगत बसण्याचा वेळ नव्हता.

"ओ भाऊ, बायकोशी गप्पा नंतर मारा. चला लवकर. इथून लवकर निघावे लागेल काय माहीत त्या गुंडांना माहीत पडले आणि आपल्या मागे लागतील." त्यांच्यासोबत आलेल्या माणसांपैकी एकजण जोरात ओरडत बोलला.

'बायको, मी ह्यांची बायको आहे असे ह्या लोकांना वाटत आहे. हा गैरसमज दूर करायला हवा. मी तर एक विधवा आहे. मघाशी परिस्थितीच तशी होती. उद्या सासूबाईंना समजले तर मला धारेवर धरतील.' ती मनाशीच विचार करत तिथेच उभी राहत म्हणाली.

" हे पाहा, सध्या तरी काही बोलू नका. आपल्याला सर्वांना इथून सुखरूप बाहेर पडायचे आहे. मी ह्या चिऊला घेतो तुम्ही हळू हळू चाला." त्याने ती काय विचार करत असेल ह्याचा अंदाज लावत तिला म्हणाला.

"चला लवकर..." पुन्हा कोणीतरी त्या घोळक्यातून म्हणाले.

दोघेही त्या छोट्या मुलीसह त्यांच्यासोबत जात होते.

वाट दिसेल तसे चालत होते आणि मध्येच रातकिड्यांचा आवाज आणि पाने पडण्याचा तसेच आभाळ दाटून आल्याने वीजांचा कडकडाट पाऊस पडण्याची शक्यता वर्तवत होता.

" भराभर चला ,पुढे एक वस्ती दिसत आहे. पाऊस सुरू झाला तर आपण भिजू. " दोन - तीन जणांना पुढे पाठवून रस्ता नीट आहे का ह्याची पाहणी करायला सांगितले होते त्यांनी ही माहिती पळत येऊन दिली होती.

तसे सर्व जण पुढे जलद गतीने चालत होती. छोटी चिऊ म्हणजेच श्रावणी त्याच्या खांद्यावर निश्चिंत झोपली होती.

ती एके ठिकाणी थोडी थांबली होती. कारण आधी तिने मुलीला उचलून घेतले होते आणि स्वत:चा जीव मुठीत घेऊन जलद चालणे आणि त्यातच पायाला झालेली गंभीर दुखापत ह्याने तिचा जीव मेटाकुटीला आलेला होता.

" पाय दुखतोय ?" ती थांबलेली पाहून त्याने विचारले.

तिने मान हलवून होकार दिला.

"आपण थोडे थांबूया." तो म्हणाला.

त्याने बाकीच्यांना पुढे जायला सांगून तसेच एखादे दार ठोठावून मदत मागण्यास सांगितले.

"भाऊ, ह्या मुलीला माझ्याकडे द्या. तुम्ही वहिनीसोबत या." एक महिला त्याला बोलली.

"नाही. ती आमच्यासोबत राहू दे. तुम्ही पुढे जा ताई." त्याने सांगितले कारण शरण्याच्या नजरेत त्याने नकार पाहिला होता.

"एक काम करूया. माझ्या बायकोला तुमच्यासोबत राहू दे. वहिनींना जर चालता आले नाही तर?" त्या महिलेच्या नवऱ्याने विचार करत आपले मत मांडले.

" न.. नको त्याची काही गरज नाही." शरण्याला बायको आणि वहिनी शब्द ऐकून चांगले वाटत नव्हते.

पुन्हा कोणी सोबत असेल तर तसे त्यांना दाखवावे लागेल आणि मध्येच काही प्रश्न विचारला तर काय उत्तर देणार. कारण त्यांना एकमेकांबद्दल काहीच माहीत नव्हते. जसे अन्य प्रवासी होते तसेच तेही एकमेकांना अनोळखीच होते.

"मी थांबते." ती महिला म्हणाली.

बाकी सर्वजण पुढे पोहोचले होते आणि त्यांनी तिथे असलेल्या लोकांचे दार ठोठावले होते.

"काय आहे? " एक माणूस जरा वैतागत दरवाजा उघडून म्हणाला.

एकतर पहाटेचे चार वाजले होते आणि पाच वाजता उठणारे हे गावकरी झोप मोड झाल्याने रागाने उठत ज्यांनी दार ठोठावले त्यांच्या वसकन अंगावर जात होते.

दहा - पंधरा लोक होते. त्यात ह्या लोकांवर विश्वास ठेवायचा की नाही हा मोठा प्रश्न होता.

तिकडे, ती उठण्याचा प्रयत्न करत होती पण पायाला जास्त लागल्याने तिच्या पायाला सूज येवून उभे राहता येत नव्हते. दोनदा ती हळू उठून पुन्हा वेदनेने खाली बसली.

"मला उभे राहता येत नाहीये." ती कळवळून हताशपणेच म्हणाली.

"त्यात काय मग हे तुमचे मालक उचलतील की, द्या तुमच्या मुलीला माझ्याकडे तसे पण हे लेकरू झोपले आहे." ती थांबलेली बाई म्हणाली.

"न.. नको." शरण्या, तिला उचलण्याचा विचार करूनच शहारत म्हणाली.

"थांबा." तो पुढे होत तिच्याजवळ जात झुकला.

शरण्या काय करेल?
अभय तिला मदत करेल का?
गावकरी आश्रय देतील का?

क्रमशः

🎭 Series Post

View all