नात्याची नवी पालवी भाग -४

अपूर्ण राहिलेल्या संसाराला दुसऱ्या संधीने दोन जीवांच्या नात्याला फुटलेली पालवी!
नात्याची नवी पालवी भाग -४

अभयने पुढे होऊन शरण्याला त्याच्या दोन्ही हातांमध्ये उचलले. हा अनपेक्षित धक्का तिच्यासाठी होता.

"काहीच बोलू नका, मी हे फक्त तुम्हाला मदत करण्यासाठी करत आहे." त्याने हळू आवाजात तिलाच फक्त ऐकू जाईल असे सांगितले.

"चला जाऊया." असे ती श्रावणीला उचलून घेतलेली महिला म्हणाली.

काय बोलावे काही समजत नव्हते, तिला चालता येत नव्हते. त्यात त्याने तिला उचलून घेण्याआधी पहिले पदराने पूर्ण तिची कंबर झाकून घेतली मगच उचलले. कमीत कमी स्पर्श त्याचा, तिला होण्याचा प्रयत्न तिच्यासोबत तो ही करत होता. लग्नानंतर तिचा नवरा सोडून अभय हा पहिलाच पुरुष होता जो तिला एवढ्या जवळ जाऊन स्पर्श करत होता.

विधवा बनल्यापासून ती कोणत्याही पुरुषाकडे वर तोंड करून पाहत नव्हती. कारण एकदा असा प्रसंग झाला होता की, तिच्याच जवळच्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत बोललेले मैत्रिणीला आवडले नाही आणि त्यावरून तिला खूप ऐकावे लागले.

तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यावर लोकांच्या तिच्याकडे पाहण्याच्या नजरा बदलल्या होत्या. हळदी-कुंकू समारंभ असो की आणखी कोणता धार्मिक कार्यक्रम तिचे विधवा असण्याचे कारण पुढे करून कोणीच तिला बोलवत नसायचे.

शेजारच्या लोकांनी आपल्या मुलांच्या वाढदिवसाला सुद्धा श्रावणीलाच पाठवा असे निरोप देवून जायचे.

जाणारी व्यक्ती निघून गेली पण मागे राहणारी व्यक्ती मात्र तिला विधवा असणे म्हणजे काही पाप केल्यासारखे समाजातील लोकं तिला भासवत होते. त्यातूनही ती ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या मुलीवर होऊ नये म्हणून जास्त विचार न करण्याचा सतत प्रयत्न करत होती.

गावातील काही मुख्य व्यक्ती आणि सरपंच यांना पहाटेच निरोप दिला होता आणि ती माणसे तातडीने तिथे पोहोचले. तोपर्यंत त्या प्रवाशी लोकांना एका झाडाच्या इथे थांबायला सांगण्यात आले.

अभयही तिथे पोहोचला. त्याने शरण्याला एका जागी बसवले. ती सुद्धा पदर सावरून बसली आणि मघापासून आपल्या मुलीला घेतलेल्या त्या महिलेकडून झोपलेल्या मुलीला जवळ घेतले होते.

त्यातील एक माणूस "अभय भाऊ, तुम्हीच पुढे होऊन बोला. ही लोक आता त्यांच्या लोकांशी बोलणार मगच आश्रय देणार असे काही बोलत होते."

एव्हाना अभय सर्वांच्या परिचयाचा झाला होता. त्यामुळे तोच काहीतरी करु शकतो असे सहप्रवासी असलेल्यांना वाटत होते.

"ठीक आहे, मी बोलतो." तो म्हणाला.

सरपंच आणि मुख्य लोकं तिथे आले आणि काही लोकं तर हातात काठी घेऊन उभे राहिलेले दिसले. ते पाहून ही शहरातील लोक घाबरली.

"भाई, ये हमे मारेंगे क्या?" त्यामध्ये एक परप्रांतीय होता तो बाजूला उभे असलेल्या एका माणसाला भीतच म्हणाला.

"काय माहीत बाबा, ह्यांना आपण चोर तर वाटत नाही ना." दुसराही घाबरून म्हणाला.

"आधी शांत बसा रे. काय आहे ते पाहू." त्यातलाच तिसरा म्हणाला.

"मी इथला सरपंच आहे.तुम्ही इथे का आलात?" सरपंच जरा विचित्र नजरेने सर्वांकडे पाहून विचारत होते.


"नमस्कार, आम्ही रेल्वेप्रवासी आहोत.आमच्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला होता. आम्हाला तुमच्या इथे थोड्या वेळासाठी आश्रय दिलात तर बरे होईल. कारण आमच्यासोबत आमची बायका- मुले आहेत. उद्या आम्ही इथून पुढे जाऊ. " अभयचा शिक्षकी पेशा इथे त्याने त्याच्या समंजस बोलण्यातून दर्शवला होता.

"पण आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवायचा ?" मुख्य लोकांपैकी एक वयस्क माणूस कपाळावर आठ्या आणत विचारत होता.

"न्हायं तर काय? लुटून बिटून काय न्हेलं तर आम्ही कुठं हुडकायचे ह्यास्नी." एक गावकरी आपली संशयी नजर त्या सर्वांवर रोखत म्हणाला.

"तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता. आम्ही संकटात सापडलो आहोत. माणुसकीच्या नात्याने तुम्ही मदत करा. आम्ही इथून लवकरात लवकर निघून जाऊ. " अभय अगदी हात जोडत त्यांना विनवणी करत म्हणाला.


सरपंच आणि मुख्य ग्रामपंचायतीमधली माणसे ह्यांनी आपापसात चर्चा करायला सुरुवात केली. गावकरी लोकं तर ह्या लोकांना वरपासून खालीपर्यंत पाहत होते. त्यांचे कपडे पळून आणि त्या जंगलातून चालून खराब झाले होते. पावसाची उघडझाप चालूच होती.

"बरं, ठीक आहे. आता आणि हे गाव सोडून जायच्या आधी तुमची तपासणी केली जाईल. मगच इथून जाऊ शकाल. इथे आहात तर इथले नियम पाळावे लागतील. ती शहरातली थेरं, इथं चालणार नाहीत."

अभयने मागे वळून सर्वांकडे पाहिले नजरेने आणि मान उंचावून विचारले आणि त्यांचा प्रतिसाद पाहून पुन्हा सरपंचाकडे बघून म्हणाला की, " मान्य आहे."

"प्रत्येक घरात २ माणसे जातील. त्या आधी तुम्ही तुमचे नाव आणि माहिती द्यायची. तसेच तुमचा आम्हाला त्रास होणार नाही ह्याची खबरदारीही तुम्हीच घ्यायची. हो, आणि इथे कोणाला मारले तरी समजत नाही." आधी सौम्यपणे नंतर गावचा धाक दाखवण्यासाठी त्यांनी जणू धमकीच दिली.

"हो नक्कीच."

त्या प्रवाशांनी आपली माहिती दिली. असे एक-एक करत त्यांना घरात राहण्यास सांगत होते. तेवढ्यात अभयची आपली माहिती सांगून झाली आणि त्यानंतर शरण्या पुढे गेली.

"माझे नाव शरण्या तांबे आणि ही माझी मुलगी श्रावणी तांबे." असे तिने सांगितले.

"अहो पण तुम्ही तर ह्या अभय सरांच्या पत्नी आहात ना? " त्यांच्यासोबत असणारा एक प्रवासी म्हणाला.

सर्व उपस्थितांच्या नजरा त्या दोघांवर गेल्या. कारण अभय सरंजामे असे नाव असेल तर त्याची पत्नी म्हणून तिचे आडनावही तसेच असायला हवे होते.

"अ.. ते त्यांच्या माहेरचे नाव लावतात आणि मला त्याबद्दल काहीच हरकत नाही." खोटे हसू चेहऱ्यावर आणून तो सांगत होता.

"आणि गळ्यात मंगळसूत्र नि कपाळावर सौभाग्याचे देणं नाहीये." एका गावातल्या बाईने तिच्याकडे निरखून पाहिले.

झालं, पुन्हा नवरा नसण्याची जाणीव तिला करून देण्यात आली होती.

"ही काय भानगड म्हणायची मास्तर?" त्यातल्या एका माणसाने दोघांकडे बघून विचारले.

सर्व माहिती सांगत असताना त्याचा पेशा शिक्षकाचा आहे, हे त्याने सांगून टाकले होते. गावच्या ठिकाणी आता प्रचलित असणारे लिव्ह इन रिलेशनशिपचे वारे वाहिले नव्हते. त्यामुळे पवित्र लग्न संस्कार माहीत असलेले हे गाव त्यांना ह्याबद्दल उत्तर देणे दोघांनाही बंधनकारक होते.


काय होईल पुढे ?
गावकऱ्यांना सत्य समजेल का?
ती विधवा आहे हे समजल्यावर बाकीचे लोक तिला आसरा देतील का?

क्रमशः

🎭 Series Post

View all