नात्याची नवी पालवी भाग-५

अपूर्ण राहिलेल्या संसाराला दुसऱ्या संधीने दोन जीवांच्या नात्याला फुटलेली पालवी!
नात्याची नवी पालवी भाग-५

आता सत्य सांगण्याावाचून गत्यंतर नाही. म्हणून शरण्या पुढे बोलणार होतीच की, "हे,पाहा. मला माझ्या बायकोवर कोणतीही जबरदस्ती करायची नव्हती. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना एवढे सांभाळले आणि मग लगेच मी लग्न केले म्हणून त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांनी माझे नाव लावावे हे मला मान्य नव्हते. तसेच माझी ह्याबद्दल काहीच हरकत नाही. "अभय पुढे येऊन सावरत म्हणाला.

शरण्याला आता अजून खोटे बोलण्याचा जास्तच राग येत होता. तो तिच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होता. त्याने तिला डोळ्यांनीच शांत राहण्याचा आर्जव केला होता.

"बरं मग ते लग्नात डोरलं घालतात ते तरी कुठं हाय? भांगेत कुकु बी न्हायं." तिला पुन्हा वर-खाली बघून एक गावातील बाई हनुवटीवर हात ठेवून म्हणाली.


"ते मगाशी त्या गुंडांनी हिसकावून घेतले. आम्ही सुध्दा ते बघितले होते. ह्या ताई तर देण्यास तयारच नव्हत्या पण हे अभय भाऊ म्हणाले तेव्हाच दिले. शेवटी तेव्हा जीव महत्त्वाचा होता." प्रवासामधला एक माणूस माहिती पुरवत म्हणाला.

"अस्स.. मग एक काम करा. माझा बाजारात नकली दागिने विकण्याचा धंदा हाय. तर त्यातले एक काळ्या मण्यांचे मंगळसूत्र मी देते आणि म्होरं आपल्या ग्रामदेवतेचे राऊळ हाय तिथं जावून भांगेत कुंकू भरा. असे हे उघडं कपाळ कसं दिसतंय बघा. विधवा थोडीच हायती ह्या." जमलेल्या गावातील एका बाईने आपला सल्ला दिला.

"पण.." तिला काहीच सुचत नव्हते.


अभयही पेचात पडला होता. आता काय करायचे कारण देवळात सर्वांच्या साक्षीने ते पण खोटे बोलणे पटत नव्हते. तेव्हाच सर्वांची संशयी नजर त्याने अनुभवली. आता जर आम्ही दोघे नवरा-बायको नाहीत हे सांगितले तर ही लोक बाकीच्या लोकांनाही वेठीस धरतील. तो सर्वांचा जीव धोक्यात घालू शकत नव्हता.
तसेच हा प्रश्न होता की, शरण्याला हे पटेल का कारण तिच्याकडे पाहून तर ती आधीच बायको शब्द ऐकला की वैतागत होती.

"व्हयं बरोबर बोलत हायती. जर तुम्ही ते डोरलं आणि कुंकू लावायला न्हायं म्हणालात तर आम्ही इथे आसरा देणार न्हायं. ह्या गावात अजून बी बिनालग्नाचे असे एकत्र राहत न्हाईत. मंजूर नसलं तर तुम्ही सगळी निघा हिथनं." माजी सरपंच जे वयोमानाने वृध्द झालेले ते म्हणाले.

"त्यात काय अभय भाऊ करतील की. ही ताई त्यांची बायकोच आहे. त्यांचे भांडण झालंय म्हणून ते बोलत नाहीत. अभय भाऊ व्हा पुढे." हसतच त्यातला एक सहप्रवासी असलेला माणूस म्हणाला.

अभयला आता ते सांगतात ते ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता.
म्हणून तो तिच्या दिशेने पावले टाकत होता. ती मानेनेच नकार देत होती.

त्या बाईने घरातून काळ्यामण्यांचे मंगळसूत्र आणले आणि त्याच्या हातात दिले. तो गळ्यात घालणार तर तिने त्याला एका हाताने अडवले.

"माफ करा. मी हतबल आहे. इथे आपण अनोळखी लोकांमध्ये आहोत. एकदा ह्या चिऊकडे पाहा. सध्या आपला जीव वाचवणे आपले मुख्य काम आहे." तिला ऐकू जाईल तेवढ्याच हळू आवाजात तो म्हणाला.

"मी.. मी.. वि.." ती बोलणारच की अचानक तिच्या खांद्यावर डोके ठेवलेली श्रावणी रडायला लागली.

आणखी आढेवेढे तिने घेवू नये म्हणून त्याने लगेच तिच्या गळ्यात ते बांधले.

त्याने तिचा हात पकडला आणि ते सांगत होते त्या जवळच्या मंदिरात तिला घेवून चालू लागला. मुलगी रडत होती म्हणून ती तिला शांत करत नकळतच त्याच्यासोबत चालत होती.

"हे घ्या कुंकू आणि कपाळावर नंतर भांगेत भरा." एकाने त्या ग्रामदेवतेच्या मूर्तीजवळ असलेले कुंकू त्याच्याकडे दिले.

'भांगेत भरा ' हे शब्द ऐकून तिचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्याने दोन बोटाच्या चिमटीत पकडलेले कुंकू तिच्या कपाळी लावले आणि भांगेत भरणार तेव्हा तिचे अश्रू डोळ्यांतून बाहेर पडलेले त्याने पाहिले.

तो थांबला आणि एक बोट त्याने कपाळाच्या वरती रेघ मारतात तसे केले. कारण तिला हे मान्य नाही हाच संकेत तिच्या अश्रूंनी जणू त्याला दिला होता.

तिला तो दिवस आठवला जेव्हा तिच्या नवऱ्याचे पार्थिव घरी आणले होते आणि काही बायकांनी तिचे कुंकू पुसले होते आणि गळ्यातील मंगळसूत्र काढले होते. सर्वात वेदनादायी कोणता क्षण हा स्त्रीच्या आयुष्यातील असेल तर तो हाच असतो. 

ज्या आनंदाने गळ्यात सुवासिनी, मांगल्याच्या वस्तू परिधान करतात त्या ज्यावेळी काढण्याची वेळ येते तेव्हा ती वस्तू जरी असली तरी अविभाज्य भाग बनल्याने सहजासहजी काढून टाकणे एका स्त्रीला वेदनादायी असते. त्यातच असे हे जबरदस्तीचे नाते शरण्याला जास्त त्रास देत होते. म्हणून अनावर झालेल्या अंतर्भावना अश्रुतून बाहेर पडल्या होत्या.

"माफ करा." असे बोलून त्याने तिचा हात धरला आणि तिच्या मनाची अवस्था समजून त्याने मुलीला स्वतःकडे घेतले.

प्रत्येकजण त्यांना सांगितलेल्या घरात गेले. शरण्या तर शांतच होती. अगदी आपली मुलगी आपल्याजवळ नाही ह्याचे भानही तिला राहिले नव्हते.

"जरा तुमच्याकडे काही खायला मिळेल का? " त्याने ज्या घरात थांबले होते तिथल्या लोकांना विचारले.

"माझ्या मुलीला भूक लागलेली आहे. त्यामुळे ती रडत आहे." केविलवाणा चेहरा करून अभय त्यांना म्हणाला.

त्यांनी त्या तिघांनाही वाटीत थोडे दूध दिले तसेच काही फळेही खाण्यास दिली.

अभयच्या मांडीवर श्रावणी बसून होती आणि तो तिला भरवत होता. शरण्याने कशालाच हात लावला नव्हता.

"थोडे खाऊन घ्या. आजारी पडलात तर चिऊ पण रडेल." त्याने तिला खाण्यास सांगितले.

"भाऊ, तुम्ही लयचं ग्वाड बोलता बघा. ह्या वहिनींना सारखं इनवन्या कराया लागतात वाटतं. आमची बघा कसं सारं गपगुमानं करती. " तिथला माणूस त्या दोघांना उद्देशून म्हणाला.

"असे काही नाहीये भाऊ, त्यांच्या पायाला लागलेय म्हणून त्या जरा शांत आहेत. बाकी काही नाही." त्यावेळीही एक नवरा जशी आपल्या बायकोची बाजू घेतो तसेच त्यानेही घेतली.

"व्हयं असलं तस्संच. मी हळदीचा लेप सांगतो बनवायला. डाक्टर सुट्टीव गेलाय. नायतर त्याने काय तरी केलंच असतं."
तो माणूस म्हणाला.

पक्षांचा किलबिलाट आणि बदलणारा काळोखाचा रंग सूर्योदयाचे संकेत देत होता. सकाळची कामे करण्याची त्यांची लगबग पाहून आपण त्यांना इथे राहून अजून त्रास देतोय अशी अपराधी भावना त्याच्यासोबतच शरण्याच्या मनातही आली होती.

"आज काय सूर्यदेव दिसत न्हाय असंच वाटतं हाय. पाऊस काल सारखाच चिक्कारं पडलं." बाहेर येऊन वरती आकाशात काळ्या ढगांची झालेली गर्दी पाहून अभयला तो माणूस म्हणाला.

पुन्हा इथेच थांबावे लागेल असे वाटून अभयला वाईट वाटले. कारण सकाळी इथून निघून पुढचा रस्ता चालायचा म्हणजे जे बोललेले खोटं आहे ते पण सारखे बोलावे लागणार नाही असा आधी त्याने विचार केला होता. शिक्षक असून त्याला खोटे बोलणे पटत नव्हते पण नाईलाज असल्याने त्याने चांगल्यासाठी बोलले होते. त्यातच तेव्हा सर्वांचे भले होते असे स्वतःच्या मनाला समजावून त्याने विचारांची घोडदौड थांबवली.

गावकऱ्यांना सत्य माहीत पडेल का ?
अभय आणि बाकीचे तिथून बाहेर पडतील का?

क्रमशः

🎭 Series Post

View all