नात्याची नवी पालवी भाग-६

अपूर्ण राहिलेल्या संसाराला दुसऱ्या संधीने दोन जीवांच्या नात्याला फुटलेली पालवी!
नात्याची नवी पालवी भाग -६

सकाळ झाली होती सोसाट्याच्या वारा सगळीकडे वाहत होता आणि वरुणदेवाची कृपा म्हणून पाऊस धो धो करत कोसळत होता. मध्येच वीजांचा आवाज कानठळ्या बसवणारा होता.

अभयने शरण्याच्या पायाला हळदीचा लेप लावला होता. तो लावत असताना दोघांमध्ये अवघडलेपणा होता. त्याने जिथे लागले होते तिथेच लक्षकेंद्रीत करून हलक्या हाताने हळूवार लावला होता.

जास्त बोलणे होत नसले तरी तो तिची काळजी घेत आहे हे तिच्यासोबतच ते ज्या घरात राहत होते त्यांनाही दिसत होते.

"आई.. आई.." बोलत छोटी श्रावणी आराम करायला झोपलेल्या आईजवळ जात तिला हात लावणारच होती की, त्याने तिला आपल्याजवळ घेतले.

"आईला लागले ना,ती झोपली आहे. मग आपण नंतर तिला उठवू हा?" त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला.

आणि काय आश्चर्य त्या छोट्याशा मुलीने ते ऐकले होते. पुन्हा बाहेर पडणाऱ्या पावसाने वीजा आणि सोसाट्याच्या वाऱ्याने आपले अस्तित्त्व दाखवले. त्या आवाजाने श्रावणी त्याला बिलगून बसली होती. तोही तिला आपल्या कुशीत घेऊन शांत करत होता.

एकेकाळी त्यानेही असेच आपल्या मुलाचे स्वप्न त्याच्या बायकोसोबत पाहिले होते. आपले मूलं, हे मुलगा असो वा मुलगी ह्याचा त्याला काही फरक पडत नव्हता, पण आपल्याला मूलबाळ असावे ही इच्छा त्याने कित्येक वेळा आपल्या बायकोला बोलून दाखवली होती. तिने कधी ते मनावर घेतले नव्हते.

एकदा काही कारणाने त्याने कपाटात काही शोधत असताना एक फाईल त्याच्या हातातून खाली पडली. ही कोणती फाईल म्हणून त्याने पाहताच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.

ती फाईल त्याच्या बायकोने केलेल्या गर्भपात ह्याबद्दल वैद्यकीय अहवालाची होती. त्यावरून त्याने तिला विचारले असता ती म्हणाली होती की, तिला हे मूलं नको होते. तिच्या शरीराची रचना ह्यामुळे बिघडली असती. तसेच उदाहरण द्यायचे म्हणून तिने तिच्या मैत्रिणींचे दाखले दिले. ते ऐकून तो सुन्न झाला. आजपर्यंत तिच्या सर्व चुका त्याने पोटात घातल्या होत्या. त्याचेच हे फळ त्याला मिळाले हे वाटून रागावर नियंत्रण ठेवत त्याने तिच्याशी अबोला धरला होता.

असेच खूप वेळा तिचे रात्री-अपरात्री येणे पाहून त्याची आई काळजीने म्हणाली, "सूनबाई, असे रात्री-अपरात्री येणे बरे नाही. काळजी लागून राहते. जास्तच त्रासदायक काम असेल तर सोडून दे. तुझ्या तब्येतीची काळजी घे."

तेव्हा अभयची बायको सृष्टी म्हणाली," एकतर तुम्ही घरी बसून असता. मी नोकरी करते ते तुम्हाला पटत नाही ना? म्हणून ही असली कारणे सांगत आहात. तुम्हाला काय ओ माहिती की घरखर्च कसा चालवला जातो. जरा आपल्या मनासारखे वागायला लागले तर तुम्हाला त्यातही समस्या आहे. जगायचे का नाही मी? का तुमच्यासारखे दुसरे कमवून आणतील आणि मगच त्यावर जगायचे?"

"सृष्टी, शांत बस. कोणाला काय बोलतेस त्याचे तुला भान आहे का?" घरात येताच त्याच्या कानावर सृष्टीचे हे बोलणे ऐकून तो रागाने म्हणाला.

"तू तर गप्पच बस. आईचा लाडका आहेस ना मग तिचीच बाजू घेशील. आता काय ते तू निर्णय घे. एकतर ह्या घरात तुझी आई राहिल नाहीतर मी. " तिला आधीपासूनच सासू आवडत नसल्याने तिने ही संधी साधली होती.

"आई आणि मी सोबत राहीन. तुला आमच्या दोघांसोबत राहावे लागेल." त्याने उत्तर दिले.

"ठीक आहे. मग राहा तिच्यासोबतच." असे म्हणून ती तिच्या माहेरी निघून गेली.

"अरे थांबव तिला. माझी अडचण होत असेल तर मी वृद्धाश्रमात जाते पण तू तिला थांबव अभी, नाहीतर तुझा संसार कसा चालणार?" त्याची आई त्याला समजावत डोळ्यांतले अश्रू पुसत म्हणत होती.

" आई, तू आधीही माझ्यासाठी पहिले प्राधान्य आहेस आणि आताही. ती स्वतःहून मला सोडून गेली आहे आणि खरे सांगू तिला माझ्यासोबत राहायचे नाही. म्हणून ती ही कारणे शोधत आहे. उद्या तू इथून गेलीस की काही दिवसांनी ती मला सोडून जाणार. तिच्या जवळच्या मैत्रिणीने हे मला आधीच सांगितले होते. नवरा शिक्षक आहे, ह्याचा आता तिला कमीपणा वाटू लागला आहे. तिची संगत बरोबर नाही. मी तिला समजावून वैतागलो आहे,पण आज तुला असे बोलून ती कायमची माझ्या मनातून उतरली आहे." असे बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला.

आपल्या मुलाचे पुढे काय होणार,असा विचार करून त्याची आई चिंतेत असतानाच दोन आठवड्यांनी अभयला घटस्फोट देणारी नोटीस आली. त्याने काहीही न बोलता तिला घटस्फोट दिला आणि तिने मागितलेली पोटगीची रक्कम गावातील थोडी जमीन विकून तिला पैसे दिले.

आपल्या मुलाचा संसार अर्ध्यावर मोडला हे पाहून त्याची आई स्वतःला दोष देत असताना तिच्या लगेच लग्न झाल्याचे फोटो त्याने त्याच्या आईला दाखवले होते.

शिक्षक असल्याने त्याला मुले खूप आवडायची. गरीबांना मोफत पण श्रीमंतांना मात्र पैसे आकारून शाळेनंतर शिकवायचा. लहान वयातच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्याला आपल्या आईच्या कष्टाची जाणीव ही होतीच.

भूतकाळाच्या गर्तेतून तो कण्हणाऱ्या आवाजाने बाहेर आला.
समोर शरण्या कण्हत होती आणि तिचे अंग थरथर कापत होते. खांद्यावर झोपलेल्या श्रावणीला त्याने बाजूला अंथरुणावर अलगद ठेवले आणि तो तिच्याजवळ गेला. कपाळाला हात लावला तर त्याला चटकाच बसला. तिला ताप आला होता.

त्याने थंड पाण्याच्या मीठाच्या पट्ट्या तिच्या डोक्यावर ठेवल्या. ती ग्लानीमध्येच 'श्रावू ' असा आवाज देत होती. तिची ही अवस्था पाहून त्याला पण वाईट वाटत होते.

त्याने तिला "श्रावणी ठीक आहे,इथेच आहे." असे सांगितले.

दिवसभर पाऊस कोसळत होता. कोणीसुद्धा घराच्या बाहेर पडले नव्हते. त्यात ही दोघे ज्या घरात होते त्याला तीन खोल्या होत्या. एक खोली ह्या तिघांना आणि एका खोलीत ते नवरा-बायको राहत होते. स्वयंपाकघर आणि न्हाणीघर शेवटी होते.


"ताई, तुमचे खूप उपकार झाले. तुम्ही आम्हा तिघांना इथे आसरा दिला आणि वेळोवेळी आम्हाला मदत केली त्यासाठी खूप धन्यवाद." अभय त्या बाईने चहा आणलेला पाहून म्हणाला.

"आत्ता ताई बी म्हणताय अन् उपकार बी केले बोलताय. असं कसं ओ भाऊ. मला भावं न्हाय पण तुमी आता माझे भाव झालात तर बहिणीच्या घरीच राहताय अस्स समजा." ती बाई आपुलकीने म्हणाली.

"बरं." त्याने हसून सांगितले आणि तिच्याकडे एकदा बघितल्यावर त्याच्या लक्षात आले की ती श्रावणीकडे पाहत आहे.

"तुम्ही तिला घेवू शकता." त्याने तिच्या मनाचा अंदाज लावत सांगितले.

"नगं, मी न्हायं घेवू शकत." ती भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली.

"का?" न समजून अभयने विचारले.

"तिला मूलबाळ न्हायं तर कोनी बी स्वत:चं पोरं तिला देत न्हायं. लग्नानंतर घरात पाळणा हलला न्हाय म्हणून गावकरी लोक तिला जवळ बी येऊन देत न्हायं." तिचा नवरा बोलला.

तिच्या तुडुंब भरलेल्या डोळ्यांनी पाण्याची पातळी ओलांडून ते पाणी गालावर ओघळले होते.

अभयला वाईट वाटले आणि गावकऱ्यांचा रागही आला. क्षणात पुन्हा त्याचे मन भूतकाळात गेले, एक त्याची बायको होती जिने त्याला कल्पना न देता गर्भपात करून बाळाला ह्या दुनियेत आणले नाही आणि समोर हे दोघे होते जे बाळासाठी तरसत होते.

त्याने श्रावणीला उचलून त्या बाईजवळ दिले आणि त्या बाईने आनंदाने श्रावणीला आपल्या कडेवर घेवून तिच्या गालावर ओठ टेकवले. त्या नवरा बायकोचा आनंद गगनात मावत नव्हता. नंतर पुन्हा अभयकडे तिला देवून ती जेवण करण्यासाठी तिथून निघून गेली.

अभय पुढे काय करेल?
शरण्या बरी होईल का?
पुढे जाण्याचा मार्ग सापडेल का?

क्रमशः

🎭 Series Post

View all