नात्याची नवी पालवी भाग-८

अपूर्ण राहिलेल्या संसाराला दुसऱ्या संधीने दोन जीवांच्या नात्याला फुटलेली पालवी!
नात्याची नवी पालवी भाग- ८

शरण्याने सुस्कारा सोडला आणि त्याच्यामागे चालू लागली.

एक-दीड तासाच्या अंतराने ते एका इमारतीखाली आले. त्यांनी त्यांना सोडणाऱ्या माणसाला धन्यवाद सांगितले.

तिच्या मनात धाकधूक होती की, आता पुढे काय? अभयचे घर कसे असेल आणि त्याच्या घरातील माणसे,ते काय बोलतील. डोक्यात विचारांची लाट भरती आणि ओहोटीचे काम करत होती.

त्याने लिफ्टचे बटण दाबले आणि त्याच्या मजल्यावर ती लिफ्ट थांबली. त्याने चला म्हंटल्यावर ती त्यातून बाहेर आली. चाळीत असणारे घर आणि आता इमारतीतले घर पाहून तिला फरक समजत होता. सर्वांच्या घराची दारे बंदच होती. त्यातूनही तिने हे निरीक्षण केले होते.

त्याने दाराची घंटी वाजवली आणि दार उघडणारी व्यक्ती पन्नास - पंचावन्न वर्षाची महिला पाहून शरण्या चकित झाली.

अभयची आई, आपल्या मुलाच्या कडेवर असलेली छोटी मुलगी आणि त्याच्यामागे उभी राहिलेली एक स्त्री पाहून प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघू लागली.

"आई, आत येऊ दे. मग बोलू." त्याने असे म्हणताच त्याची आई बाजूला झाली.

ती दारातच उभी राहिलेली पाहून त्याची आई म्हणाली,
"पोरी, आतमध्ये ये."

त्याने स्वतःच पहिले हात धुवून मग स्वयांपाकघरात जाऊन पिण्यासाठी पाणी आणले. अजूनपर्यंत तरी तिथे शांतता होती.

त्याच्या आईकडे पाहून तिलाही समजले की त्याही विधवा आहेत पण अजून कोणी घरातले सदस्य दिसत नाहीत तर बाहेर गेले असतील असा तिचा समज झाला.

श्रावणीला त्याच्या आईने काहीतरी खायला दिले आणि शरण्याला फ्रेश होऊन येईपर्यंत आईने तिच्याकडे असणारी एक साडी नेसायला दिली.

"काय आहे हे अभी? आणि नेमके काय झाले होते? ते बातम्यांमध्ये सांगतात त्यावर माझा विश्वास नाहीये." आईने मघापासून मनातील असलेले प्रश्न भर भर विचारून घेतले.

त्याने गाडीतील चोरांपासून ते गावात जे घडले आणि नंतर शरण्याच्या सासूबाईंनी तिला घरात घेण्यास नाकारले ते सर्व सांगितले.

"बापरे, अभी हे सर्व किती भयानक आहे!" आईची सगळं ऐकून झाल्यावर ही प्रतिक्रिया होती.

"हो आई, ते खोटे लग्न सांगितले आणि असे झाले. त्यांच्या सासूला सर्व सांगितले तरी त्या ऐकून घ्यायला तयार नाहीत. मग त्यांना आणि ह्या चिऊला कुठे तिथे एकटेच बाहेर सोडणार म्हणून मग मी आपल्या घरी घेवून आलो." त्याने चिऊच्या कपाळावर आलेले केस मागे करत सांगितले.

"बरं, मी जेवणाचे पाहते. चपात्या करायच्या राहिल्या आहेत. बाकी ह्या बाळासाठी काहीतरी कमी तिखट बनवते." असे बोलून त्याची आई स्वयंपाकघरात गेली.

चिऊ पण दिलेले फरसाण खात त्याच्याशी बोलत होती.
शरण्या बाहेर आली तर अभय आणि श्रावणी एकमेकांत बोलण्यात गुंग होते. ते पाहून तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते आणि ती स्वयंपाकघराच्या दिशेने चालत गेली.

"मी काही मदत करू का?" ती दबकतच स्वयंपाकघरात प्रवेश करत म्हणाली.

"अगं, सर्व झालेच आहे बघ. ही शेवटची चपाती भाजत आहे. फक्त वरण बनवायचे आहे. त्या चिऊला आमचे कोल्हापूरचे तिखट जेवण चालणार नाही." त्याची आई हसतच म्हणाली.

" मी बनवते. माझे माहेर पण कोल्हापूरचे आहे. त्यामुळे मलाही सासरी फिकट बनवावे लागते,जास्त तिखट जेवण बनवलेले चालत नव्हते. सवय लागेपर्यंत सासूबाई खूप ओरडायच्या."

ती पण त्यांच्या बोलण्यात आलेली सहजता पाहून सहज बोलून गेली. मग बोलण्या बोलण्यातूनच माहितीची देवाणघेवाण झाली. तिने जेवण कुठे ठेवायचे हे विचारून सर्व जेवणाचे साहित्य बाहेर आणले. त्याच्या आईला कशालाही हात लावून दिला नाही.

नकळतच त्यांनी शरण्या आणि सृष्टीची तुलना केली. कारण सृष्टी कामाला जात असणारी असली तरी ती घरातील एकही काम करत नव्हती. चांगल्याला कधी चांगलं मिळते का असाच त्यांनी विचार करून सोडून दिले होते.

जेवण जेवत असताना श्रावणी नीट खाते की नाही याकडेही अभय आणि त्याच्या आईचे लक्ष होते.

"अरे वाह, चिऊ स्वतःच्या हाताने खाते. " तो म्हणाला.

ते ऐकून चिऊची कळीच खुलली होती.

"हो, मला कामाला जावे लागत होते त्यामुळे काही सवयी तिला आधीच लावून ठेवल्या होत्या." शरण्या म्हणाली.

जेवण झाल्यावर थोडा वेळ टीव्हीवर कार्टून पाहत अभयच्या मांडीवरच डोके ठेवून श्रावणी झोपली.

तोपर्यंत स्वयंपाकघर आवरण्यात तिने त्याच्या आईची मदत नको म्हणत असतानाही केली.

दोन खोल्या, बाथरूम, एक हॉल आणि एक स्वयंपाकघर असलेला हा फ्लॅट त्यात एक खोली तिला आणि श्रावणीला देण्यात आली.

त्याने आधीच उचलून चिऊला खोलीत झोपवले होते, नंतर शरण्या खोलीत गेली आपल्या मुलीला हृदयाशी कवटाळून मूक अश्रू गाळत होती. स्वतःची माणसे समजणाऱ्या तिच्या सासरच्यांनी तिला हाकलून दिले होते आणि अनोळखी लोकांनी तिला आणि तिच्या मुलीला आश्रय दिला होता. इथून पुढे काय हाच विचार तिच्या डोक्यात येत असताना रात्री उशिराने डोके आणि डोळे जड झाल्याने ती झोपून गेली.

सकाळी लवकर उठायची सवय असल्याने ती उठली आणि तिचे आवरून बाहेर आली तर अजून कोणी उठले नव्हते. मग चहा आणि नाश्ता बनवून ठेवला. कालच कुठे काय सामान ठेवले आहे हे तिला समजले होते. पुन्हा मुलीला उठवून तिचे आवरून घेतले.

सात वाजता बाहेर आली तर त्याच्या आईने नाष्टा सर्वांसाठी वाढून तिच्या खोलीजवळ यायला आणि तिने बाहेर पडायला एकच गाठ पडली.

"आजी.." चिऊ येऊन त्यांच्या पायाला बिलगली होती.

नातवंडाचे सुख पाहण्याची इच्छा असणारी त्याची आई, त्या 'आजी' ह्या हाकेने आनंदून गेली. त्यांनी पण तिला उचलून घेतले आणि गालावर हसून ओठ टेकवले.

चहा - नाश्ता झाला आणि ती हाताची चुळबुळ करत तिथे उभी असताना त्याने पाहिले.

"तुम्हाला काही बोलायचे आहे का?" त्याने तिची अस्वस्थ होणारी शरीराची हालचाल करणारी मुद्रा पाहून तिला विचारले.

"हो, ते माझ्या माहेरी फोन करायचा होता. मला सर्व सांगावे लागेल." ती म्हणाली.

"हो, तो टेलिफोन आहे पण बंद आहे. माझ्याकडे फोन नाहीये आपण त्यादिवशी त्या गुंडांना देवून टाकला. आईचा मोबाईलही कालपासून बंद आहे. मी दोन फोन ऑर्डर केलेत आज येतील. मग तुम्ही त्यावरून फोन करू शकता." अभय म्हणाला.

"हो, ठीक आहे."

फोन आल्यावर तिने आतल्या खोलीत जाऊन तिच्या घरी फोन लावला. तो नेमका तिच्या वडिलांनी उचलला होता. तिचे वडील, हे जुन्या विचारसरणीचे असल्याने आपल्या मुलीने माहेरी येऊन राहणे त्यांना पटत नव्हते. मुलीपेक्षा त्यांना इज्जत जास्त महत्त्वाची होती, म्हणून त्यांनी तिला ह्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत असे सांगून फोन ठेवून दिला.

एकामागून एक संकट येत होते. कोणीच तिला घरी घ्यायला तयार नव्हते. माहेरच्या लोकांनीसुध्दा पाठ फिरवली होती.

"तुझे बोलणे झाले का?" त्याच्या आईने विचारले.

"हो." ती निर्विकार चेहऱ्याने म्हणाली.

"कधी येत आहेत घ्यायला मग?" त्यांनी आनंदाने विचारले.

"मला अभयजींशी बोलायचे आहे." एवढे म्हणत ती हॉलमध्ये बसलेल्या त्याच्या समोर उभी राहत म्हणाली,
" तुम्ही माझी आजपर्यंत खूप मदत केली. माझी अजून एक मदत कराल का?"

तिचे जोडलेले हात पाहून तो तिच्याकडे आणि एकदा त्याच्या आईकडे पाहून म्हणाला," आधी ते हात खाली करा. मला जमेल ती मदत मी करेन. काय झालं?"

"निराधार स्त्रिया असतात त्यांच्यासाठी काही आश्रम किंवा राहण्याचे ठिकाण असेल तर सांगा. मी तिथे जायला तयार आहे. माझ्या माहेरच्यांनीही आता मला घरी येऊ नकोस असे सांगितले आहे." शेवटचे वाक्य बोलतांना तिच्या मनातले दुःख अश्रू रूपातून बाहेर पडले.

हे ऐकून अभय आणि त्याच्या आईला धक्काच बसला.

शरण्या पुढे काय करेल?
अभय मदत करेल का?

क्रमशः


🎭 Series Post

View all