नात्याची नवी पालवी भाग-९

अपूर्ण राहिलेल्या संसाराला दुसऱ्या संधीने दोन जीवांच्या नात्याला फुटलेली पालवी!
नात्याची नवी पालवी भाग-९

शरण्याने सांगितलेले ऐकून अभय आणि त्याची आई ह्यावर काय बोलावे ह्यासाठी शब्दांची जुळवणी करण्याचा प्रयत्न करत असताना अभयचा फोन वाजला.

"हो, त्या आता माझ्या घरीच आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला माझ्या घराचा पत्ता पाठवतो. तुम्ही जवळ आलात की, मला फोन करा. मी घ्यायला येतो." असे म्हणून त्याने फोन ठेवला.

"तुमचे सासरे इथे येत आहेत. त्यांना पोलीस स्टेशनमधून माझा नंबर आणि पत्ता मिळाला होता. तरीही एकदा फोन करून कल्पना देण्यासाठीच त्यांनी आता फोन केला होता." त्याने माहिती दिली.

थोड्याच वेळात अभय शरण्याच्या सासऱ्यांना आणायला गेला.
ते घरात पाऊल ठेवताच श्रावणी त्यांना पाहून,
"आजोबा, आजोबा." बोलत त्यांच्याकडे धावत गेली.

त्यांनीही हसूनच आपल्या नातीला उचलून घेतले.

थोडावेळ चहा-पाणी झाल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली.

"माफ करा, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. माझ्या बायकोने आमच्या सुनेला एवढ्या लहान मुलीसोबत घराच्या बाहेर काढले. मी बाहेरगावी गेलो होतो, आजच आलो तेव्हा मला हे सर्व समजले. आधी त्या संकटातून आणि आताही तुम्ही दोघींना इथे आसरा दिलात त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे." आधी दिलगिरी नंतर आभार व्यक्त करत ते म्हणाले.

"कोणाच्या घरात भांडणे नसतात भाऊ, पण त्यांनी असे बाहेर काढायला नको होते. असो, तुम्ही तातडीने इथे आलात हे बरे केले." त्याची आई म्हणाली.

"काकू, त्यांना घरात घ्यायला तयार झाल्या आहेत हे ऐकून खूप बरे वाटले." अभयही म्हणाला.

"माफ करा, पण मी तिला घरी घेऊन जाण्यासाठी नाही आलोय. माझी बायको खूप हट्टी आहे. त्यावर उपाय म्हणून मी माझ्या मुलाने आधी एक फ्लॅट घेतला होता. तिथे मी ह्या दोघींना राहण्याची सोय केली आहे. माझे काम फिरतीवर असते, उद्या पुन्हा असे काही व्हायला नको म्हणून मी असा निर्णय घेतला आहे." शरण्याचे सासरे म्हणाले.

त्यांच्या घरगुती गोष्टीत बोलणे अभय आणि त्याच्या आईला बरोबर वाटले नाही म्हणून त्याबाबत ते काहीच बोलले नाहीत. कुठेतरी शरण्यालाही वेगळे राहणे पटत नव्हते परंतु आता दुसरा पर्याय नसल्याने ती त्यांच्यासोबत जायला निघाली.

"अभयजी आणि काकू तुमचे खूप उपकार झाले. मला आणि माझ्या मुलीला तुम्ही सांभाळून घेतले आणि सुरक्षित ठेवले त्याबद्दल मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन."असे म्हणून तिने त्यांच्यासमोर कृतार्थ भावाने हात जोडले.

श्रावणीला त्या दोघांच्या आशीर्वादासाठी पाया पडायला सांगितले असता, आधी अभयच्या आईच्या आणि मग त्याच्याजवळ गेली असता त्याने तिला उचलून घेतले आणि गालावर ओठ ठेवून डोक्यावर हात ठेवत," नेहमी सुखी राहा आणि खूप मोठी हो." असा आशीर्वाद दिला.

तिला पुन्हा शरण्याकडे देताना त्याला खूप त्रास झाला. तिचे समोर असणे त्याच्या सवयीचे झाले होते. हे सर्व अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या त्याच्या आईने आणि तिच्या सासऱ्यांनी अचूक हेरले होते.

कधी कधी काही जागा आणि माणसे समाधान देतात. आधी थोडीशी साशंकता असते पण नंतर तिथल्या लोकांच्या सहवासाने आपसूकच तिथे राहणे आवडायला लागते. आपले मन जरी त्यासाठी प्रयत्न करत असले तरी डोके मात्र समाजाचे भान ठेवण्याचा आदेश देत असते. शरण्याला ते घर परके वाटलेच नव्हते. कारण त्याच्या आईने ती जे करत होती त्याला नाही म्हंटलेच नव्हते. तिच्या सासूने सगळ्या गोष्टीत खोट काढण्याचे सत्र लग्न झाल्यापासून चालूच ठेवले होते. आदरयुक्त भीती आणि त्या व्यक्तीच्या स्वभावाची भीती ह्या दोन भिन्न गोष्टी शरण्याने दोनच दिवसांत अनुभवल्या होत्या.

शरण्या आणि श्रावणी त्यांच्या सासऱ्यांनी ज्या फ्लॅटबाबत सांगितले होते तिथे तिघेही गेले. दोन दिवस निघून गेले. अभयही आपल्या कामात व्यस्त होता पण त्याची रात्र शरण्या आणि खास करून श्रावणीची आठवण काढल्याशिवाय सरत नसायची. त्याची आई पण शरण्याचे कौतुक करायची.

एक आठवडा असाच गेला. अभयने शाळेचे विद्यार्थी आणि त्याची शिकवणी ह्यातच स्वतःला गुरफटून घेतले.

एकदा रात्री अचानक फोन वाजला," हो, हो मी येतो लगेच." असे म्हणून त्याने फोन ठेवला.

एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये अभय आणि त्याची आई गेले होते.

"काय झालं? " त्याने काळजीने विचारले.

"दोन दिवसांपासून थोडा ताप होता. झोपेत तुमचेच नाव घेत होती. मघाशी ताप खूप वाढला आणि तिला मग इथे ॲडमीट केले." शरण्याचे सासरे म्हणाले.

"आधीच सांगायचे ना. मी आलो असतो. " तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर हात फिरवत तो म्हणाला.

"तुम्हाला उगाच त्रास नको म्हणून मी सांगितले नाही. डॉक्टर बोलले की ज्यांचे नाव घेत आहेत त्यांना बोलवा. तिला त्यांची आठवण खूप येत आहे. म्हणून मग तुम्हाला फोन केला." शरण्या अश्रू पुसत आपल्या लेकीकडे पाहून म्हणाली.

"अभी.. अभी.." तापाच्या ग्लानीत ती म्हणत होती.

अभी शब्द तिने अभयच्या आईच्या तोंडून सतत ऐकल्याने त्याला ती तशीच हाक मारत होती.

"डोळे उघड चिऊ. बघ, मी आलोय. तुझा अभी आलाय." त्याने तिचा हात हातात घेऊन तिच्या डोक्यावर त्याचा दुसरा हात फिरवत तो म्हणाला.

थोड्यावेळाने डॉक्टर येऊन तपासून गेले. शरण्या आणि अभयची आई तिथेच होती. अभय आणि तिचे सासरे डॉक्टरजवळ गेले. त्यांनी सांगितलेले ऐकून दोघेही आश्चर्यचकीत झाले.

"काय बोलले डॉक्टर? " शरण्याने त्यांना आलेले पाहून विचारले.

"थोडा ताप कमी झाला आहे. नंतर अजून होईल." एवढेच तिचे सासरे म्हणाले.

त्यांनी कॅन्टीनमध्ये चहा पिऊन येतो असे सांगून फक्त शरण्याला तिच्या लेकीसोबत थांबवले.

"काही गंभीर आहे का?" त्यांचे गंभीर चेहरे पाहून त्याची आई विचारत होती.

"मला एक सुचवायचे होते पण त्या आधी डॉक्टर काय बोलले ते सांगतो. डॉक्टर म्हणत आहेत की, अभयमध्ये श्रावणी तिच्याजवळची व्यक्ती पाहते. तिला वडील नसल्याने त्यांचे प्रेम तिला मिळाले नाही. मी जरी आजोबा असलो आणि शरण्या तिची आई तरी बाबांचे प्रेम हे वेगळे असते. तिच्या बालमनाने त्याला आपले मानले आहे. त्यामुळे हा ताप शारीरिक नाही. तिच्या मनात त्याला वारंवार पाहण्याची इच्छा होत होती, त्यामुळे ती फक्त नाव घेऊन बोलून दाखवत होती. त्यामुळे मला तुमच्याकडे एक प्रस्ताव मांडायचा होता."  पूर्ण सांगत असताना त्यांनी आशेने त्यांच्याकडे बघत सांगितले.

"बोला." त्याची आई म्हणाली.

"तुमच्या मुलाबद्दल मला आणि शरण्याबद्दल तुम्हाला सर्व माहीत आहे. दोघांचे पहिले संसार अर्धवटच राहिले. तुम्ही जर ह्या दोघांचा पुनर्विवाह करण्यास संमती दिली तर दोघांच्या आयुष्याची त्यांना नव्याने सुरूवात करता येईल." असे म्हणून त्यांनी दोघांकडे पाहिले.

"असे अचानक ? हे मला मान्य नाही." अभयला लग्नाचा विषय जीवनात पुन्हा नकोच होता.

"आम्हाला वेळ द्या. मग आम्ही आमचा निर्णय सांगतो. तुम्ही शरण्याला विचारले का?" त्याच्या आईने थोडा विचार करून शेवटी प्रश्न विचारला.

"नाही. आधी तुमच्याशी बोलावे मगच तिला विचारावे म्हणून मी आधी तुम्हालाच ह्याची कल्पना दिली." ते म्हणाले.

अभयला तिला न विचारता पहिले ह्यांना विचारलेले आवडले नाही. कारण तिचे मत पण त्यासाठी ग्राह्य धरले जावावे हेच त्याचे मत होते.


"आधी त्यांना विचारायला हवे होते. पहिलेच त्या बातमीने त्यांच्यावर अशी वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध तुम्ही कृपया काही करू नका. त्यांचे मत ऐकल्यावर आम्ही आमचे मत सांगतो." ती नकारच देईल हे गृहीत धरून तो म्हणाला.

"ठीक आहे." तिचे सासरे म्हणाले.

तिघेही पुन्हा त्या दोघींजवळ गेले.

"अभी.. " असे आनंदाने बोलत तिचा सलाईन लावलेला हात वर करत ती त्याला जवळ बोलवत होती.

"काय झालं आमच्या चिऊला?अशी आजारी कशी काय पडली?" श्रावणीजवळ जात तो म्हणाला.

"तू कुठे गेला होता? " ती विचारत होती.

"काम होते बाळा, म्हणून मी बाहेर गेलेलो." काहीतरी कारण द्यायचे म्हणून तो म्हणाला.

"आता कुठे जावू नको." ती त्याचा हात हातात घेत म्हणाली.

"हो बाळा, नाही जात आता कुठेच." तो तिचा नाजूक हात हातात घेत म्हणाला.

दोन दिवसांपासून आपल्या मुलीचा उतरलेला चेहरा त्याच्यामुळे किंचित उजळलेला शरण्यानेही पाहिला होता.तिच्या नवऱ्याची कमी तिला नेहमीपेक्षा आज जास्तच जाणवत होती.

अभय होकार देईल का?
शरण्या दुसऱ्या लग्नासाठी तयार होईल का?

क्रमशः

🎭 Series Post

View all