नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 30

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच

नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 30

©️®️शिल्पा सुतार

जेवण झाल.

"सुरभी आटोप आता." नंदा ताई बोलल्या.

सुरभी पूजा कडे बघत होती.

"टेंशन घेवू नकोस सुरभी. रडणं तुझ्या तब्येती साठी चांगल नाही आणि तस ही तू सासरी येणार पण मीच खूप घाबरलो आहे. कस होईल माझ. परमनंट बॉस येणार. माझ स्वतंत्र गेल." सचिन बोलला. पूजा आणि तो हसत होता.

सुरभी थोडी हसली. ती पूजा सोबत सामान आणायला गेली.

निघायची वेळ झाली. ती ... पूजा आणि सौरभशी बोलत होती. " वहिनी दादा येत जा आमच्याकडे."

"हो नक्की."

"आता तिकडे गावाकडे सत्यनारायणाची पूजा आहे. रीसेप्शन आहे. तुम्ही या दोघ. पूजा लवकर ये माझ्या मदतीला ." नंदाताई आमंत्रण देत होत्या.

"हो नक्की येवू. "

" आणि लक्षात ठेवा की या लग्नाबद्दल कुठे काही सांगायचं नाही." त्यांनी आठवण दिली.

" हो आम्ही लक्ष्यात ठेवू. "

निघताना सुरभीचे डोळे भरलेले होते. ती सौरभच्या आसपासच होती. सौरभ ही गप्प बसलेला होता. एकदम गहिवरून आल होत. पूजा सौरभला समजावत होती.

"दादा वहिनी येते मी. "

तो पटकन येवून भेटला. दोघांच्या डोक्यात पाणी होत. "पुरे सुरभी रडू नकोस. किती छान स्थळ मिळाल आहे."

नंदा ताई ही समजावत होत्या. "जवळ जवळ घर आहेत. हव तेव्हा येत जा. एकमेकांना तुमचा तर आधार आहे. शांत हो सुरभी. हसुन निरोप दे. "

"सुरभी मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. खूप चांगले आहेत सचिन साहेब. अजिबात काळजी करायची नाही. छान आनंदाने राहा."

" दादा तू ठीक आहेस ना? "

" हो मला तर उलट खूप आनंद होतो आहे."

सौरभ तिला घेवून सचिन जवळ आला.

" सौरभ सुरभी रडू नका ना." सचिनला कसतरी वाटल. .

"दादा वहिनी कडे बघून इमोशनल व्हायला होत आहे. " सुरभीने सौरभचे डोळे पुसले.

" ते होतं तरी त्रास नको करून घेवू. नाहीतर अस करु या का. मी तिकडे येतो आपण सौरभ कडे राहू. " सगळे हसत होते.

"अरे मला काही प्रॉब्लेम नाही. काय ठरतय मग सुरभी?" सचिन बोलला.

"आपण आपल्या घरी जावु. "

" मग रडायच नाही." तिने हो अशी मान हलवली.

ते कार मधे येवून बसले. सौरभ पूजा सोबत होते. " निघतो आम्ही."

सुरभी अजूनही सौरभ कडे बघत होती. कार निघाली. तिने परत डोळे पुसले.

"किती रडणार सुरभी. कसली काळजी करतेस. तुला अस वाटत नाही ना की मी तुला त्रास वगैरे देईल. " सचिन बोलला.

" नाही सचिन. तू चांगला आहेस. " सुरभी पटकन बोलली. गैरसमज नको.

" तू बरोबर विचार करते आहेस. मी तुला त्रासून सोडणार आहे. तुझी अशी सुटका नाही. दिवस रात्र आता माझ्या सोबत रहाव लागेल. आणि मी म्हणेन ते ऐकायच. " सचिन हसत होता.

सुरभी लाजली. रडता रडता हसली. आता ती सचिनला मारत होती.

" काळजी करू नकोस. मी आहे तुझ्यासाठी आणि सौरभ साठी ही. "

"हो तू नेहमीच चांगला वागतोस. प्रमाणा पेक्षा जास्त दिलस. " सुरभीने त्याचा हात धरला.

" यापुढे तुला कधी काही सांगायचं असलं तर मला सांगत जा. काही हव असले तर मला मागत जा. टेंशन घ्यायच नाही."

"हो. तू दादासाठी जे केल ना त्यामुळे ते दोघ आनंदात आहेत. नाही तर आधी खूप प्रॉब्लेम होते. परिस्थिती मुळे ते भांडत असायचे. खूप थँक्स. दादा वहिनी खुश आहेत हे बघून मला फ़ार बर वाटत. " सुरभी मनापासून बोलली.

पुरे. सचिन हसत होता.

"आता काय झालं हसायला ?" सुरभी ही थोडी हसली.

"आपलं प्रेम खूप ओतू चाललं आहे ना."

आता सुरभी लाजली, तो तिच्या तिच्याजवळ सरकून बसला.

" अहो तिकडे सरका ना. आता म्हणू शकते ना अहो." सुरभी नाजूक आवाजात बोलली.

"तुला आठवत आहे सुरभी आधी मी तुला अहो म्हणायची. ज्याम वैतागलो होतो मी त्या अहो ला. " सचिन हसत बोलला.

"त्यात वैतागण्यासारखं काय आहे? बायका असंच हाक मारताना नवऱ्याला."

" अजून काय काय म्हणतात बायका नवऱ्याला? "

सुरभीने त्याला बाजूला ढकललं.

" सांग ना सुरभी मी नाही वैतागणार. "

"आता नाही नंतर. घर आल." ती बाहेर बघत होती. वेगळा आहे हा बंगला.

"आवडल का आपल घर?"

हो.

हा एरिया खूप पॉश होता. आधीच्या घरा पेक्षा बराच मोठा होता हा बंगला. पुढे मागे दोघी कडे गार्डन होत. मागे स्विमिंग पूल ही होता. बाजूला दोन कार उभ्या होत्या.

घरी आल्यानंतर नंदाताईंनी स्वागत करून तिला घरात घेतलं. घरात वेगळ वाटत होत. सुरभी सगळीकडे बघत होती. मालू काकू होत्या, तिकडच्या मावशी होत्या. बरेच लोक होते कामाला.

एका बाजूला एक बेडरुम होती. मोठ्या तीन बेडरूम वरती होत्या. सुरभीच सामान वरती नेल. तिला काही सुचत नव्हत ती सोफ्यावर बसुन होती. जा बेटा देवघरात दोघांनी नमस्कार करा. बाकी खेळ नव्हते. थोड्या वेळाने साध्या पद्धतीने हळद उतरवली.

सगळेच थकले होते. जेवण झालं. सुरभी रूम मधे होती. आवरत होती. नंदाताई आत आल्या. त्या आज सुरभी जवळ झोपल्या.

सचिनचा मेसेज येत होता. "झोपली का?"

"नाही जागी आहे."

" मला भेटायला ये बाहेर बागेत. "

" नाही सचिन, शक्य नाही आई उठल्या तर?"

"तिला माहिती आहे आपण दोघं आधीपासून सोबत राहायचो. तिच्यासमोरच तर आपण गावाकडे आपण एका रूम मधे होतो." सचिनने आठवण करून दिली.

" तर काय झालं? तेव्हा आपण फक्त फ्रेंड्स होतो. आता नवरा बायको आहोत. मी येणार नाही." सुरभी बोलली.

" मी किती चांगला होतो ना. तुला नीट सांभाळल."

" तू खरच चांगला आहेस प्रश्नच नाही. पण तरी ही मी येणार नाही. "

" मला घाबरली का? " सचिन हसत होता.

" त्यात काय घाबरण्यासारखं? मोठ्यांचा मान वगैरे काही ठेवायची पद्धत आहे की नाही. "

" तू सगळ्यांचा विचार करते. माझा सोडून. " सचिनने रागाचा ईमोजी पाठवला.

" हे बघ सचिन आपल आजच लग्न झालं आहे. आपण नको भांडूया."

"हो ना. आपल आजच लग्न झाल तु अशी करतेस. जरा मला समजून घे. मी म्हणतो ते ऐक आणि पाच मिनिटं बाहेर ये. " तो रीक्वेस्ट करत होता.

" एक तर हे घर नवीन आहे. काही सुचत नाही. काय अस सचिन? नंतर आयुष्यभर सोबत राहणार आहोत ना. मी येणार नाही. तू पण आत जाऊन झोपून घे. घरात बाबा आहेत आई आहेत. "

" आजच्या दिवसाच महत्व वेगळ आहे. ये ना मी हॉल मध्ये आहे पटकन ये. पाच मिनिट एकदा मिठीत ये. बाकी काही नाही."

" ठीक आहे मी येते . "

ती बघत होती नंदा ताई झोपल्या का. तिची उठण्याची हिम्मत होत नव्हती. पण सचिनलाही नाराज करता येणार नाही. ती हळूच उठली बाहेर आली. सगळीकडे अंधार होता. हळू हळू बाहेर आली. सचिन.. तिने हळूच हाक मारली त्याने मागून तिला हळूच मिठी मारली. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं.

" तू तुझ्या मनाप्रमाणेच करणार आहेस ना सगळं सचिन. अजिबात ऐकत नाहीस तू? आई उठल्या तर?" सुरभी हळूच बोलली.

" उठू दे. आता आपण कपल आहोत. मला झोप येत नव्हती ये. इकडे ये."

ते एका रूम मधे गेले.

"कोणाची आहे ही रूम छान मोठी आहे. समोर मोठा टेरेस होता तिथून खालचा स्विमिंग पूल दिसत होता. "

" आपली आहे. माझ्याजवळ ये. " दोघं मिठीत होते खूप आनंदी होते. बर्‍याच वेळ ते बोलत बसले.

" मी जाते सचिन. तू ही आराम कर."

" इथे थांब ना. "

"नको आईंचा मान ठेवायला हवा. "

" ठीक आहे. "

सकाळी लवकर नंदाताई सुरेशराव रेडी होते. सुरभी आवरत होती. सचिन अजूनही झोपलेला होता. त्या त्याला उठवायला आल्या." सचिन उठ चल निघायचा आहे."

तो आवरून आला. सुरभी सगळ्यांना चहा देत होती. तो सुरभी कडे हसून बघत होता.

"आटपा मुलांनो निघायला हव. तुम्ही किती उशिरा उठतात ."

"माझी झोप झाली नाही. किती घाई करत तुम्ही लोक. काय करणार एवढ घाई ने घरी जावून ." सचिन बोलला.

" मग रात्री कशाला इकडे तिकडे करावं. शांत पणे आराम करावा ना." नंदा ताई अस बोलल्यावर. सचिने सुरभी कडे बघीतल. ती पण गडबडली.

" काय झालं? हा इकडे तिकडे फिरत होता का?" सुरेश राव विचारत होते.

"हो ना. सारख सुरभीच्या मागे असतो तो. "

सुरभी पटकन किचन मधे निघून गेली. ती नाश्ता घेवून आली. तिने प्लेट्स भरल्या." पटापट खा सचिन आणि चला निघा आता. घरी सगळे वाट बघत आहेत."

हो.

"सचिन बॅग भरली का? "

" नाही. सुरभी चल आत, मला मदत कर."

" सुरभी येणार नाही. तू तुझ आवर सचिन. तुझी तुझी बॅग तू भर. ती सकाळपासून काम करते आहे." नंदा ताई ओरडल्या.

सचिनचा हिरमोड झाला. त्याला वाटलं त्यानिमित्ताने सुरभी बरोबर परत थोडा वेळ घालवू

सुरभी थोडी हसत होती. सचिन चिडला. तुला नंतर बघतो मी.

सुरभी आत जाऊन तयार होऊन आली. ते घरी जायला निघाले.

नंदाताई सुरेशराव दुसऱ्या गाडीत होते

मागच्या गाडीत सुरभी आणि सचिन होता. सचिन सारखा तिच्याकडे बघत होता. सुरभीने सुंदर हिरव्या रंगाची साडी नेसली होती. हात बांगड्या होत्या. मेहेंदी मुळे हात खूप छान दिसत होते. त्याने तिचा हात हातात घेतला. "किती छान वाटतो असा प्रवास. आपण थोड्या वेळाने गेलो असतो ना. आई बाबांना घाई होती तर ते पुढे गेले असते. तेवढच आपण थोड्या वेळ सोबत राहिलो असतो."

"अस काय बोलतोस सचिन बरोबर वाटत का?"

" तुझा काय प्रॉब्लेम आहे. सगळ्या गोष्टीला तू घाबरते. आणि तू इतर वेळी अशी तयारी का करत नाही. सगळे असले कीच नटून थटून बसते. मला तू तयार झालेली आवडते. " सचिन बोलला.

"जनरली बाहेर जातांना तयारी करतात ना? घरी काम करताना कोणी इतकं सिरीयल सारखं नटून बसत का?" सुरभी हसत बोलली.

"अच्छा असं आहे का नंतर बघतो तुला. तुझी हिम्मत खूप वाढली आहे. आज रात्री तू माझ्या रूममध्येच राहणार ना."

सुरभी हसत होती तिला माहिती होत पूजा आणि रिसेप्शन झाल्याशिवाय आम्हाला एकत्र राहता येणार नाही. पण ती सचिनला काही बोलली नाही.

घर आलं मनू पळत आली. "वहिनी चल आत." ती दोन मिनिट तिच्याकडे बघतच राहिली." वहिनी तू आज खूप वेगळीच दिसते आहे. किती सुंदर. साडी का नेसली आहेस? वाव हातावर मेहंदी किती सुंदर आहे. काय विशेष?"

"काही नाही ग इकडे पूजा आहे ना म्हणून लावली आहे मेहंदी."

" अरे वा पूजा आहे का? चल लवकर तुझी पर्स घे बाकीचे सामान दादा घेईल. " मनु बोलली.

" हो बरोबर आहे मी त्यासाठी तर लग्न केलं आहे हिच्याशी." सचिन बोलत सामान काढत होता.

तोपर्यंत सुरभी आणि मनु आत जात होत्या. दरवाजातच त्यांना थांबवलं.

"काय आहे आई? "

" थांब तिला ओवाळून आत घेऊ दे. "

आजी आल्या आतून." आता हे काय नवीन? आरती का करतेस. "

" असू द्या आई. " नंदाताईंनी त्या दोघांना ओवाळल. कुमकुम मिश्रीत पावलांनी ती घरात आली. दोघांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. सचिनने तोपर्यंत सगळं सामान त्यांच्या रूममध्ये ठेवलं. तो खुश होता.

सुरभी मनु सोबत होती. मनु तिचे दागिने साडी आणि मेहंदी बघत होती. आजी येऊन बसल्या." सुरभी तू किती वेगळीच दिसते आहेस."

"हो ना आजी. मी पण तेच म्हटलं होतं वहिनीला. खूप सुंदर दिसते आहे ही अगदी नवरी ." मनु बोलली.

दुपारचं जेवण झालं. नंदाताई सुरेशराव पुढे बसलेले होते. नंदाताई लिस्ट करत होत्या. त्या फोनवर बोलत होत्या.

दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. लगेच देवदर्शन होतं. नंतर रिसेप्शन होतं.

त्यांनी आजींना बोलावलं. त्या आजींना सगळे कार्यक्रम सांगत होत्या.

"पण सचिनला चालणार आहे का आता हे पूजा आणि रिसेप्शन."

"हो आता तो हो म्हणतो आहे."

"चालेल मग."

कोणा कोणाला बोलवायचं ते नंदाताई सांगत होत्या. सचिन सुरभी मनू येऊन बसले.

"एवढे पाहुणे येणार आहेत आपल्याकडे?" मनू विचारत होती.

"हो दोन दिवस पाहुणे असतील."

"एवढ्या लोकांना बोलवायची काय गरज आहे? " सचिन बोलत होता.

" याला तर पाहुणे नको वाटतात. काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही. तू गप्प रहा जरा सचिन."आजी रागवल्या.

सुरभी आणि मनु हसत होत्या.

" तुम्ही दोघी शांत रहा जरा." सचिन ओरडला.

" हो सुरभी, मनु अजिबात इकडे तिकडे करायच नाही. शेतावर जायच नाही. मनु तू उत्साह आवर." नंदा ताई ओरडल्या.

" जा बेटा सुरभी कपडे बदलून थोड्यावेळा आराम कर. मनू हिला तुझ्या रूममध्ये ने."

सचिन ऐकतच राहिला. "वहिनी तू माझ्यासोबत राहणार? "

हो.

मनु खूप खुश होती. सुरभी आणि मनुने सचिनच्या रूममध्ये जाऊन बॅग घेऊन पुढे चालल्या गेल्या.

सुरभीने साडी बदलून ड्रेस घातला. तिने जरा वेळ झोपून घेतल. संध्याकाळी किचनमध्ये सगळ्यांचा आवाज येत होता. सुरभी उठून गेली सगळेजण चहा घेत होते.

" सॉरी मला खूपच झोप लागून गेली."

सचिन तिच्याकडे बघून काहीतरी खुणवत होता. तिला समजलं नाही. ती चहा घेऊन त्याच्याजवळ जाऊन बसली.

"आपण जरा वेळ टेरेसवर जाऊया का सुरभी?"

"हो चालेल."

मनु आशिष सोबत सुरभी टेरेस वर आली. सचिनने डोक्याला हात लावून घेतला. "या दोघांना का आणल सोबत?"

"अरे अस काय करतोस सचिन?"

"त्यांना खाली पाठव मला तुझ्या सोबत वेळ घालवायचा आहे. " सचिन बोलला.

"अस कस बोलणार? तू पण अति माझ्या मागे मागे करतो आहेस. शांत रहा जरा सचिन. " सुरभी चिडली.

"अरे काल तर लग्न झाल आपल. इतके दिवस शांत होतो की. "

सुरभी खूप हसत होती.

"हे असा त्रास देते तू मला. एक तर इतकी सुंदर दिसते आहेस . "

"वहिनी इकडे ये ना. तुम्ही काय तिकडे बोलत आहात. " मनु बोलवत होती.

आली... सुरभी तिकडे गेली.

रात्री जेवताना खूप मजा आली. आशिष, मनु नुसते सुरभीच्या मागे होते. सचिन आजी जवळ बसला होता. नंदा ताई गम्मत बघत होत्या. " सुरभी तुझ झाल असेल तर सचिन सोबत जा जरा आईस्क्रीम घेवून ये. "

सचिन आनंदाने उठला. मनु, आशिष ही रेडी होते. ते ही सोबत गेले. सुरेशराव, नंदाताई हसत होते.

" सचिन वैतागला आहे." सुरेशराव बोलले.

"हो ना त्याची बायको त्याला कोणी देत नाही. उद्या पूजा झाल्यावर रहा म्हणा आरामात. " नंदा ताई बोलल्या.

घरी आल्यावर सुरभी मनु सोबत आत निघून गेली. सचिन एकटाच रूम मधे ऑफिसच काम करत होता.


🎭 Series Post

View all