Login

नात्यांचा गोडवा - जिव्हाळा - भाग ३

कुटुंबातील व्यक्तींचा एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा

नात्यांचा गोडवा -
जिव्हाळा - भाग - ३

सुनंदा दीक्षित आणि त्यांच्या मैत्रिणी एकमेकींचा निरोप घेऊन आपापल्या घरी गेल्या. संध्याकाळी विभा आल्यावर आई तिच्याशी काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी मूकपणेच तिला खाणं आणि चहा दिला. पण नेहमीसारख्या त्या अगत्याने तिच्याशी बोलल्या नाहीत. विभाला खूप आश्चर्यच वाटलं. आईनी मात्र मधल्या वेळात मंदारला फोन करून विभाला मिळालेल्या संधीबद्दल सांगितलं. त्याला सुद्धा खूप आनंद झाला. बाबा घरातच होते ते सुद्धा खूप खुश झाले. चहा पिऊन झाल्यावर विभा आईना म्हणाली,

"आई तुमचं काही बिनसलं आहे का? माझ्याकडून काही चूक झाली का? तुम्ही माझ्याशी नेहमीसारखं बोलत नाहीत. काय झालं आहे?"

"काही बोलू नकोस माझ्याशी. इथे तू मला आई म्हणतेस आणि माझ्यापासून कधीपासून तू गोष्टी लपवायला लागलीस? याचाच अर्थ तू मला तुझी सासूच समजतेस."

"आई नक्की काय झालं मला कळेल असं काहीतरी बोला ना." इतक्यात मंदार आणि बाबा पण तिथे आले.

"अगं तुला ऑफिस मधून फॉरेनला जायची संधी मिळते आहे आणि तू स्पष्ट त्याला नकार देतेस. अशी संधी सहजासहजी कोणाला मिळत नाही मग तू या संधीचं सोनं करायचं सोडून सरळ नाही का म्हणालीस?"

"आई तुम्हाला तर माहिती आहे मी प्रतीक आणि तुम्हा सगळ्यांपासून अजिबात दूर राहू शकत नाही. मी तिथे गेल्यावर माझ्या कामाचे १००% तर देऊ शकणार नाही. माझं अर्ध लक्ष तिकडे अर्ध लक्ष इकडे असणार. प्रतीकला पण माझ्या वाचून करमणार नाही. घरात पण तुमच्यावरच सारा कामाचा भार पडेल."

'अगं पण तू मंदारला, घरात सुद्धा काही बोलली नाहीस. आपण सगळ्यांनी विचार करून, समजून निर्णय घेऊया ना. मला तर वाटते तू ही संधी सोडू नयेस. फक्त दीड वर्षाचा प्रश्न आहे.दीड वर्ष कसं निघून जाईल कळणार सुद्धा नाही."

"आई मी आहे त्या पोझिशन वर खुश आहे. मला आता कोणत्याही गोष्टीचा जास्त मोह नाहीये. तुमच्या सगळ्यांच्या जवळ राहावं, तुमचं प्रेम हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे."

"अगं इथली सगळी जबाबदारी घ्यायला मी आहे शिवाय बाबा पण आहेतच माझ्या मदतीला आणि राधाबाईना आपण सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत‌ बोलावू. माझे जे काही ज्येष्ठ नागरिक संघ ,भजनी मंडळ आहे ते प्रतीकच्या शाळेच्या वेळेत असतात त्यामुळे ती काळजी करू नको. प्रतीकला पण आमची सवय आहे त्यामुळे तो आमच्याकडे नक्कीच छान राहील."

आईंचं बोलणं झाल्यावर मंदार तिला समजावत म्हणाला,

"हे बघ विभा तू असा विचार कर जर मला ही संधी मिळाली असती तर मी नक्कीच गेलो असतो ना बाहेर आणि तुम्ही मला पाठिंबाच दिला असता. तू एक स्त्री आहे म्हणून तू जायचं नाही याला काही अर्थ नाही. आम्ही सगळे इतक्या कोत्या मनोवृत्तीचे नक्कीच नाही. तुला आमच्यापासून फक्त दीड वर्ष‌ लांब राहायच‌ आहे. आता पूर्वीसारखं फक्त पत्र, फोन यावरच कम्युनिकेशन अवलंबून नाही तर रोज व्हाट्सअप,व्हिडिओ कॉल होऊ शकतो. तू प्रतीकची अजिबात काळजी करू नकोस मी माझा जास्तीत जास्त वेळ त्याला देण्याचा प्रयत्न करेन." त्याची री ओढत बाबा म्हणाले,

"आमच्या सर्वांचा एवढा विचार करणारी सून आम्हाला मिळाली त्याबद्दल मला तुझा खूप अभिमान आहे. तू निश्चिंत मनाने जा काहीच काळजी करू नकोस तुझ्या सरांना तू तुझा होकार कळवून टाक." सर्व बोलत असताना प्रतीक तिथे आला आणि समजुतीच्या स्वरात म्हणाला,

"आई तू खरोखर जा. मी रडणार नाही, कोणाला त्रास देणार नाही. मी शहाण्यासारखा वागेन. मी आता मोठा झालोय ना. तू येताना माझ्यासाठी खूप कार्स घेऊन ये."

प्रतीकचं हे शहाण्या बाळासारखं बोलणं ऐकून विभाला खूपच आश्चर्य वाटलं. प्रतीक इतका मोठा कधी झाला कळलंच नाही. खरं तर इतर मुलींना घरातून साध्या साध्या गोष्टीत सुद्धा किती विरोध होतो पण इथे तर मला सगळे पाठिंबा देत आहे. तसं बघायला गेलं तर दीड वर्ष पटकन निघून जाईल. आपल्याला एक नवीन अनुभव मिळेल. सर्वांनी समजावल्यामुळे तिलाही ही संधी खुणावू लागली. ऑफिसमध्ये गेल्यावर सर्वजण तिला हेच सांगत होते. ऑफर देऊन आठ दिवस झाले होते म्हणून सरांनी तिला केबिनमध्ये बोलावले.

"मला असं कळलं की तू घरी काहीच बोलली नाहीस. मी असंही ऐकलंय की तुझे घरचे खूप सपोर्टीव्ह आहेत."

"हो सर मी घरी बोलले नाही पण माझ्या सासूबाईंना बाहेरून कुठून तरी कळलं आणि मग घरातल्या प्रत्येकाने इतकंच काय माझ्या सहा वर्षाच्या प्रतीकने सुद्धा मला असाच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मी तुम्हाला ही संधी स्वीकारते असं सांगणारच होते."

"व्हेरी गुड विभा. तुला जपानसारख्या अद्ययावत टेक्नॉलॉजी असलेल्या देशात खूपच वेगळा अनुभव मिळेल. माझी खात्री आहे तू ह्या संधीचं नक्कीच सोनं करशील. खूप खूप शुभेच्छा. आता तुझं ऑफर लेटर आणि इतर डिटेल्स लवकरच मिळतील."

आपण आजूबाजूला पाहतो तर काही ठिकाणी सासरी सुनांना खूप त्रास सहन करावा लागतो तर काही ठिकाणी सुनाच सासरच्याना सळो की पळो करतात. विभासारख्या हुशार मुलींना सासरच्यांची साथ मिळाली तर त्या लग्नानंतर सुद्धा आपली ध्येय गाठू शकतात. कसं असतं ना जिथे दोन्ही बाजूंनी प्रेमाची, आपुलकीची चढाओढ असेल, तिथे फक्त मोगराच फुललेला दिसेल, नाही का!

समाप्त

©️®️ सीमा गंगाधरे

🎭 Series Post

View all