Login

नात्यांचा गोडवा - जिव्हाळा - भाग १

कुटुंबातील व्यक्तींचा एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा

नात्यांचा गोडवा -
जिव्हाळा - भाग १


"आई मी येते हं" सकाळी आठच्या ठोक्याला विभानै पायात सॅंडल सरकवत आईंना म्हणजेच तिच्या
सासूबाईना म्हटलं.

"अगं किती धावपळ करतेस. तुला किती वेळा सांगितलं थोडं काम माझ्यासाठी ठेवत जा मी करत जाईन."

"कधी उशीर झाला तर आई तुम्ही करताच. मला होईल तेवढं मी करून जाते शिवाय प्रतीकसुद्धा तुमच्याकडेच असतो ना दिवसभर."

"बरं नीघ आता. डबा घेतलास ना. वेळेवर खा तो."

विभा एका आयटी कंपनीमध्ये इंजिनीयर म्हणून कार्यरत होती. 'टीम लीडर' ह्या महत्वाच्या पदाचा कार्यभार ती सांभाळत होती. इतकं असूनसुद्धा तिला‌ कसलाच गर्व नव्हता. रोज सकाळी लवकर उठून घरातले सर्व आवरून ती तिच्या वेळेवर ऑफिसला जात होती. एकत्र कुटुंबात राहत होती. घरात नवरा मंदार, त्याचे आई बाबा आणि मंदार व विभाचा मुलगा प्रतीक असे सगळे आनंदाने राहत होते. विभाला संध्याकाळी ऑफिसमधून यायला उशीर व्हायचा त्यामुळे तिच्या मनात एक प्रकारची अपराधीपणाची भावना होती.

विभा जागेवर स्थानापन्न होताच थोड्या वेळाने तिला तिच्या बॉसने केबिनमध्ये बोलावलं.

"यस सर!"

"विभा येत्या बुधवारी तुम्हा सर्वांसाठी मी टीम लंच अॅरेंज केलं आहे त्याची सर्वांना कल्पना दे. तुमच्या सर्वांसाठी तेव्हा एक गुड न्यूज असेल. अर्थात ती काय हे मी तेव्हाच जाहीर करेन." विभाने तिच्या सर्व सहकाऱ्याना टीम लंच बद्दल सांगितलं आणि त्यावेळी सर काहीतरी गुड न्यूज देणार आहेत असंही सांगितलं. हे ऐकून सर्वांचं
विचारचक्र सुरू झालं. काय असेल गुड न्यूज! आपल्याला सॅलरी राईझ की प्रमोशन असेल. विभा त्यांना म्हणाली,

"आता बुधवार आहेच ना परवा बघूया सर काय सांगतात. तोपर्यंत मस्त मजेत राहून छान काम करा."

विभाबद्दल सर्व सहकाऱ्यांना प्रचंड आदर होता कारण ती नेहमीच सर्वांना कामात आणि वैयक्तिक अडचणीत मदत करायची. हे सगळं करताना तिला कधीकधी शारीरिक त्रास व्हायचा पण ती कधीच कोणालाही काही बोलायची नाही. तिच्याबद्दल कोणाच्याही मनात आकस नव्हता. ती 'टीम लीडर' या पदावरती अगदी योग्य व्यक्ती होती.

संध्याकाळी घरी येताना तिने प्रतीक साठी खाऊ आणि आईंसाठी मोगऱ्याचा गजरा घेतला. श्रावणी सोमवार असल्यामुळे आज काहीतरी गोडाचं करू असं तिने ठरवलं. ती घरात शिरल्यावर प्रतीकने तिला मिठी मारली. किती वेळाने आपण आपल्या मुलाला भेटतो या विचाराने तिचं मन गहिवरून आलं.

"आई आज काय खाऊ आणला माझ्यासाठी."

"तुला मॉन्जिनीसची पेस्ट्री आवडते ना तीच आणली आहे." त्याच्या हातात तिने पेस्ट्री आणि आईंच्या हातात मोगऱ्याचा गजरा दिला. त्यांच्या डोळ्यातील कौतुक तिने नजरेने जाणलं.

"तू नेहमी नेहमी माझ्यासाठी गजरा कशाला आणतेस "

"आई उद्या तुमची ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा आहे ना तेव्हा गजरा घालून जा. केसात गजरा माळल्यावर मन कसं प्रसन्न होतं आणि आजूबाजूच्यांना सुद्धा त्याचा सुवास मिळतो."

"अगदी खरं."

विभा हातपाय धुऊन येताच आईंनी तिच्यासाठी गरम गरम कांदेपोहे आणि आलं घातलेला वाफाळता चहा ठेवला. त्यांचं हे कृत्य तिच्या मनाला स्पर्शून गेलं.

"तुम्ही मला गजरा कशाला आणते म्हणता आणि तुम्ही माझ्यासाठी रोज काहीतरी गरमगरम नाश्ता, चहा करून मला हातात देता." इतक्यात मंदार घरात शिरला.

"अरे वा लाडक्या सुनबाईचे खूपच लाड चालले आहेत."

"ए तू तिच्यावर जळू नकोस. आणि ती माझी सून नाही लेकच आहे. जा तू पण लवकर फ्रेश होऊन ये तुला पण खायला देते."

विभाला आपण सासरी आहोत असं कधी वाटलंच नाही. घरातले सर्वच तिच्यावर खूप प्रेम करायचे. तिच्या इतर मैत्रीणी नेहमी सासूबद्दल किती त्राग्याने बोलायच्या, त्यांना किती सासुरवास सहन करावा लागतो इत्यादी आणि म्हणून सगळ्यांना विभाचा खूप हेवा वाटायचा. ती आईना म्हणाली,

"आज श्रावणी सोमवार आहे. मी थोडी शेवयांची खीर करते रात्रीच्या जेवणात."

"हो हो कर ना. बाकीची सगळी तयारी करून ठेवली आहे. पोळ्या पण झाल्या आहेत."

"तेलकट पुऱ्यांपेक्षा पोळ्याच बऱ्या." इतक्यात बाबा पण संध्याकाळचा फेरफटका मारून आले होते. शेवयांची खीर म्हटल्यावर खुश होऊन म्हणाले,

"आज सकाळपासूनच मला वाटत होतं की काहीतरी गोड खायला मिळेल. विभा जरा जास्तच कर गं खीर."

"हो बाबा मला माहिती आहे तुम्हाला खीर खूप आवडते."

जेवण झाल्यावर आई तिला आवरायला मदत करू लागल्या. तिने त्यांच्या हातातील भांडी घेऊन म्हटलं,

"आई तुम्हाला किती वेळा सांगितले जेवण झाल्यावर तुम्ही बाहेर बसत जा मी आवरत जाईन. दिवसभर किती दमता तुम्ही."

"अगं एकीला दोघी असलो की भरभर आवरलं जात. तू पण ऑफिसमध्ये दमतच असशील ना."

दोघींचा असा प्रेमळ संवाद संपल्यावर दोघी हॉलमध्ये येत. त्या येईपर्यंत टीव्ही चालू असायचा. त्या दोघी आल्यावर टीव्हीला सक्तीची विश्रांती मिळत असे. दिवसभरात काय झालं हे सर्वात आधी प्रतीक सर्वांना सांगत असे. मग मंदार, विभा सगळेच दिवसभरातल्या घडामोडी एकमेकांना सांगत. रात्री ठराविक वेळी सगळे झोपायला जात.

रात्री झोपताना विभाच्या मनात विचार आला सर जी काही गुड न्यूज सांगणार असतील ती सगळ्यांसाठी असावी म्हणजे कोणीच नाराज होणार नाही. मंदारच्या मनात विचार चालले होते की विभा सासरी आहे पण कधीच तिच्या चेहऱ्यावर नाराजी नसते. सगळ्यांचे किती प्रेमाने करते. आई बाबा पण तिच्यावर खूप खुश आहेत.

(विभाचे सर काय गुड न्यूज सांगणार पाहूया पुढील भागात)