नात्यांचा गोडवा -
जिव्हाळा - भाग - २
जिव्हाळा - भाग - २
ऑफिस मधील सर्वांनाच कधी एकदा बुधवार उजाडतो असं झालं होतं आणि एकदाचा बुधवार उजाडला. सर्वजण खूप उत्सुकतेने ऑफिसमध्ये आले होते. लंच मध्ये सर काय सांगणार याबद्दलच सगळे चर्चा करत होते. कोणी म्हणत होतं प्रमोशन असेल तर कोणी म्हणत होतं आपल्याल्या सॅलरी राईझ देणार असतील सर. अशी चर्चा झाल्यानंतर सर्व आपापल्या कामाला लागले. दुपारी एक वाजता टीम लंच होतं. सर तिथे आल्यावर सर्वांनी जेवण घ्यायला सुरुवात केली. खरंतर जेवणामध्ये कोणाचेच लक्ष नव्हतं. सर त्यांना म्हणाले पण की कोणी कसलेही टेन्शन घेऊ नका सर्वांनी पोटभर जेवा.
लंच झाल्यावर सर्वजण स्थानापन्न झाले. सर्व बसल्यावर सरांकडे पाहू लागले. सर सर्वांना उद्देशून म्हणाले,
"तुमच्यातील प्रत्येक जण खूप छान काम करत आहे. तक्रारीला कोणीच जागा ठेवलेली नाही. विभाने तिच्या स्वभावाने तुम्हा सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं आहे. तिचं काम प्रसंशनीय आहेच. आजपर्यंत मी तिला कोणावर चिडताना पाहिलेलं नाही. आज तुमच्यामधील एकाला 'ऑनसाईट' जाण्याची संधी मिळत आहे. हेच आजचं तुमच्यासाठी सरप्राईज आहे. मी तुम्हालाच विचारतो की तुम्ही कोणाचं नाव या संधीसाठी घ्याल?" सगळेजण एका सुरात म्हणाले,
"विभा विभा विभा."
अजयने त्याला पुष्टी देत म्हटलं,
"सर या संधीचं सोनं जर कोण करणार असेल तर ती विभाच आहे." विभा मात्र आश्चर्यचकित झाली होती. एकतर ह्या संधीसाठी तिची एकमुखाने निवड केली म्हणून तीला खूप आनंद झाला. तिला नोकरी लागली तेव्हाच तिने ठरवलं होतं की आपल्या कुटुंबाला सोडून प्रमोशन साठी इथेतिथे धावत बसायचं नाही. तिच्या मतावरती ती ठाम होती. ती लगेच उभी राहून सरांना म्हणाली,
"सर तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आणि माझ्या टीम मेंबर्सचे खूप आभार मानते. परंतु सर मी नम्रपणे सांगते की मला ही संधी स्वीकारता येणार नाही. मी स्वतःच माझ्या कुटुंबापासून दूर राहू शकत नाही. त्यामुळे माझ्यापेक्षा सुयोग्य व्यक्तीला तुम्ही हे संधी द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते."
"हे बघ विभा तूच या संधीसाठी योग्य आहे अशी माझी पूर्ण खात्री आहे. तू एकदा तुझ्या मिस्टरांशी, तुझ्या घरच्यांशी बोलून घे. मी तुला दहा दिवस देतो विचार करायला त्यानंतर तू मला कळव."
त्यानंतर विभाने सर्वांचे आभार मानले आणि ती आपल्या जागेवर येऊन काम करू लागली. सरांनी जरी तिला घरच्यांशी बोलायला सांगितलेला असलं तरी तिने तर निर्णय घेतला होता की अजिबात कोणाशी बोलायचं नाही. टीम मधील सगळ्यांनाच आश्चर्य आणि वाईट वाटत होतं की विभाने आलेली संधी नाकारू नये. त्यांच्या टीम मधील दोन वर्षांपूर्वीच लागलेला सर्वात लहान निनाद याला मात्र विभाच्या निर्णयाचं खूपच कौतुक वाटलं. इतके दिवस त्याला वाटायचं की हल्ली स्त्रिया ह्या करिअरच्या मागे लागून आपल्या कुटुंबाकडे थोडं फार तरी दुर्लक्ष करतात. याचा अर्थ तो स्त्रियांनी आपल्या करिअरचा विचार करू नये इतक्या कोत्या मनोवृत्तीचा नव्हता. तरीही विभा बद्दल त्याच्या मनातील आदर अजून द्विगुणित झाला.
निनादला सुद्धा रात्री जेवताना आपल्या आई-बाबांशी दिवसभरातील घडामोडींवर बोलायला खूप आवडत असे. त्याप्रमाणे त्याने आईला ऑफिसमध्ये घडलेली घटना सांगितली. त्याने आईला सांगताना फक्त विभा दीक्षित हे नाव घेतलं. आई त्याला म्हणाली,
"अरे ही तुझी विभा दीक्षित मॅडम माटुंग्याला राहते का. माझी खूप जुनी मैत्रीण सुनंदा दीक्षित, तिच्या सुनेचे नाव पण विभाच आहे. ती नेहमी तिच्या सुनेचं खूप कौतुक करत असते. ज्या अर्थी विभाने नकार दिला त्याअर्थी ती बहुतेक यातलं घरी काही सांगणारच नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल. या सोमवारी तसं पण आम्ही सर्व मैत्रिणी भेटणार आहोत तेव्हा मी सुनंदाला याबद्दल सांगेनच."
"आई तू नक्की सांग कारण मला सुद्धा असंच वाटतं की विभा मॅडमनी ही संधी स्वीकारायला हवी."
विभा घरी आल्यावर नेहमीसारखी वागत होती. तिच्या मनात जरासुद्धा चलबिचल नव्हती त्यामुळे घरच्यांना या संधीबद्दल काहीच कळलं नाही. नंतरच्या सोमवारी विभाच्या सासुबाई आणि इतर मैत्रिणी एका हॉटेलमध्ये लंचसाठी भेटल्या. तेव्हा निनादच्या आईने लंच झाल्यावर सुनंदा दीक्षित म्हणजेच विभाच्या सासूबाईंना विचारलं,
"काय ग तुझ्या सुनेने म्हणजे विभाने तुला तिला फॉरेनला जाण्याची संधी मिळते वगैरे काही सांगितलं का?"
"काय म्हणतेस मला यातलं काहीच माहित नाही पण तुला कसं बरं कळलं?"
"अगं माझा मुलगा त्याच कंपनीत आहे आणि तो विभाच्या टीम मध्येच आहे त्याने मला हे सर्व सांगितलं."
"बघितलं ना विभाच्या मनात कुटुंबाचा विचार सर्वप्रथम असतो म्हणून ती याबद्दल आम्हाला काहीच बोलली नाही."
"हो तिच्या साहेबांना तर तिने स्पष्टपणे नकार दिला ही संधी स्वीकारायला."
"मी मात्र तिला पाठिंबा देईन या संधीचं सोनं करण्यासाठी आणि मला खात्री आहे की मंदार आणि त्याचे बाबा सुद्धा याला पाठिंबाच देतील."
(सासुबाईंच्या पाठिंब्यामुळे विभा ही संधी स्वीकारायला तयार होईल की नाही ते पाहूया पुढल्या भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा