विषय : आपली माणसं
"मला वाटत होते, दीपक भाऊजींचे लग्न होते की नाही? आणि जरी झाले तरी... बायकोही त्यांच्यासारखीच मिळाली तर...पण बघा ना..दीपक भाऊजींचे लग्नही झाले आणि बायको तर त्यांना चांगलीच मिळाली."
निशा आपल्या नवऱ्याला समीरला म्हणाली.
"असतं गं एखाद्याचं नशीब चांगलं."
समीर म्हणाला.
"म्हणजे म्हणायचं काय आहे तुम्हांला? दीपक भाऊजींचे नशीब चांगले आणि तुमचे नशीब काय वाईट आहे का?"
निशा भांडणाच्या स्वरात समीरला म्हणाली.
"अगं, मी माझे नशीब वाईट आहे असे नाही म्हणालो. तू का असा अर्थ काढते आहे? मी फक्त दीपकचे नशीब चांगले आहे. असे म्हणालो आणि तेही तू त्याच्या बायकोचे कौतुक केले म्हणून नाहीतर मी माझा शांत होतो ना?"
समीर चिडक्या स्वरात म्हणाला.
"मी काय म्हणत होते, दीपक भाऊजींचे लग्न झाले, बायको दिसायला चांगली भेटली..गुण कळतील म्हणा हळूहळू. पण मला नाही वाटत त्यांचा संसार जास्त दिवस टिकेल. सासू-सासरे यांचे विचित्र वागणे व स्वभाव आणि त्यात दीपकसारखा नवरा... कसा करेल ती संसार?"
हेमा आपल्या नवऱ्याला किशोरला म्हणाली.
"तुला काय करायचे आहे? तू का काळजी करते आहे त्यांच्या संसाराची? त्यांचे ते पाहतील ना."
किशोर हेमाला म्हणाला.
"मी नाही त्यांच्या संसाराची काळजी वगैरे करत. फक्त तुम्हाला सांगते आहे. बाकी मला काही घेणे देणे नाही."
हेमा रागातच किशोरला म्हणाली.
"मला वाटले नव्हते की, आपल्या दीपकला चांगली बायको भेटेल असे. समीर व किशोरप्रमाणे दिसायला दीपक थोडा डावा आणि शिक्षण त्यांच्यासारखे नाही. दोन्ही मुलांचे रूप आणि शिक्षण पाहून त्यांची लग्ने पटकन झाली. निशा व हेमा चांगल्या श्रीमंत घरातील मुली आपल्या सुना म्हणून आपल्या घरी आल्या. दीपकचे शिक्षण व नोकरी पाहता त्याचे लवकर लग्न होईल का? ही चिंता मनात कायम असायची.
आता ती चिंता मिटली. दीपकचा संसार सुखाचा होवो. हीच देवाला प्रार्थना करते."
लताताई आपल्या नवऱ्याला संजयरावांना म्हणाल्या.
"रुपाचे म्हणते तर ते काय आपल्या हातात थोडीच असते. दीपक ही चांगला आहे दिसायला; फक्त समीर व किशोर त्याच्यापेक्षा थोडे उजवे आहेत एवढंच. आणि आई-वडिलांना तर सर्व मुले सारखीच असतात. आई-वडील म्हणून आपण तिघांना शिक्षण, संस्कार वगैरे सर्व काही सारखेच देण्याचा प्रयत्न केला. समीर व किशोरप्रमाणे दीपकचे अभ्यासात डोके चांगले चाललेच नाही. आपण किती प्रयत्न केले त्याने अभ्यास करावा..चांगले शिक्षण घ्यावे म्हणून. आपल्या मुलांचे चांगले व्हावे अशीच आई-वडिलांची इच्छा असते.आता दीपकचा संसार सुखाचा होवो. अशी माझीही इच्छा आहे."
संजयराव लताताईंना म्हणाले.
क्रमश :
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा