Login

नात्यांचे मोल भाग 2

About Relation

संजयराव बँकेत नोकरीला होते. आता नोकरीतून निवृत्त झाले होते. त्यांना समीर, किशोर व दीपक हे तीन मुले होती. लताताई व संजयराव दोघांनी आपल्या तिन्ही मुलांना लाड कौतुकात वाढवले होते. लताताई थोड्या कोमल मनाच्या पण संजयराव थोडे कडक स्वभावाचे होते. मुलांना त्यांचा धाक होता. आपल्या मुलांना चांगले संस्कार व्हावे यासाठी ते त्यांना थोडे शिस्तीने वागवायचे आणि वेळप्रसंगी मुलांच्या गुणांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन ही द्यायचे. संजयराव व लताताईंचा सुखाचा संसार सुरू होता.

मुले मोठी होत होती. समीर व किशोर अभ्यासात हुशार होते. त्यामुळे त्यांनी चांगले शिक्षण घेतले व ते चांगल्या नोकरीलाही लागले. पण दीपकचे अभ्यासाशी काही जमलेच नाही. त्यामुळे त्याने कसेतरी बारावीपर्यंत शिक्षण केले आणि तो एका खाजगी कंपनीत नोकरीला लागला. समीर व किशोर दिसायला देखणे व चांगल्या पगाराची नोकरी असलेले, त्यामुळे दोघांची पटकन लग्न जमली व बायकाही त्यांना चांगल्या मिळाल्या.


संजयरावांना व लताताईंना खूप आनंद झाला;पण त्यांचा हा आनंद जास्त वेळ टिकला नाही.

समीरची बायको निशा व किशोरची बायको हेमा या दोन्ही लग्नानंतर सुरुवातीला काही महिने खूप चांगल्या वागल्या पण हळूहळू त्यांचे गुण दाखवायला लागल्या. त्यांना सासू-सासरे नको वाटायला लागले.
त्यांना फक्त राजा राणीचा संसार हवा होता. या ना त्या कारणाने त्या आपल्या नवऱ्यांना सासू-सासर्‍यांविषयी सांगू लागल्या. बायकांचे ऐकून ते दोघेही आपल्या आई वडिलांना चुकीचे ठरवू लागले. त्यामुळे घरातील सुख व शांती जाऊन घरात वाद व अशांती निर्माण झाली.

'आपल्या संस्कारात कुठेतरी कमतरता राहीली.' असेच संजयराव व लताताईंना दोन्ही मुलांकडे पाहून वाटू लागले.

समीर व किशोरने मोठ्या शहरात चांगल्या पगाराची नोकरी शोधली व तिकडेच आपल्या राजाराणीचा संसार करायचे ठरवले. आईवडिलांना विचारले नाही फक्त तसे सांगितले. आई-वडिलांनी मूकपणे आणि जड अंतःकरणाने त्यांना संमती दिली.

संजयराव, लताताई व दिपक हे तिघेजण आपल्या घरात राहत होते. संजयराव व लताताईंनी दीपकचे लग्न करायचे ठरवले.
बऱ्याच मुली शोधल्या पण योग कुठे जुळून येत नव्हता. खूप प्रयत्नानंतर एका मुलीने होकार दिला. संजयराव व लताताईंना खूप आनंद झाला.

मुलीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती. पाच मुली व एक मुलगा असा मोठा परिवार होता. मोठ्या दोन मुलींची लग्ने झालेली होती. अजून दोन मुलींची लग्ने व मुलाचे शिक्षण व त्याचे लग्न सर्व बाकी होते. सोनाली ही तिसऱ्या नंबरची होती. तिने परिस्थितीशी जुळवून घेत बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले होते व घराला आर्थिक हातभार म्हणून ब्युटी पार्लरमध्ये ती कामही करत होती.

क्रमश:
नलिनी बहाळकर
0

🎭 Series Post

View all