Login

नात्यांचे मोल अंतिम भाग

About Relation

दीपकचे लग्न होते की नाही? आणि झाले तरी कशी बायको मिळते? हा प्रश्न समीर, किशोर व त्यांच्या बायकांना पडला होता. पण दीपकचे नशीब म्हणा की काय? त्याचे लग्नही झाले व सोनालीसारखी बायको त्याला मिळाली. आई वडिलांना ही त्याच्या लग्नाची चिंता होती. पण आपल्या दीपकला व त्याच्या संसाराला सोनाली छान सांभाळते आहे. हे पाहून त्यांना समाधान वाटत होते. सोनाली दिसायला चांगली होती. कामातही हुशार होती आणि स्वभावाने सर्वांना आपलेसे करणारी होती. नात्यांची जाणीव असलेली होती. सासू-सासऱ्यांशी प्रेमाने वागणारी होती.

समीर व किशोरप्रमाणे दीपक दिसायला खूप चांगला, उच्चशिक्षित व चांगल्या पगाराची नोकरी असलेला नव्हता; पण आई-वडिलांविषयी प्रेम व कुटुंबाविषयी आपलेपणा असणारा होता आणि बायको ही त्याला त्याच्यासारखीच भेटली होती.

रूप व पैसा या गोष्टी जीवनात किती महत्त्वाच्या? आणि नाती, आपली माणसं यांचे जीवनात काय महत्व असते? हे त्यांना चांगले ठाऊक होते. खरा आनंद कशात आहे? हे ही त्यांना माहीत होते.


समीर व किशोरने नोकरीच्या ठिकाणी आपले स्वतःचे घर घेतले होते,तेव्हा संजयरावांनी दोघांना आर्थिक मदत केली होती. दोन्ही मुलांचे घर झाले म्हणून राहते घर दीपकला देऊ असे त्यांनी ठरवले होते.
दीपकचा पगार व त्यांची पेन्शन यावर घर खर्च वगैरे सुरू होता.


सर्व काही व्यवस्थित सुरू होते ; पण निशा व हेमा यांना हे सुख सहन होत नव्हते. त्यांनी घराचा वाटा व लताताईंचे जे काही सोने होते,त्याची वाटणी मागितली.

आपली परिस्थिती चांगली आहे. आपण सासूसासऱ्यांशी व्यवस्थित वागत नाही आणि दीपकची परिस्थिती एवढी चांगली नाही. तो आई-वडिलांशी प्रेमाने वागतो आहे. हे समजून न घेता व यात आनंद न मानता उलट त्या दोघीजणी घरात वाद निर्माण करत होत्या.


दीपक व सोनालीने आई-बाबांना सांगितले की,
'घराची किंमत, आईंचे सोने व तुम्ही त्यांना घरासाठी केलेली मदत या सर्वांचा हिशोब करून त्यांना जे काय द्यायचे ते द्या. आम्हांला जे वाटणीला येईल त्यात आम्ही सुखी राहू. माझ्या पगारात व सोनालीच्या पार्लरच्या कामातून जी काही मदत होईल त्यात आम्ही समाधानी राहू. फक्त घरात शांती हवी.'

शेवटी निशा व हेमाच्या मनासारखेच झाले. त्यांच्या जीवनात ज्याचे महत्त्व होते ते त्यांना मिळाले होते,म्हणून त्या खूश होत्या. आणि इकडे दीपक व सोनाली सुद्धा आपल्या आई-बाबांसोबत आनंदी होते. खूप श्रीमंत नाही पण समाधानी होते.


आपल्या कर्माची फळे आपल्याला मिळतच असतात. असे म्हणतात.
आणि ते खरेच असते.

याचा अनुभव निशाला लवकरच आला.


सुख म्हणजे नक्की काय असतं.. याचा अनुभव ती घेत होती. पैसा, घरदार व राजा राणीचा संसार.. सर्व काही मनासारख!

पण एके दिवशी समीर कामावरून घरी परतत असताना, त्याचा मोठा अपघात झाला. थोडक्यात वाचला असेच म्हणा.
समीरच्या जीवनमरणाचा प्रश्न आणि त्यासाठी लागणारा भरपूर खर्च! खूप टेंशन होते.

समीरच्या अपघाताच्या बातमीने किशोर मदतीला आलाच पण आई-बाबा, दीपक व सोनाली सुद्धा आले.

किशोरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे त्याने पैशांची मदत केलीच पण बाबांनी आपले पेन्शनमधील जमवलेले पैसे व दीपकनेही शक्य तेवढी मदत केली.

मुले आपल्याशी कशीही वागली तरी आई वडिलांना मुलांची काळजी असते आणि दीपकही नेहमी नात्यांचे मोल जाणणारा होता. त्यामुळे संजयराव आपल्या मुलासाठी व दीपक आपल्या भावासाठी मदतीला धावून आले.

आनंदात नाही पण दुःखात नेहमी आपली माणसं कामात येतात. हे समीर, किशोर व त्यांच्या बायकांना कळून चुकले होते व जीवनात नात्यांचे मोल काय असते? हे ही समजले होते.


समाप्त
नलिनी बहाळकर
0

🎭 Series Post

View all