Login

नात्यांची घट्ट वीण (भाग १)

लघुकथा


नातीगोती

"डॉक्टर काय झालं यांना? अचानक चक्कर येऊन पडले. नेहमी नेहमी यांचं डोकं खूप दुखत असते आणि खूप ताप येत आहे. शिवाय खोकला पण खूप आहे. ते बरे होतील ना? ते शुध्दीवर कधी येतील?"
समिधाच्या मनात अनेक प्रश्न होते. तिचे मन सैरभैर झाले होते. भितीने हातपाय थरथरत होते.

"हो, हो, थोडा वेळ लागेल शुध्दीवर यायला. ‌शुध्दीवर आल्यावर काही टेस्ट करून घेऊ तेव्हाच कळेल नेमकं त्यांना असं काय होतं आहे."

समिधा सोबत तिचं संपूर्ण कुटुंब होतं. पण, सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता. जवळजवळ अर्ध्या तासाने सतिश शुध्दीवर आला. त्याला समिधाशी बोलायचे होते.

डॉक्टरांनी समिधाला आत बोलावले.

समिधा सतिशला बघताच रडायला लागली.
"हे बघ समिधा काळजी करू नकोस. मला काहीच झाले नाही. तू उगाचच रडत आहे."

पण, सतिशच्या चेहऱ्यावर काही तरी टेन्शन वाटत होते. "अगं ,आई बाबा आणि दादा आहे ना! मग काळजी करू नकोस."
समिधाचं कुटुंब अतिशय आनंदात. सासु _सासरे नवरा दोन मुले, दीर आणि जाऊ. एकत्र कुटुंबाचा पायाच मुळी एकमेकांच्या प्रेमावर अवलंबून होता. समिधा आणि तिची जाऊ कल्याणी यांची मुले सोबत सोबत हसत खेळत मोठी होत होती. समिधाचा नवरा सतिश आणि त्याचा मोठा भाऊ सचिन दोघेही वडीलांच्या व्यवसायात हातभार लावत होते. त्यांचा मोठा व्यापार होता. त्यामुळे कसलीच काळजी नव्हती.

पण, समिधा नेहमीच सगळ्यांशी तुसडेपणाने वागत होती. जावेच्या मुलांमध्ये भेदभाव करीत होती. तुलना करीत होती. जास्त शिक्षण झाल्याचा तिला गर्व होता. नवऱ्याच्या हुशारीवर तोऱ्यात मिरवायची. पण, तरीही घरात तिला काहीच बोलत नव्हते. आज मात्र ती हतबल झाली होती.

तेवढ्यात सचिन आणि त्याचे वडील डॉक्टरांना भेटायला गेले.

"डॉक्टर, काय झाले आहे सतिशला? अचानक चक्कर येण्याचे कारण कळले का? "

नाही. पण, दोन दिवसांत सगळ्या टेस्ट करून घेऊ. पण, आम्हांला एक शंका येत आहे. की त्याला कॅन्सर किंवा....

डॉक्टर बोलायचे थांबले.
किंवा काय? सांगा ना!

त्याला एड्सही असू शकतो. फक्त त्यासाठी थोडावेळ लागणार आहे."

"काय? कॅन्सर किंवा ..! सचिन आणि त्याच्या वडीलांचे एकच उद्गार निघाले.

आपल्या मुलाला एवढा मोठ्ठा आजार होऊ शकतो. यावर कैलासरावांचा विश्वासच बसत नव्हता.

"बाबा, बाबा, तुम्ही चला बाहेर."

"पण, डॉक्टर तो बरा होईल ना? आता किती दिवस ठेवावे लागेल दवाखान्यात."

" कमीत कमी आठ दिवस तरी लागतीलच. कारण उद्या सकाळीच काही टेस्ट कराव्या लागतील. तो पर्यंत काहीच सांगता येत नाही. तुम्ही काळजी करू नका."

" सचिन काय झालं रे हे."

"बाबा फक्त शंका आहे डॉक्टरांना. जोपर्यंत टेस्ट होत नाही. तो पर्यंत विश्वास ठेवू नका . "

सचिन आणि कैलासराव केबिनच्या बाहेर आले.

त्या दोघांचा आवाज ऐकून समिधा खोलीतून बाहेर आली.

"दादा , बाबा काय म्हणाले डॉक्टर? कोणत्या टेस्ट आणि कधी करणार आहेत?"

सचिन आणि कैलासराव एकमेकांकडे बघू लागले. काय बोलावं कळेना झाले?

" अगं, काही नाही. बहुतेक टायफाईड किंवा मलेरिया असू शकतो. होईल तो बरा. काळजी करू नको."

कैलासराव नजर चुकवून बोलत होते. एका बाबाच मन कळवळत होतं. हृदयात धडधडत होते.

त्यामुळे समिधाच्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. बाबा आपल्या पासून काही तरी लपवत आहे ‌हे तिच्या लक्षात आले.

सचिनच्या मनातही अनेक शंका आल्या. त्याला एड्स कसा होऊ शकतो? वगैरे वगैरे...


सचिनची शंका खरी होते की काय पाहुया पुढच्या भागात.