Login

नात्यांची गुंफण -२

ही कथा एका तरुणीची, तिच्या बॉसची आणि अनाथाश्रम मधील मुलाची आहे
नात्यांची गुंफण - भाग २

सानिकाला आज रोजच्यापेक्षा लवकरच जाग आली. अंगणात पेरूच्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. सकाळच्या शांत समयी हा किलबिल आवाज फार गोड वाटायचा. आळस देत सानिका उठली. शेजारी सारा गाढ झोपली होती. झोपेत ती खूप निरागस दिसत होती. तिच्या कपाळावर केसांची एक अवखळ बट रुंजी घालत होती. सानिकाने विचार केला की आज रेंगाळून चालणार नाही. पटापट तयार होऊन वेळेआधीच इंटरव्ह्यूला पोहोचायला हवे. खरं तर सर्व ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली होती. आता प्रत्यक्ष मुलाखत बाकी होती. ही मुलाखत कंपनीतील एक जुन्या जाणत्या महाव्यवस्थापक मॅडम घेणार होत्या. सानिका खोलीबाहेर आली आणि ती लगबगीने कामाला लागली. रोज उठल्यावर ती आईच्या कामात हातभार लावत असे. स्नानादी विधी आटोपून ती स्वयंपाकघरात आली. तशी तिची आई तिला म्हणाली,

" सानू, आज तू काही मला मदत करू नकोस. लवकर तयार हो आणि तू वेळेत जा इंटरव्ह्यूला. आज तसं पण जास्त काही करायचं नाही . मी एकटी करेन."

पडत्या फळाची आज्ञा घेऊन सानिका तयारीला लागली. कोणती साडी नेसायची ती तिने रात्रीच काढून ठेवली होती म्हणजे सकाळी उगाच घाई व्हायला नको. ती तयार झाली आणि आरशातील आपले प्रतिबिंब पाहून ती मनोमन स्वतःवरच खूष झाली. तिने फिक्कट लिंबू रंगाची हलकी फुलकी साडी नेसली होती. त्यावर मेहंदी रंगाची छोट्या फुलांची सुबक नक्षी होती. पदर आणि किनार मेहंदी रंगाची होती. कॉन्ट्रास्ट मेहंदी रंगाचा ब्लाऊज तिने घातला होता. गव्हाळ वर्णाच्या सानिकाला साडी खूपच शोभून दिसत होती. सरळ मऊ रेशमी केस पाठीवर मोकळे सोडले होते. चेहऱ्यावर हलकासा मेकअप आणि फिक्कट गुलाबी रंगाची लिपस्टिक तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होती. ती निघणार इतक्यात सारा तिथे आली आणि सानिकाला म्हणाली,

" अय्या ! ताई किती गोड दिसतेसं ग ? तुझ्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास म्हणजे तुझ्या सोज्वळ सौंदर्यात सोने पे सुहागा." सानिकाने तिचा गालगुच्चा घेतला.

सानिकाने निघण्याआधी गणपती बाप्पाला आणि आईबाबांना नमस्कार केला. त्यांनी तिला ' यशस्वी भव ' असा आशीर्वाद दिला . सानिका कुठेही जाताना रोज बसने जात असे पण आज तिने सरळ रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ती वेळेआधीच दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. एका आलिशान इमारतीत कंपनीचे ऑफिस होते. इमारतीचे प्रवेशद्वार अतिशय रेखीव होते आणि मुख्य म्हणजे प्रवेश करताच समोर एक सुबक गणपतीची मूर्ती होती. सानिका खूप खुश झाली. लिफ्टने ती सहाव्या मजल्यावर आली. तिथे रिसेप्शनिस्टला तिने तिचे नाव सांगितले. तिने सानिकाला सोफ्यावर बसण्याची विनंती केली. तिथे दोन तीन उमेदवार आधीच आले होते. प्रत्येकाला वेळ दिली असल्यामुळे सानिकाला सध्याच्या ऑफिसमध्ये जाणे शक्य होतं. तिचं नाव पुकारल्यावर ती आतमध्ये गेली. तिथे एक मध्यमवयीन पण विलक्षण तेजस्वी मॅडम बसल्या होत्या. त्यांनी तिला बसायला सांगितल्यावर सानिका त्यांना धन्यवाद म्हणताच त्यांच्या चेहऱ्यावर मंदसे स्मितहास्य उमटले. त्यांनी फक्त पंधरा मिनिटे सानिकाला आवश्यक ते प्रश्न विचारले आणि सांगितले की, " तुम्हाला एक - दोन दिवसांत आम्ही कळवू. आता तुम्ही जाऊ शकता."

सानिका खुशीतचं ऑफिसला गेली. तिने आईबाबांना फोन करून इंटरव्ह्यू छान झाल्याचं सांगितलं. नंतर तिने स्वतःला कामात झोकून दिलं. खरं तर त्या ऑफिसमधले शेवटचे दोनच दिवस होते तरी ती प्रामाणिकपणे काम करत होती. संध्याकाळी घरी गेल्यावर ती बाबांची आतुरतेने वाट पाहत होती. कधी एकदा बाबा येतात आणि त्यांना भेटते असं तिला झालं होतं. आज संध्याकाळच्या जेवणात तिने मुद्दाम गोडाचा शीरा केला. बाबा तिला म्हणाले की आज आपली सानू नेहमीपेक्षा जास्त खूष दिसते आहे. रात्री गप्पागोष्टी झाल्यावर सगळे झोपायला गेले.

आज सानिकाचा सध्याच्या ऑफिसचा शेवटचा दिवस होता. गेली तीन वर्ष ती ह्या ऑफिसमध्ये होती . नाही म्हटलं तरी तिला थोडं वाईट वाटतं होते. पण ही जगरहाटी होती. ह्या कंपनीत कामाच्या मानाने पगार
खूप कमी होता आणि सध्या तिला पैशांची गरज होती. तिने तिच्या मनाची समजूत काढली आणि ती ऑफिसला गेली. नेहमीप्रमाणेचं मन लावून ती काम करत होती. इतक्यात तिच्या साहेबांनी तिला केबिनमध्ये बोलावले आणि तिचं मन वळवण्याचा एक शेवटचा प्रयत्न केला. त्यांनी तिला ही नोकरी न सोडण्याची विनंती केली. सानिकाने त्यांना सांगितले की तिच्या प्रगतीसाठी तिला ही नोकरी सोडावी लागेल. साहेबांनी तिला सांगितले की तुला पुन्हा कधीही इथे यावंसं वाटलं तर इथे तुझे कायम स्वागतचं होईल. सानिकाने त्यांचे आभार मानले आणि ती आपल्या डेस्कवर परत आली. तिने पाहिले तर तिला एक नवीन मेल आल्याची सूचना दिसली. त्यात तिला तिचा इंटरव्ह्यू क्लिअर झाल्याचे आणि तिने उद्या दहा वाजता ऑफिसमध्ये येऊन रीतसर नेमणूकपत्र घ्यावे असे लिहिले होते. आता ती खूपच निर्धास्त झाली होती. तिच्या आईबाबांचे थोडे कष्ट तरी ती कमी करू शकेल ह्याची तिला खात्री पटली. येणारी पहाट सोनेरी भविष्याची नांदी ठरू दे असे तिने बाप्पाला सांगितलं. पुढे काय होतं हे पुढील भागात पाहू.