नात्यांची गुंफण -५

ही कथा एका तरुणीची, तिच्या बॉसची आणि अनाथाश्रम मधील मुलाची आहे
नात्यांची गुंफण - भाग ५

रोज पडल्या पडल्या झोप लागणाऱ्या सानिकाला आज काही केल्या झोप येतच नव्हती. ती सारखी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती. तिच्या मनात येत होतं की सलील सर स्वभावाने किती चांगले आहेत. सर्वांना मदत करायला नेहमी तत्पर असतात. कोण कुठचं एक जोडपं मदत मागत होतं तर त्यांनाही स्वतःच्या घरात आसरा दिला. आता तरी त्यांच्या आयुष्यात सुख येऊदे.

इकडे सलील पण आज विचारांच्या गर्दीत हरवला होता. जिच्याशी लग्न करायचं ती माहितीतली असली पाहिजे अन्यथा अनोळख्या स्त्रीने त्याच्या संपत्तीवर डोळा ठेवून लग्न केलं तर आगीतून सुटून फोफाट्यात सापडल्यासारखं होईल. त्याच्या डोळ्यासमोर सानिकाचा चेहरा तरळू लागला. सानिकाचं वय तीस आहे पण तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाही. आपण तिच्या घरी कोण असतं कधी विचारलंच नाही. उद्या आपण सर्व जाणून घेऊ.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सलीलने सानिकाला केबिनमध्ये बोलावलं आणि सहज बोलता बोलता तिला तिच्या घरच्यांबद्दल विचारलं. तिने सर्व सांगितल्यावर त्याच्या मनात एक आशा निर्माण झाली. ती बाहेर गेल्यावर त्याने तिला लग्नाबद्दल विचारायचं ठरवलं. फार तर काय नकार देईल. पण आपण सानिकाला ओळखतो. ती खूप प्रामाणिक आहे.

गार्डनमध्ये जाण्याआधी सलीलने पुन्हा सानिकाला बोलावून घेतले. काहीही जास्तीचं न बोलता सलील तिला म्हणाला,
" सानिका एक विचारू का तुला? मी जे विचारेन त्याचं उत्तर तुला हवं तेच दे. तू दिसायला सुंदर आहेस तरी तू अजुन लग्न का केलं नाहीस. सानिका तू माझ्याशी लग्न करशील का?".

सानिकाला सर असं काही विचारतील असं वाटलंच नाही. ती एकदम स्तब्ध झाली. तिने स्वतःला सावरलं आणि ती म्हणाली,
" सर मी अजुन लग्न केलं नाही ह्याला कारण आहे. माझे आईबाबा कधीचे माझ्या मागे लागलेत लग्न कर, लग्न कर. पण सर माझ्यावर त्यांची जबाबदारी आहे. माझ्या लहान बहिणीचे आताच शिक्षण पूर्ण झालंय आणि ती नोकरी शोधते आहे." .त्यानंतर तिने तिचे बाबा कसे आजारी पडले आणि त्यानंतरच्या सर्व घटना सलिलला सांगितल्या. तिने त्याला सांगितलं की अशा परिस्थितीत ती लग्न करू शकत नाही.

सलील तिला म्हणाला,
" सानिका अग तुझ्या आईबाबांची जबाबदारी आपण घेऊ. माझा बंगला खूप प्रशस्त आहे. आपण सगळे एकत्र राहू. त्यांना काका काकूंची सोबत मिळेल. शिवाय साराच्या नोकरीचं आणि लग्नाचं पण मी बघेन. तू फक्त हो म्हण. लग्नानंतर नोकरी करायची की आणि काही हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल. सानिका तू हो म्हटल्यामुळे किती आयुष्य सावरली जातील हे तुला माहिती आहे का ?"

सानिका अवाक् झाली. सलीलने एव्हढा पुढचा विचार केलाय. तो म्हणतो ते सर्व खरं आहे पण इतक्या लवकर एव्हढा महत्त्वाचा निर्णय कसा घ्यायचा. आईबाबांना काय वाटेल. त्यांचा विचार घ्यायला हवा. तिने सलिलला म्हटलं,
" सर तुम्ही म्हणता ते सर्व मला पटतंय. मला असा तडकाफडकी निर्णय घेता येणार नाही. मला दोन दिवस विचार करायला वेळ द्या. शिवाय आईबाबांचे मत मला विचारात घ्यायला हवं. मी तुम्हाला माझा निर्णय दोन दिवसांनी सांगते.".

सलील म्हणाला,
" हरकत नाही. तू विचार कर. तुझा निर्णय काहीही असला तरी ऑफिसमध्ये येणं थांबवू नकोस."

सानिका घरी आली तीच मुळी संभ्रमावस्थेत. तिने खूप विचार केला. सर जे म्हणत होते ते खरोखर सर्वांच्या दृष्टीने योग्य होते. रात्री जेवताना आईबाबा आणि साराने तिला ती कोणत्या विचारांमध्ये हरवली ते विचारलं. ती आज गप्पांमध्ये पण भाग घेत नव्हती. शेवटी तिच्या आईने तिच्या हातावर हात ठेवत तिला म्हटलं,
" सानू काय झालं बाळा ? जे काही असेल ते आम्हाला सांग. तुला मोकळं वाटेल. आल्यापासून आम्ही बघतोय तू नेहमीसारखी उत्साही दिसत नाहीस." सानिकाने विचार केला की आईबाबांबरोबर आजचं बोलावं. तिने सुरुवातीपासून सगळं घडाघडा आईबाबा आणि साराला सांगितलं. सगळेच अचंबित झाले. एखाद्या सिनेमासारखंच सर्व आपल्या मुलीच्या आयुष्यात घडतंय. सर्वप्रथम बाबा सावरले आणि ते सानिकाला म्हणाले,
" तुझ्या सरांचे विचार खूपच स्तुत्य आहेत. लग्नाबद्दल तुझी पण काही स्वप्न असतील. तुला बिजवराशी लग्न कर असा सल्ला आम्ही नाही देऊ शकत. तू म्हणतेस त्याप्रमाणे तुझ्या सरांचं वय जास्त नाही. तुला ते पसंत आहेत का. तुला जर हे मान्य असले तरी लग्नानंतर आम्ही त्यांच्या घरी राहणं हे कितपत योग्य आहे. "

सानिका आईबाबांना म्हणाली,
" मला त्यांचे विचार पटतात. ते खूप प्रामाणिक आणि नम्र आहेत. बिजवर ही त्यांची एक डावी बाजू सोडली तर ते लाखात एक आहेत. मला त्यांची साथ द्यायला नक्कीच आवडेल. जयसारख्या मुलाच्या आयुष्यातला अंधःकार नाहीसा होऊन त्याचे जीवन प्रकाशमान होईल."

त्यावर बाबा तिला म्हणाले,
" सानू तू हा जो मनाचा मोठेणा दाखवलास, खरंच आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. तू सरांना उद्याच आपल्या घरी बोलंव. बोलू आपण त्यांच्याशी." बाबांचं बोलणं ऐकून सानिकाच्या मनावरचं मळभ दूर झालं.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर सानिका स्वतःच सलीलच्या केबिनमध्ये गेली आणि तिने सलिलला सांगितलं की, आईबाबांना तुमच्याशी बोलायचं आहे. तुमच्या सवडीप्रमाणे तुम्ही या. सलीलला खूप आनंद झाला. त्याने सानिकाला सांगितलं की आजच ऑफिसमधून तो त्यांच्या घरी येईल. सानिकाने त्याला घराचा पत्ता दिला आणि ती कामाला लागली.


संध्याकाळी सलील घरी आल्यावर सानिकाने सगळ्यांशी त्याची ओळख करून दिली. चहापाणी झाल्यावर सलील बाबांना म्हणाला,
" तुम्हाला सानिकाने सर्व सांगितलं असेलच. मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. तुमची संमती आहेच. तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आपण लग्न करू. तुम्हाला लग्न मोठया प्रमाणावर करायचं असेल तर तसं करू किंवा मोजक्याच लोकांना बोलावून करू. तुम्ही म्हणाल तसं. बाबा लग्न झाल्यावर आपण सगळे आपल्या घरी एकत्र राहू. तुमचं हे राहतं घर तुम्ही बंद ठेवा किंवा भाड्याने द्या. मी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आनंदात ठेवेन. लग्न झाल्यावर मला रीतसर जयला घरी आणायचं आहे. तुम्ही काळजी करू नका मी सानिकाला पण पत्नीचा मान देईन. तिला खऱ्या अर्थाने सुखात ठेवेन."

त्याचं बोलून झाल्यावर बाबा म्हणाले, " बाकी सर्व ठीक आहे पण आम्ही इथे आमच्या घरीच राहू. असं जावयाच्या घरी कायम राहणं बरं नाही दिसणार. लोक काय म्हणतील."

.त्यांना मध्येच थांबवत सलील म्हणाला,
" बाबा सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगतो की मी नात्याने तुमचा जावई होणार असलो तरी मी तुमचा मुलगाच आहे. आणि लोक काय म्हणतील हा तर विचारच करू नका. लोकं काहीही असलं तरी बोलतातचं. ठरलं तर मग. तुम्ही मला तारीख, वेळ आणि ठिकाण कळवा. मी येईन".

सलील गेल्यानंतर बाबा म्हणाले,
" काय लाख माणूस आहे हा. मला वाटतं आपण आपल्या अंगणात छोटा मांडव घालून थोडक्यात लग्न करावं . त्यांचं मन आपण जपलं पाहिजे. नंतर पाहिजे तर आपण एक रिसेप्शन ठेवू." सर्वांना बाबांचं म्हणणं पटलं.

लग्न होण्याआधी सलील सानिकाला म्हणाला, " तुझ्या सुद्धा नवीन लग्न झालेल्या मुलीच्या ज्या अपेक्षा असतात तशा असतील. ह्या तुझ्या अपेक्षा मी नक्कीच पूर्ण करेन पण आपल्याला आधी जयला घरी आणावं लागेल. तुला चालेल ना." सानिकाने क्षणाचाही विलंब न लावता म्हटलं, " सर मलासुद्धा हेच हवं आहे. तुमच्या सुखातच माझं सुख आहे." सलील जोरात हसला आणि म्हणाला,
" अग सानिका मी आता तुझा सर नाही, नवरा आहे. यापुढे तू मला सर नाही म्हणायचं कळलं का."

चांगला मुहूर्त बघून सलील आणि सानिकाचं लग्न घरासमोरच्या अंगणात मांडव घालून पार पडलं. लग्न झाल्यावर सलील सानिकाने प्रथम जयच्या बाबतीतल्या सर्व कायदेशीर गोष्टी पूर्ण करून त्याला घरी आणलं. जय खूप खूष झाला. आधी तो सलीलला काका म्हणत असे. आज तो हक्काने बाबा म्हणू शकत होता. त्याचं आणि जयचं नातं खूप अलौकिक होतं. नियतीने त्यांना एकत्र आणलं होतं.

अशा रीतीने जय आणि सलीलच्या नात्यामुळे एकात एक अनेक नात्यांची छान गुंफण झाली. सलील सानिका एकत्र आले. सलिलला आई बाबा आणि साराच्या रुपात बहीण मिळाली. दैव जाणिले कुणी. सर्व दिवस सारखे नसतात हेच खरं. एकमेकांच्या मनाशी मनाचे नाते जुळले होते. ह्या आनंदाच्या क्षणी सर्वांच्या तोंडी एकच गाणे उमटले, " या सुखांनो या".

©️®️सीमा गंगाधरे

🎭 Series Post

View all