नात्यांची गुंफण - १

ही कथा एका तरुणीची, तिच्या बॉसची आणि अनाथाश्रम मधील मुलाची आहे
नात्यांची गुंफण - भाग १

सानिका खिडकीतून बाहेर बघत विचारमग्न अवस्थेत उभी होती. एकाच वेळी तिच्या डोक्यात अनेक विचारांनी गर्दी केली होती. इतक्यात तिथे गाणं गुणगुणत सनिकाची धाकटी बहीण सारा आली. तिने ताईला विचारात गढून गेलेले पाहिलं आणि तिला म्हणाली,

" ताई काय झालं ग ? तू अशी का उभी आहेस, तुला बरं वाटतं नाही का?".

सानिका तिला म्हणाली, " तसं काही नाही ग. मी उद्याच्या इंटरव्ह्यूचा विचार करतेय. एक तर माझ्या आधीच्या नोकरीचा नोटीस पिरियड चालू आहे. ही नोकरी जर मिळाली तर आपल्यासाठी खूप चांगलं आहे ग . आईला पण एव्हढी मेहनत करावी लागणार नाही. हल्ली तिलाही एव्हढी धावपळ झेपत नाही. तरी बिचारी पहाटेपासून घरासाठी राबत असते. कधी हौस नाही, मौज नाही. बाबा आजारी पडायच्या आधी आपण किती मज्जा करायचो. "

सारा तिला म्हणाली, " ताई ही नोकरी तुला नक्कीच मिळेल. ह्या नोकरीसाठी तूच एकदम लायक उमेदवार आहेस." .

सानिका हसून साराला म्हणाली, " तुझी बहिण म्हणून तुला अस वाटतंय. तिथे एकापेक्षा एक सरस उमेदवार येतील."

सानिका आणि सारा ह्या दोघी बहिणी आपल्या आई बाबांसोबत शहरातील एका उपनगरात राहत होत्या. सानिका तिशीच्या आसपासची होती तर सारा केवळ एकवीस वर्षांची. सानिका चारचौघीत उठून दिसणारी पटकन कोणालाही आवडेल अशीच होती. परंतु घरच्या परिस्थतीमुळे तिने लग्नाचा विचार केला नव्हता. तिचे बाबा एका चांगल्या कंपनीत नोकरीला होते. परंतु सहा सात वर्षांपूर्वी ते आजारी पडले. दोन तीन वर्ष त्यांच्या आजारपणात गेली. अशात त्यांची नोकरी टिकून राहणे शक्य नव्हतं. त्यात त्यांची जमापुंजी संपून गेली. सानिकाच्या नोकरीवर त्यांचे घर चालत होते. तिची आई घरातल्या घरात पापड, लोणची आणि इतर खाद्य पदार्थ तयार करून विकत होती. साराचे शिक्षण नुकतेच संपले होते. तिचे नोकरीसाठी प्रयत्न चालू होते. तीही दोन तीन शिकवण्या घेत होती. तिच्या बाबांना हल्लीच घराजवळ एका तयार कपड्यांच्या दुकानात मॅनेजरची नोकरी मिळाली होती. पगार जास्त मिळत नसे पण त्यांचा वेळ चांगला जाई आणि मी देखील काहीतरी घरासाठी करू शकतो हे समाधान होते. सानिकाचे आईबाबा तिला वारंवार सांगायचे तू आता लग्न कर. आता सारा पण हाताशी येईल. आम्ही करू सगळं नीट. ‌ ह्यावर सानिकाचे एकच म्हणणं असायचं की ह्या परिस्थितीत मी लग्न करणार नाही.

संध्याकाळचे सात वाजले तसे बाबा घरी परतले. सानिकाने बाबांना पाणी दिलं. पाणी देताना सानिकाने पाहिलं की बाबांच्या डोळ्यात पाणी तरळतंय. तिने बाबांच्या खांद्यावर हात ठेवला. ती त्यांना म्हणाली,
"बाबा असं वाईट वाटून घ्यायचं नाही. परिस्थिती बदलेल. सगळेच दिवस चांगले कसे असतील. तुम्ही काळजी करू नका."

बाबा म्हणाले, " अग तुम्ही मुली परक्याचं धन असता . तू आमच्यासाठी लग्न करत नाहीस. ह्याचं शल्य खूप टोचतं. आज जर माझी पूर्वीची नोकरी असती तर तू एखाद्या चांगल्या घरी सुखाचा संसार करत असतीस. खरंच तुम्ही दोन्ही मुली मुलांपेक्षा कमी नाहीत."

सानिका म्हणाली , " बाबा तुम्ही आम्हाला मुलं समजता मग आम्हाला आमची कर्तव्य पार पाडू द्या ना. पूर्वीचे दिवस नक्कीच परत येतील. ' तो ' आहे ना."

त्यातल्या त्यात एक आनंदाची गोष्ट म्हणजे ह्यांचं राहतं घर मोठे होते आणि स्वतःच्या मालकीचे होते. रात्री सर्वांची जेवणं उरकल्यावर त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे थोडा वेळ सगळे जण दिवाणखान्यात गप्पा गोष्टी करत बसले. हा एक अर्धा तास त्यांच्या सर्वांसाठी खास असायचा. दिवसभरात काय काय घडले हे एकमेकांना सांगण्यात त्यांचा वेळ मजेत जाई. गप्पा गोष्टी झाल्यावर सानिका आणि सारा त्यांच्या खोलीत झोपायला आल्या. सानिकाने साराला झोपायला सांगितले आणि ती दुसऱ्या दिवशीच्या इंटरव्ह्यूची तयारी करत बसली. सानिका एम. कॉम. ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती. शिवाय हल्लीच्या संगणकीय युगात लागणारे अद्ययावत शिक्षण तिने घेतलं होतं. तिच्या गाठीशी नोकरीचा अनुभवही होता. वयाच्या अटीमध्येही ती बसत होती. त्यामुळे ती खूप सकारात्मक होती. झोपताना तिने गणपती बाप्पाला मनातल्या मनात सांगितले बाप्पा ही नोकरी मला मिळू दे. उद्याची स्वप्न पाहत ती गाढ झोपी गेली.