नत्यांची गुंफण - ३

ही कथा एका तरुणीची, तिच्या बॉसची आणि अनाथाश्रम मधील मुलाची आहे
नात्यांची गुंफण - भाग ३

आज सानिकाला नवीन ऑफिसमध्ये रुजू व्हायचे होते. नेमकी आज संकष्टी होती. सानिकाला खूप आनंद झाला कारण तिच्या नवीन पर्वाची सुरुवात संकष्टीच्या दिवशी होणार होती. आजही पहिलाचं दिवस म्हणून सानिकाने साडी परिधान केली होती. आईबाबांना सांगून ती निघाली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनीस्टला आज बोलावले असल्याचे सांगितलं. तिने तिला मॅडमना भेटायला सांगितले. ती आत मध्ये गेल्यावर मॅडमने बाकी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आणि तिला रीतसर नेमणूक पत्र दिलं. त्यात तिला पगार आणि इतर सुविधांचा उल्लेख होता. ते सर्व बघून तिला आनंद झाला. त्या मॅडमनी तिला सांगितले की आता तुम्ही थेट सलील राजे सरांना रिपोर्ट करायचं. तेचं ह्या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. तुम्हाला ऑल द बेस्ट. मन लावून काम करा, खूप प्रगती करा. त्यांचा निरोप घेऊन ती तिथून निघाली.

तिने सलील राजेंबद्दल खूप ऐकलं होतं. लहान वयातचं त्यांनी खूप यश मिळवलं आहे आणि असे असूनदेखील ते खूपचं नम्र आणि माणुसकी जपणारे आहेत. तिने बाहेर येऊन रिसेप्शनीस्टला सरांची केबिन कुठे आहे ते विचारलं. तिने बोटाने इशारा करताचं ती सरांच्या केबिनकडे जाण्यासाठी वळली. केबिनच्या दरवाजातून सानिकाने
" मी आत येऊ शकते का ?" अशी विचारणा केली. त्यांनी संमती देताच ती आतमध्ये गेली आणि त्यांना ' सुप्रभात ' म्हणाली. तिचा मधाळ स्वर म्हणजे सलीलला एखाद्या मंदिराच्या गाभ्यातून मंजुळ नाद उमटल्यासारखा वाटला. त्यांनी तिला बसायला सांगितलं.

इथे सलीलला सानिकाला प्रथम दर्शनी बघितल्यावर जाणवलं की आपण योग्य व्यक्तीची निवड केली आहे. त्याने तिला बसायला सांगितलं. पहिल्याच दिवशी त्याने सानिकाला स्पष्टपणे इथल्या कामाची पद्धत समजावून सांगितली. तो म्हणाला,

" या ऑफिसमध्ये तुम्ही थेट मला रिपोर्ट करायचं आहे. इथे तुम्ही मोकळेपणाने काम करा. मानेवर जोखड ठेवून काम करायची गरज नाही. मी कोणालाही ऑफिस वेळेपेक्षा जास्त वेळ थांबायला सांगत नाही. तुम्हाला घरी किंवा आणखी कोणाला कधी फोन करायचा असेल तर तुम्ही करू शकता. पण म्हणून तासनतास फोनवर बोलणं मला मंजूर नाही. काम सोडून फुकट टाईमपास केलेला मला चालणार नाही. जेवण वेळेवर घेत जा. मी केबिनमध्ये असलो किंवा नसलो तरी तुमची वेळ झाल्यावर तुम्ही निघू शकता. तुम्हाला सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ५.४५ ह्या वेळेत ऑफिसमध्ये उपस्थित राहावे लागेल."

सानिका क्षणाचाही विलंब न करता म्हणाली.
" हो सर मला ही वेळ चालेल." कारण सानिकाला सकाळी आईला कामात मदत करता येणार होती.

सलीलने बेल वाजवून प्यूनला बोलावून तिला कुठे बसायचं हे दाखवायला सांगितलं. सानिकाने कामाला सुरुवात केली . इथलं वातावरण तिला खूप आवडलं. तिने पहिल्या दिवसापासून स्वतःला कामात झोकून दिलं. तिच्या कामाचं स्वरूप आधीच्या ऑफिससारखं होतं पण इथे तिला जास्त अधिकार दिले गेले होते. दिवसभर काम केल्यानंतर ती सरांना सांगून घरी निघाली.

सलीलचे व्यक्तिमत्त्व खूप उठावदार होते. सावळा वर्ण, पावणेसहा फूट उंची, कुरळे केस त्याला शोभून दिसत होते. परंतु स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात तो खूपच दुःखी होता. तो त्याचे आईबाबा, पत्नी सारिका आणि पाच वर्षांचा मुलगा अमेय ह्यांच्यासोबत आनंदी जीवन जगत होता. कसलीच उणीव नव्हती - संपत्ती, प्रेम सारं काही मुबलक होतं . पण नियतीला हे मंजूर नव्हतं. एक दिवस सलिलला महत्त्वाची मिटींग असल्यामुळे बाकी सर्वजण एका नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नाला गेले होते. परतताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आणि सर्वच्या सर्व जागच्या जागीच गेले. तेव्हापासून सलील एकाकी जीवन जगत होता . घरी एक बाई जेवण करायला येत होत्या. आणि एक जोडपं होतं. ते सुध्दा असेच त्याला रस्त्यात मदत मागताना भेटले होते. सलीलने त्यांना त्याच्या घरी आसरा दिला. एक दिवस असाच सुट्टीच्या दिवशी तो ह्या नेहमीच्या गार्डन मध्ये आला होता . तेव्हा त्याला जाणवले की इथे ह्या मुलांना खेळताना पाहून त्याच्या मनाला थोडा आराम मिळतो. तेव्हापासून तो रोजच ह्या गार्डन मध्ये येत होता.

दहा पंधरा दिवस काम केल्यानंतर सानिकाच्या लक्षात आलं की एरव्ही सर मीटिंग्ज ना वेगवेगळ्या वेळी जातात पण रोजचं ते पाच वाजता बाहेर पडून सहा वाजता परत येतात. सलील सर स्वभावाने खूप चांगले होते आणि आपल्या हाताखालील लोकांना आदराने वागवणारे होते. ह्या ऑफिसमध्ये यायला लागल्यापासून सनिकाचं चालणं होतचं नव्हतं कारण ऑफिसच्या बाहेरच बसस्टॉप होता. म्हणून तिने ठरवलं की संध्याकाळी घरी जाताना थोडं चालत जाऊन नंतर बस पकडायची. त्याप्रमाणे संध्याकाळी बाहेर पडून तिने चालायला सुरुवात केली. थोडं पुढे गेल्यावर तिने पाहिलं की एका गार्डन मधून सर बाहेर पडत आहेत. नेमकं त्याच वेळी सलीलचं सानिकाकडे लक्ष गेलं. दोघं एकमेकांबरोबर हसले आणि आपापल्या वाटेने गेले. हे असं पंधरा- वीस दिवस सानिकाने पाहिलं. खरं तर तिला इतरांच्या आयुष्यात डोकावून बघण्याची सवय नव्हती. पण तिला कुतूहल वाटलं . आतापर्यंत सनिकाची आणि सलीलची चांगली ओळख झाली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी ती केबिन मध्ये जाताच सलीलने तिला बसायला सांगितलं. नंतर तो तिला म्हणाला,

" सानिका, गेले काही दिवस तुम्ही मला गार्डन मधून बाहेर पडताना पाहिलंत. तुमच्या मनात प्रश्न नक्कीच निर्माण झाले असतील. नाही का?"

त्यावर ती म्हणाली, " नाही सर हा तुमचा वैयिक्तक प्रश्न आहे. मला कुणाच्या आयुष्यात डोकावून पाहण्याची सवय नाही. मी त्याबद्दल कोणाला काही विचारलं नाही अथवा चर्चाही केली नाही."

" हे तुमचे संस्कार आहेत. पण मी तुम्हाला उद्या माझ्याबरोबर तिथं नेलं तर तुम्ही याल का ? एक मात्र नक्की की मी तिथे फिरायला जात नाही. तुम्ही प्रत्यक्ष येऊन पाहा."

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सलीलने निघताना सानिकाला त्याच्याबरोबर येण्याची विनंती केली. दोघे निघाले. गार्डन मध्ये गेल्यावर एका ठिकाणी काही मुलं खेळत होती तिथे तिला नेलं आणि तिला म्हणाला,

" रोज एक तास मी इथे येऊन ह्या लहान मुलांना पाहत बसतो. माझ्या रोजच्या जीवनातील हे काही विरंगुळ्याचे क्षण आहेत. ही काही मुलं आपल्या आई, बाबा अथवा आया बरोबर आली आहेत. तो कोपऱ्यात एक मुलगा ह्या सर्वांना बघतोय ना तो ह्या सर्वांपेक्षा खूप वेगळा आहे. त्याच नाव जय आहे. सलीलची आणि जयची चांगलीच गट्टी होती. जय गार्डनच्या शेजारी जो अनाथाश्रम आहे त्या आश्रमातला आहे. त्याच्याबरोबर आणखी चार मुलं तेथील दोन सेविकांबरोबर येतात. जय किती गोड आणि निरागस आहे. त्यालाही ह्या मुलांबरोबर खेळावंसं वाटतं पण ती मुलं आपल्याला घेतील की नाही अशी भीती त्याच्या मनात आहे. सानिका मी इथे गेली तीन वर्ष येतोय. तेव्हा जय फक्त चार वर्षांचा होता. त्याला बघून मला माझ्या मुलाची अमेयची आठवण येते."

सानिका त्याला मध्येच थांबवत म्हणाली,
" सर तुमचं लग्न झालंय हे मला माहीत नव्हतं ." तिने सलील कडे पाहिलं तर त्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. सलील तिला म्हणाला,

" कधीतरी मी बोलेन तुमच्याशी. त्याआधी माझ्या डोक्यात खूप दिवसांपासून एक विचार घोळतोय त्याची अंमलबजावणी मला करायची आहे."

सलीलच्या मनात काय आहे हे पुढील भागात पाहू.