नात्यांची गुंफण - ४

ही कथा एका तरुणीची, तिच्या बॉसची आणि अनाथाश्रम मधील मुलाची आहे
नात्यांची गुंफण - भाग ४

सलीलने सकाळी उठल्या उठल्याचं ठरवलं की आज संध्याकाळी आश्रमाच्या संचालकांना जरूर भेटायचं कारण आपण थोडा उशीर केला तर कदाचित आपल्याला पश्र्चाताप करावा लागेल. सलील तयार होऊन खाली आला. तो जेवण करणाऱ्या मावशींशी आत्मीयतेने बोलला. ते जोडपं ज्यांना तो काका काकू बोलत होता, त्यांचीही त्याने विचारपूस केली. नाश्ता करून सलील ऑफिसला निघाला. तो केबिनमध्ये जाताच सानिकाने आत जाऊन आज कोणती कामं करायची हे विचारून घेतलं. दिवसभर आज कोणतीही मीटींग् नसल्या कारणाने सलील केबिनमध्येच होता. संध्याकाळी पाच वाजता निघून तो गार्डनमध्ये आला. लांबूनचं त्याने मुलांना खेळताना पाहिलं. त्याला जयशी बोलावं असं खूप वाटलं पण तो तडक अश्रमात गेला. त्याने तेथील द्वारपालाला संचालकांना भेटायचं आहे असं सांगितलं. तो आतमध्ये गेला आणि त्याने संचालकांची परवानगी घेतली. बाहेर येऊन त्याने सलिलला आतमध्ये जायला सांगितलं. सलीलने संचालकांना नाव सांगितलं. तसं ते म्हणाले,

" बसा ना. अहो तुम्हाला कोण ओळखत नाही. बोला आज माझ्याकडे काय काम काढलंत?" .

सलीलने सरळ मुद्द्यालाच हात घातला. तो म्हणाला,

" साहेब, तुमच्या आश्रमात जय नावाचा मुलगा आहे ना, त्याला मी रोज बाजूच्या गार्डनमध्ये खेळताना पाहतो. तो मला खूप आवडतो. मला त्याला दत्तक घ्यायची इच्छा आहे. मी त्याचं नीट पालनपोषण करेन. त्याला खूप छान शिक्षण देईन. त्याचं भवितव्य उज्वल होईल याकडे मी जातीने लक्ष देईन . तुम्ही त्याची काही काळजीच करू नका. आवश्यक ती कागदपत्र आणि जी काही प्रक्रिया असेल ती पूर्ण करायला मी तयार आहे. मला त्याबद्दल तुम्ही सर्व माहिती द्या." सर्व ऐकून घेतल्यावर संचालक त्याला म्हणाले,

" राजेसाहेब तुम्ही मनाचं खूप औदार्य दाखवलंय. तुमच्यासारखी माणसे पुढे आली तर अशा कितीतरी जयचं खऱ्या अर्थाने कल्याण होईल. बरं मला सांगा तुमच्या कुटुंबात कोण कोण असतं. प्रक्रिया सुरू करण्याआधी हे सर्व मला माहिती करून घ्यावेचं लागेल. दत्तक देण्यासाठी काही नियम आणि अटी असतात. त्यांची पूर्तता करावी लागते. ती आमची जबाबदारी असते."

सलीलने त्यांना त्याची सर्व हकीकत सांगितली व म्हणाला,

" जयला पाहून मला माझ्या मुलाची खूप आठवण येते. सर तुम्ही लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करा."

संचालक सलीलला म्हणाले, " तुमची सर्व हकीकत ऐकून मला खूप वाईट वाटले. शेवटी काय नियतीच्या मनाप्रमाणे सर्व होतं. पण सर, आश्रमाच्या नियमांप्रमाणे आम्ही एकल पालकाला मूल दत्तक देऊ शकत नाही. मूल दत्तक द्यायचं असेल तर त्याला आई बाबांचं, दोघांचं प्रेम मिळायला हवं असा आमच्या आश्रमाचा नियम आहे. मी खूप दिलगीर आहे. मला क्षमा करा. पण ह्यावर एक मार्ग आहे. तुम्हाला कदाचित वाईट वाटेल पण हाच एक पर्याय आहे."

सलीलने त्यांना लगेच सांगितलं की तुम्ही मला मार्ग सांगा. संचालक म्हणाले,

" सर जर तुम्ही पुनर्विवाह केलात् तर तुम्ही दोघं जयला दत्तक घेऊ शकाल. अर्थात ती स्त्री स्वभावाने चांगली असली पाहिजे. तिने जयला आईची माया द्यायला हवी."

संचालकांनी जो मार्ग सांगितला तो ऐकून सलीलच्या पायाखालची जमीनच सरकली. तो सारीकाला कधीच विसरू शकत नव्हता. म्हणून तर त्याने इतकी वर्ष दुसरं लग्न करायचा कधी विचारही केला नाही. खरं तर तो खूप उदास झाला. त्याच्या आयुष्यातील अमेयची पोकळी जय भरून काढेल असं त्याला वाटत होतं. तरीही सलील संचालकांना म्हणाला,

" साहेब पुन्हा लग्न करणं हा विचार सध्या तरी मला अशक्य वाटतो आहे. तुम्ही मला सहा महिन्याचा अवधी द्या आणि या सहा महिन्यात कृपया तुम्ही जयला कोणालाही दत्तक देऊ नका. माझ्यासारख्या बिजवराशी लग्न करायला तयार होईल अशी स्त्री मला शोधावी लागेल आणि ती जयचा स्वीकार करून त्याला आईचे प्रेम द्यायला तयार व्हायला हवी. जयसाठी काहीतरी करावंच लागेल."

संचालकांचा निरोप घेऊन सलील ऑफिसमध्ये आला. त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. काय करावं काही सुचत नव्हतं. हे सर्व कोणाशी तरी बोलावं असं त्याला वाटत होतं. आज तो सहाच्या आधी आल्यामुळे त्याला सानिका तिच्या डेस्कवर दिसली. तिचं लक्ष त्याच्याकडे जाताच तो तिच्याशी हसला आणि केबिनमध्ये गेला. सानिकाच्या लक्षात आलं की सर नेहमीपेक्षा लवकर आले आणि त्यांचं काहीतरी बिनासलेलं दिसतंय. तिच्या मनात विचार आला आपण त्यांना विचारावं का. त्यांना ते आवडेल की नाही, माहीत नाही. सानिकाचा चांगुलपणा तिला स्वस्थ बसू देईना. ती केबिनमध्ये गेली आणि तिने सलीलला विचारलं की तुम्हाला बरं वाटतं नाही का. जय आज तुम्हाला भेटला नाही का?.
सलील तिला म्हणाला,
" सानिका तुम्हाला आज थोडा वेळ आहे का. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.". सानिकाने होकार देताच त्याने त्याची जीवनकथा सानिकाला सांगितली. सगळं ऐकून सानिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती सलीलला म्हणाली,

" सर नियतीने तुमची खूप क्रूर थट्टा केली आहे. देव नेहमी चांगल्या माणसांचीच परीक्षा घेत असतो. हेही दिवस जातील. पण आज तुम्हाला काय झालं आहे ? तुम्ही खूप बेचैन दिसत आहेत. जय तुम्हाला भेटला नाही का ?" त्यावर सलीलने जायला दत्तक घेण्याचा त्याचा विचार आणि आज आश्रमात काय घडले ते सांगितलं. तो तिला म्हणाला,

" मला वाटलं होतं की जयला दत्तक घेतल्यावर माझ्या आयुष्यात थोडाफार आनंद येईल. पुन्हा लग्न करणं मला पटत नाही. मी सारीकाला कदापि विसरणं शक्य नाही. समजा मी जयसाठी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला तरी माझ्यासारख्या बिजवराशी लग्न करायला एखाद्या मुलीने अथवा घटस्फोटीतेने, विधवेने तयार व्हायला हवं. शिवाय तिने जयला आईचं प्रेम द्यायला हवं." .सानिकाने सलीलची समजूत काढून सांगितल की ह्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल आणि ती घरी आली.

सलिलला मार्ग मिळेल का हे पुढच्या भागात पाहू.

क्रमशः

©️®️सीमा गंगाधरे

🎭 Series Post

View all