Login

नात्यांची वीण (प्रशांत कुंजीर) अंतिम भाग

आई मुलाच्या हळव्या नात्याची वीण उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न



नात्यांची वीण (प्रशांत कुंजीर) अंतिम भाग

मागील भागात आपण पाहिले धाराऊ गडावर जायला तयार झाली. जिजाऊ आणि सईबाई अस्वस्थ होत्या. ज्या बाळाला स्तनपान करायचे ते बाळ खुद्द युवराज आहेत हे धाराऊला समजले. आता पाहूया या नात्यांची वीण कशी पूर्ण झाली.


आऊसाहेबांनी युवराजांचे नाव उच्चारले आणि धाराऊच्या काळजाचा ठोका चुकला.
धाराऊ क्षणभर स्तब्ध झालेली पाहून सईबाई म्हणाल्या,"बोला धाराऊ,बोला. द्याला माझ्या बाळाला अमृतधारा. त्या बदल्यात तुम्हाला काय हवे ते मागा. अगदी आमचे प्राणही."

सईबाई सैरभैर झाल्या होत्या.
"बोला धाराऊ, तुम्हाला काय हवे ते मागा." आऊसाहेब पुन्हा म्हणाल्या.

धाराऊ शांतपणे उठली आणि सईबाईंजवळ गेली. तिने सईबाईंचे हात हातात घेतले.

" राणीसाब,आव आईच्या दुधाची काय किंमत लावू. आन किंमत मागू कुणाकडं? ज्या राजांनी समदा मुलुख साजरा केला त्यांच्या कारभरणीकड. आऊसाब,ही धाराऊ पाटलाची लेक हाय."

तिने शांतपणे शंभुराजांना घेतले आणि सरळ पदराखाली धरले. चुळबुळ करणारे बाळराजे शांत झोपी गेले.


मग बाळाला सईबाईंकडे सोपवून धाराऊ म्हणाली,"आई शिरकाईची आण घिऊन सांगते बाळ राजांना काळजाच्या तुकड्यासारखं जपील."


सईबाई आसनावरून उठल्या आणि त्यांनी धावत जाऊन धाराऊला घट्ट मिठी मारली. अश्रुंच्या धारात एक वेगळी नात्यांची विण गुंफली जात होती.


धाराऊ बाहेर आली. तुकोजी पाटील तिची वाट बघत होते.

" धनी!" बस एकाच हाकेत तुकोजीनी धाराऊचे मन वाचले.

तुकोजी धाराऊ आणि बयाजीला गडावर ठेवून परत फिरले. धाराऊ आली आणि बाळराजांनी बाळसे धरले. परंतु सईबाईंची तब्बेत मात्र खालावू लागली.

शेवटी वैद्यांनी सईबाईंना राजगडावर न्यायचा सल्ला दिला. पुतळाबाई प्रचंड आनंदी झाल्या. सईबाई गर्भार असताना त्या त्यांना एकदाच भेटल्या होत्या. आता बाळराजे येणार याचा त्यांना प्रचंड आनंद होता.

राजगडावर आल्यावर सुद्धा सईबाईंच्या प्रकृतीत चढ उतार होत होते. धाराऊ बाळराजांना जिवापाड जपत असे.

एकदा असेच सोयराबाई महाली आल्या असताना बाळराजे कुणबी बोलीत त्यांना हाक मारू लागले.

" शंभूराजे,तुम्ही युवराज आहात. ही कसली भाषा बोलताय?" असे म्हणून त्यांनी एक जळजळीत कटाक्ष धाराऊकडे टाकला.

सईबाई हसल्या आणि राजांना जवळ घेऊन म्हणाल्या,"ही रयतेची बोली. रयत म्हणजे मायबाप आणि मग मायबापाची बोली बोलण्यात कमीपणा कसला?"


सोयराबाई फणाकऱ्याने निघून गेल्या. "धारा,उद्या आम्ही नाही राहिलो तरी बाळाला जपा."

"राणीसाब ही धाराऊ गडावर हाय तवर राजांना काळजात ठीवून जपणार बगा. पर तुमी आस वंगाळ बोलू नगा."

सईबाई अशक्त होत होत्या. त्यांना पैलतीर खुणावत होता आणि त्याच वेळी त्यांच्या बाळाच्या बरोबर असलेली घट्ट वीण त्यांना सोडवत नव्हती.

बाळराजे आता चालू लागले. बोबड्या बोलानी बोलू लागले. त्यांना जीव लावत असताना धाराऊ हे कधीच विसरत नसे की ते युवराज आहेत. तसेच अदबीने धाराऊ वागत असे.


वैद्य प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पावसाळा सुरू झाला आणि सईबाईंची प्रकृती खालावली. प्रचंड कृश झालेल्या सईबाई अस्वस्थ होत्या. त्यांचा जीव बाळराजांत अडकला होता. असेच एक दिवस पुतळाबाई त्यांना भेटायला आल्या.

" थोरल्या बाई,पेज आणली होती. दोन घोट घ्या. हुशारी वाटेल."

सईबाई कष्टाने उठल्या त्यांनी पुतळाबाईंचे हात हातात घेतले,"पुतळा,आमचे आईपण इथपर्यंतच होते. बाळराजांना सांभाळा. धाराऊला अंतर देऊ नका."

"थोरल्या बाई,असे निर्वाणीचे का बोलता?" पुतळाबाई व्यथित झाल्या होत्या.


वैद्य उपचार करत होते. परंतु अखेरीस दोन वर्षांचा शंभुराजांना पोरके करून सईबाई निघून गेल्या.

आई आणि मुलाच्या नात्याची वीण अपुरी राहिली. धाराऊ ती वीण तिच्या परिने सांधत होती. परंतु छत्रपती पोरके झाले हेच खरे.



इथे इतिहास सांगायचा उद्देश अजिबात नाही. एक राजस्त्री आई म्हणून आगतिक असताना धाराऊ सारख्या स्त्रीने असामान्य निर्णय घेऊन तिचे स्वतःचे आई सई बाईसाहेबांचे आईपण जपले जोपासले. हीच नात्यांची वीण उलगडण्याचा हा एक प्रयत्न.


©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all