Login

नात्यांच्या पलीकडे...

This is the story which revolves around show pieces in the house are talking with each other. This relation is beyond blood relation.

*नात्यांच्या पलीकडे . . .*

"आनंदी आनंद गडे
 जिकडे तिकडे चोहीकडे..."

"अरे चंगू-मंगू, तुम्ही आज खूपच आनंदात दिसताय. काय आहे काय एवढं विशेष?" ताजमहलने चंगू-मंगूला विचारले. त्याचबरोबर चंगूने उत्साह व आनंदाने भरलेल्या आवाजात बोलायला सुरुवात केली, "अरे ताजमहाल, आज जवळजवळ एक महिन्याची सुट्टी संपवून वहिनी, नील व निकीता घरी परतले आहेत. एकदम प्रसन्न वाटतंय. एवढे दिवस आपण नुसते धूळ खात बसलो होतो. पूर्ण अंधारात. कोणी बघायला, लक्ष द्यायला नव्हतं ना घरी. सुरुवातीला बोलण्याचा, हसण्याचा आवाज होता आपल्या सगळ्यांचा. पण नंतर नंतर आपण पण कंटाळून गेलो ह्याला."
 तेवढ्यात मंगू म्हणाला," निकीताचा निरागस सूर व नीलचा खट्याळ ताल ह्याला मी सर्वात जास्त मिस केलं." 
"अगदी नीलच्या भाषेतच बोललास", असं चंगू म्हणला आणि एकच हशा पिकला.
 "जशी सुट्टी संपली तशी वहिनी, नील व निकीता घरी परतल्या  आणि वहिनीनी तर लगेचच घर स्वच्छ करायला सुरुवात केली पण. आमचा त्यात पहिला नंबर लागला व आंघोळ झाली. आम्ही ताजेतवाने झालो पण, ताजमहाल तू अजून तसाच दिसतोय पारोसा, काळा लाल", असं 
म्हणत चंगू-मंगू जोर-जोरात हसू लागले.  
ताजमहलच्या नाकावर राग आणि गाल फुगलेले सदैव 
असतात. तसे त्याला ते शोभून दिसतात म्हणा. त्याप्रमाणे ताजमहाल नाक फुगवत म्हणाला, "मी सगळ्यात गोरा व सुंदर आहे आणि नेहमी मीच राहणार. माझ्या सौंदर्याला जगन मान्यता आहे." डेकोरेशन सायकलने मध्ये बोलायला सुरुवात केली अगदी दोन कार मध्ये सायकल 
घुसवावी तसं, "ताजमहाल आपल्या सर्व मित्रमंडळींमध्ये खरंच सौंदर्यवान आहे हे मान्य केलंच पाहिजे पण, बाकीचे देखील त्यांच्या त्यांच्या जागी सुंदर आहेतच." ताजमहाल व डेकोरेशनच्या बोलण्याला शह देत चंगू-मंगूचा मूळ विषय केरळच्या हत्तीने पूर्वपदावर आणत 
म्हणाला, "आज खूप दिवसांनी किती फ्रेश वाटतंय, 
कारण आपल्या वहिनी, नील आणि निकिता आल्या. 
वहिनी कितीही दमल्या तरी आपल्याला स्वच्छ करण्याचं काम त्या कधीही विसरत नाही हे मात्र विशेष."  छोट्या कंदीलानी हत्तीच्या बोलण्यात री ओढत म्हणू लागला,
" नील आणि निकिता जरी ही त्यांची खरीखुरी मुलं
 असली तरी त्या आपल्याशी देखील तेवढ्याच प्रेमाने व आपुलकीने वागतात. मला तर वाटतं थोडा झुकता कल आपल्याकडेचं आहे वहिनीचा. नाही का रे वेडावाकडा फ्लाॅवर पाॅट...?
असं छोटा कंदील म्हणताचं, वेडावाकडा फ्लाॅवर पाॅट ने त्याचे तोंड अजूनच वेडवाकडं केलं. आणि रडत बोलू लागला, "तुम्ही पण खट्याळ नील सारखं वेडावाकडा 
म्हणतायं मला."
मग मात्र चिऊताई खोप्यातून डोकावून पाहू लागली. 
"अरे, असं रडू नये फ्लाॅवर पाॅट. तुझा हा आकार तुझं सौंदर्य खुलवतो. सर्वात तू जास्त अमूल्य आहेस असं दादा आणि वहिनी नेहमी म्हणतात हे विसरलास का?" चिऊताईच्या गोड वाणीने फ्लाॅवर पाॅट ची कळी खुलली. आता फ्लाॅवर पाॅट सांगू लागला, "सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला स्वच्छ करत असताना वहिनी जे
 कापड वापरते ते देखील अतिशय मुलायम आणि स्वच्छ 
असते. मी तर सारखा पाण्यात असतो पण वहिनीच्या वात्सल्यपूर्ण व उबदार स्पर्शाने शीण अगदी गळून पडतो आणि नवी पालवी फुटल्यासारखं टवटवीत वाटतं." पाण्याचं नाव काढताचं दाल लेकच्या काश्मिरी शिकारा बोटीने सरसावून बोलायला सुरुवात केली, "खरंतर सुरुवातीला माझ्या मनात संमिश्र भावना होत्या. अगदी 
लग्न ठरलेल्या मुलीसारखं.  एकीकडे नविन आयुष्याची सुरुवात तर दुसरीकडे आपल्या गावाचं, माणसांच्या 
विरहाचं दुःख. माझी पण स्थिती अशीच होती. मी माझं काश्मीर, माझे नातेवाईक या सगळ्यांना सोडून येणार आणि त्यात  काश्मीर मध्ये खूप थंड हवा पण इथं मुंबईला खूपच गरम आणि दमट हवा. माझा कसा निभाव लागेल अशी काळजी माझ्या आईला वाटत होती. पण जेव्हा 
वहिनी, दादा, नील व निकीता माझ्या घरी आले तेव्हा निकीता ने मला घेतले. ती अतिशय प्रेमाने माझ्याकडे
 बघत होती.  वहिनीने जेव्हा प्रेमाने पाठीवरून हात 
फिरवला, तेव्हा आई म्हणाली ह्या घरी प्रत्येकजण खूप आनंदी राहील आणि मी इथे आले. आता तर
 तुमच्यासारखे काळजी घेणारे एकदम छान मित्रमंडळ
 असल्यामुळे मी इथे मस्त रमले. गर्मीमधील शितलता 
अनुभवत आहे.
इतक्यात वाद्यवृंदातल्या सहा भावंडांमधल्या सनईकार दादानी सुमधुर सनई वाजवायला सुरुवात केली आणि इमोशनल झालेलं वातावरण एकदम प्रफुल्लित आणि भान हरपणार केलं. त्याच्या दुसऱ्या भावानी म्हणजेच ढोलकीकार दादा नी म्हटलं, "वहिनी तर छान आहेतचं पण दादा सुद्धा अगदी साधे आणि सभ्य आहेत. ते कामात व्यस्त असतात.  पण नील आणि निकिता साठी 
शनिवार-रविवार अगदी वेळ  काढतातच. ते दोन दिवस
 पर्वणीच असते त्यांच्यासाठी. खरं तर आपल्यासाठी 
पण..."
तेवढ्यात, घड्याळात बारा वाजल्या ने कुक्कू सरांना खूप वेळ बाहेर यायला मिळणार याचा आनंद त्याच्या 
चेहर्‍यावरून दिसत होता. म्हणून सगळ्यांनी कुक्कू 
सरांना  बोलायला चान्स दिला. एकतर ते फाॅरेन (जर्मनी) चे. त्यामुळे ते 'कुक्कू सर' म्हणून विख्यात होते. वेळेचा पुरेपूर उपयोग करत कुक्कू सरांनी स्वानुभव सांगायला सुरुवात केली, "मी जेव्हा नवीन आलो ना घरी, तेव्हा सगळ्यांना अगदी कुतूहल वाटायचं विशेष म्हणजे नील 
आणि निकिताला. एव्हाना त्यांना समजलं होतं १२ 
वाजले की मी जास्त वेळ बाहेर येणार आहे. त्यामुळे माझी वाट बघत बसायचे आणि मी बाहेर आलो की
 आनंदाने उड्या मारायचे. एक दिवस तर निकीता ने
 मज्जाच केली. मी बाहेर आलो, तसं 'कुक्कू आले, कुक्कू आले. जसं काय पाहुणे आले घरी आणि चहा, पोहे करायचेत. तसं माझी काॅलर ताठ झाली. तसंच मी १२ वाजता आलो कि खूप वेळ असतो हे नीलकुमार च्या लक्षात
 आलं होतं. म्हणून तो माझे दोन्ही हात म्हणजे हे सगळे काटे म्हणतात ते त्याने गरागरा फिरवून १२ ला आणले.  असं जवळपास २-३ वेळेस केलं. तेव्हा मात्र मला खूप त्रास झाला. आणि मग जेव्हा हे नीलकुमारचे उद्योग दादा व वहिनींना समजले तेव्हा चांगलाच धपाटा मिळाला नीलला. तेव्हा मात्र मला थोडं वाईट वाटलं. पण मला झालेला हा त्रास त्यांना बघवला नाही, ह्याचं समाधान वाटलं." असं श्वास रोखून पटापट बोलून कुक्कू सरांनी घड्याळ्यात धूम ठोकली. त्या गडबडीत कुक्कू सरांनी 'सर व मॅम्' च्या 
ऐवजी, दादा व वहिनी असं म्हटलं. एव्हाना सर्व
 मित्रमंडळींच्या हे लक्षात आलं होतं. 
"अरे मित्रांनो, मी तर ऐकलं होतं माझ्या एका 
मैत्रिणीकडून की त्यांच्या घरी दिवसभर कोणीच नसतं. 
घरातली माणसं सकाळी लवकर ऑफिस का काय असतं त्याला बाहेर पडतात अन् ते रात्रीच येतात. एकमेकांशी बोललेलं पण ऐकलं नाही. एकमेकांशी जर बोलयल वेळ 
नसेल तर आमच्याशी कुठे बोलणार आहे, आमच्याकडे कुठे लक्ष राहणार. हे सगळ दूरच. ते घर असं नव्हतंच.
 फक्त मोठ्या मोठ्या भिंती. आणि बंदिस्त जागा. तिथल्या आपल्यासारख्या मित्रमंडळींना फक्त शनिवार-रविवार 
आवडायचा तेवढेच दोन दिवस घरात कोणीतरी आहे
 असं वाटत होतं. हो ना हो, आपल्या ते आजमेर से मित्रमंडळी सांगत होते ना..." असं सौ. कटपुतलींनी सांगितलं.
कुटुंबातील कर्ता असल्याप्रमाणे श्री. कटपुतली नी हो ना असं म्हणतं सुरुवात केली, "आपण खूपच नशीबवान 
आहोत. आपल्याला वहिनी आणि दादाचं घर मिळालं. नील आणि निकिता सारखे छोटे भाऊ, बहीण मिळाले. ते आपली मनापासून काळजी घेतात. आपण जरी 
माणसांच्या दुनियेतील निर्जीव घटक असलो, तरी
 आपल्या नगरीतले मनुष्यचं आहोत ना. सजीव, अगदी
 सजीव... त्यांच्या दृष्टीने जरी आपण घरातली शोभा 
वाढवणारे एक डेकोरेशन असलो, तरी सुद्धा वहिनी आणि दादा मात्र आपल्याला त्यांच्या कुटुंबातल्या मेंबर्सप्रमाणेच वागणूक देतात."
सगळ्यांनी श्री. कटपुतलींना होकारार्थी मान हलवली. 
पण, पंचपक्वान असलेल्या ताटामध्ये मिरचीचा तडका 
पण लागतोचं की, तसंच आमच्या फ्रेमचं आहे. काहीतरी तक्रारीचा सूर असतो. तरी अजून कसं काय फ्रेमनी रडका स्वर लावला नाही असं म्हणताचं फ्रेम बोलू लागली, 
"तुमचं सगळ्यांचं मस्त आहे. तुम्हाला वहिनी स्वच्छ 
करतात. तुमची बसण्याच्या जागा बदलतात. त्यामुळे तुम्ही इकडून तिकडे फिरता. कधी कधी तर तुमचे मित्र मंडळी पण बदलतात. माझं तसं नाही. आम्ही तर लटकलेलोच या भिंतीवर..." असं म्हणत फ्रेमचा चेहरा लांबच लांब झाला. 
चिऊ, चिऊ असा गोड आवाजात  चिऊताईने खोप्यातून परत एकदा मान डोकावली व बोलायला लागली, "अरे
 पण घरात कोणीही पाहुणे जेव्हा येतात, तेव्हा त्यांचं
 पहिलं लक्षं तुझ्याकडेच जातं आणि किती भरभरून कौतुक करतात ते तुझ्या रूपाचं. रूक्ष वाटणाऱ्या ह्या भिंतींना लावण्यवती चा बहुमान तुझ्यामुळेच तर मिळतो. या भिंती नेहमी तुझ्या शतशः आभारी आहेत."
चिऊताई च्या समजुतीच्या बोलण्याने फ्रेमचा लांब झालेला चेहरा आता अगदी बहारदार  झाला. 
तसंच चिऊताई पुढाकार घेत आणि मधुर वाणीने अजून बोलायला लागली, "कोणी राजस्थान होऊन आलंय, तर कोणी काश्मीर, कोणी केरळ होऊन आलंय, तर कोणी गुजरात होऊन. पण आता आपण एक कुटुंब आहोत. वहिनी व दादा जशी आपली काळजी घेतात तशी  आपण देखील एकमेकांची काळजी घ्यायची. 
"एकमेकां सहाय्य करू,
अवघे धरू सुपंथ..."
आपण आपल्या देवाचे नेहमीच ॠणी आहोत कि 
आपल्याला एवढं छान घर मिळालं. निर्जीव माणसांतले सजीव भाव ओळखून, माणुसकी जपणारे घर मिळालं." असं म्हणून चिऊताई ने देवाला नमस्कार केला. 
सगळ्यांनाच चिऊताई चे म्हणणं पटले. 
सर्वांनी विविधतेतली एकता दाखवत दादा, वहिनी, नील व निकीता चे मनापासून आभार मानले व आशिर्वाद दिले.
तसेच, वास्तुदेवतेने देखील 'तथास्तु' म्हटले...!!!