Login

नात्यात अंतर नको भाग १

आईच्या वागण्याचा त्रास होऊ लागला. शेवटी

कथेचे शीर्षक - नात्यात अंतर नको - भाग १
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५


"कुंदा, आज येतेस ना? तुझ्या आवडीचा स्वयंपाक बनवला आहे." सरला लेकीशी फोनवर बोलत होती.

"आई, माझी सगळी तयारी झाली होती गं; पण अचानक पाहुणे आले. आजही जमणार नाही. सॉरी आई."

"ठीक आहे." सरलाला वाईट वाटलं.

लेक येणार म्हणून किती खुश होती.
सकाळ पासून राबत होती. तिच्या आवडीचा स्वयंपाक केला होता. ती आली की गप्पा मारायच्या होत्या. अचानक पाहुणे आले
आणि सगळा प्लॅन विस्कटला.


'गेल्यावेळी देखील माझी लेक इथे यायला निघाली आणि सासूबाईची तब्येत बिघडली. सहा महिने झाले, एका शहरात राहून लेकीला भेटू शकत नाही. तिच्या सासरी तरी कसं जावं? बरं दिसतं का? आणि गेलेलं आवडणारही नाही.' मनातल्या मनात विचारचक्र सुरूच होते.

दिवसभर जेवली देखील नाही.

सरला तोंड पाडूनच बसली होती. सरलाचा मुलगा केतन ऑफिसवरून आला. आईचा असा चेहरा पाहिला आणि
त्याच्याही लक्षात आले की नक्कीच काहीतरी झालं आहे, त्याशिवाय आई तोंड पाडून बसणार नाही. त्याने ऑफिसची बॅग ठेवली आणि तिच्यापुढे बसला.

"आई, काय झालं?  उदास दिसतेस." तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.

तिने डोळ्याला पदर लावला.

केतनला आईसाठी वाईट वाटलं.

"आई, का रडते आहेस? सांग ना."

तिने डोळे पुसले.

"केतन, ताई येणार होती; पण तिच्याकडे पाहुणे आले. खरं तर प्रत्येकवेळी तिच्या सासूबाई असं करतात. काही ना काही बहाणा करतात. सहा महिने झाले मी माझ्या लेकीला डोळे भरून पाहिले नाही."

"हा काय विचित्र प्रकार? प्रत्येकवेळी ती इथे यायचं म्हणाली की तिला रोखतात. तिला नको का चार दिवस माहेरपण?  थांब मीच नरेश भाऊजींशी बोलतो."

तो रागातच फोन करणार तोच सरलाने त्याला रोखलं.


"केतन, नको करू फोन. तुला माहीत आहे ना जावई बापू आईच्या शब्दाबाहेर नाहीत. उगाच त्या नवरा बायकोमध्ये वाद होतील."


"आई, मग हे असं किती दिवस चालणार? आपण गप्पच बसायचं का? किती दुर्लक्ष करायचं?"

शेवटी भावाचं काळीज, बहिणीसाठी वाईट वाटत होतं. मोठ्या बहिणीवर कुंदावर खुपच जीव. बाबा गेल्यावर केतनने खांद्यावर जबाबदारी घेतली. आई आणि बहीण त्याच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. कॉलेज करत त्याने जॉबही केला. त्याला घरची परिस्थिती माहीत होती. तो घरात लहान असला तरी देखील आता तोच कर्ता पुरुष झाला होता. जबाबदारी खांद्यावर घेतली होती. आई आणि बहीण त्याच्यासाठी सर्वस्व होत्या. त्यालाही बहिणीसाठी वाईट वाटत होतं.
आईने रोखलं नाही तर तो नरेशसोबत बोलणारच होता.

काय होईल पुढे?
पुढचा भाग जरूर वाचा.

क्रमशः
अश्विनी ओगले.

साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
0

🎭 Series Post

View all