नात्यात अंतर नको. भाग ४ अंतिम
कथेचा पूर्वार्ध.
गेल्या भागात आपण पाहिले की कोमलने कुंदाची आणि बाळाची खूप काळजी घेतली. कुंदा सासरी गेली. केतनला आईच्या स्वभावात झालेला बदल लक्षात येत होता. आता पाहू पुढे.
गेल्या भागात आपण पाहिले की कोमलने कुंदाची आणि बाळाची खूप काळजी घेतली. कुंदा सासरी गेली. केतनला आईच्या स्वभावात झालेला बदल लक्षात येत होता. आता पाहू पुढे.
कोमल खूप दिवस झालं माहेरी गेली नव्हती.
केतनला तिने माहेरी जात असल्याचे सांगितले.
ऑफिसवरून ती आईकडे गेली. एक दिवस राहणार होती.
"केतन, कोमल आज राहणार आहे तिथे?"
"हो आई. कुंदा ताई आल्यापासून ती गेलीच नव्हती."
"ठीक आहे." तिच्या चेहऱ्यावर नाराजी होती.
ह्या सर्व गोष्टी केतनच्या लक्षात येत होत्या.
कोमलला दिवस गेले.
केतनचा आनंद गगनात मावत नव्हता. सरला देखील खुश.
कोमलला त्रास होऊ लागला. अशक्तपणा, उलट्या सुरू झाल्या.
केतन काळजी घेऊ लागला.
कोमल आधीसारखी ऍक्टिव्ह नव्हती, असंही त्रास होतो.
"कोमल, अश्या वेळेस बाईने सतत कामं करावी, म्हणजे डिलिव्हरी नॉर्मल होते. झोपून राहू नको."
"आई, आता तिला त्रास होत आहे तर ती कशी कामं करणार? आता तुलाही कामं होत नाही आपण सर्वच कामाला बाई लावूया."
"आताच्या मुलीच नाजुक." असं बोलून सरला निघून गेली.
"कोमल, आईचं बोलणं मनावर घेऊ नको. तूला नाही जमत तर काही करू नको. मी आहे."
केतन तिला खूप आधार देत होता.
आईचं असं वागणं त्यालाही पटत नव्हतं.
त्याला असं वाटायचे की आई समजून घेईल; पण उलटंच होत होतं.
कोमलला बाळ होईपर्यंत त्याने शांत बसायचं ठरवलं.
उगाच तिला त्रास नको.
नऊ महिने सरले आणि तिने बाळाला जन्म दिला. मुलगा झाला होता. सगळेच खुश होते.
घरात आनंदाचे वातावरण होते.
कोमलची आई देखील बाळाला बघायला आली.
केतन जाणून होता की, कोमलच्या आईची तब्येत नरम गरम असते. त्यांना कोमल आणि बाळाची काळजी घ्यायला जमणार नाही. कुंदाची काळजी कोमलने घेतली होती.
आता कोमलची काळजी घ्यायची होती. तो जमेल तितकी काळजी घेत होता, पण अशा वेळेस आई सोबत असेल तर तिलाही बरं वाटेल हा विचार आला.
"आत्या, तुम्हीच या आमच्या ईथे. आम्हाला बरं वाटेल." तो कोमलच्या आईला म्हणाला.
कोमलनेही आईला विनंती केली.
कोमलच्या आईनेही विचार केला की बाळासोबत वेळ घालवता येईल आणि जमेल तसं लेकीची काळजी घेता येईल.
ती देखील आली.
कोमल खूप खुश होती. आई असं पहिल्यांदाच राहायला आली होती.
सगळं काही छानच चाललं होतं.
"कोमल, जावई बापू लाखात एक आहे हं." कोमलची आई.
"हो गं आई मला कसल्याच गोष्टीची चिंता नाही. खूप काळजी घेतात. खूप प्रेम करतात."
बघता बघता पंधरा दिवस झाले आणि कोमलची आई निघू लागली.
निघताना ती भावनिक झाली. रडायला लागली.
"अहो ताई इतकं काय रडताय, असंही कोमल सारखी माहेरीच असते." सरला म्हणाली.
कोमल आणि तिच्या आईला वाईट वाटलं.
ती निघून गेली.
केतनला ते अजिबात आवडलं नाही.
"आई, तू आत्याबाईंना असं का म्हणाली?"
"मी काय चुकीचं बोलले, कोमल तिच्या आईकडे सारखीच जात असते."
"आई, खरंच तू सासूच्या भूमिकेत शिरली आहेस."
"केतन, काय बोलतोय?" तिचाही आवाज वाढला.
कोमल बाळाला घेऊन रूममध्ये होती.
हे सगळं ती ऐकत होती.
"आई, ते बोलतात ना आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कारटे ते खोटं नाही. त्या दिवशी ताईची सासू तिला पाठवत नाही म्हणून तुला रडायला येत होतं. ताई गरोदर राहिली तेव्हा तिला म्हणाली काळजी घे आणि जेव्हा कोमलची वेळ आली तेव्हा म्हणाली आजकालच्या मुली नाजुक असतात. का आई असा भेदभाव? कोमलचे वडील नाहीत. तिची आई एकटी असते. गेली ती भेटायला तर काय बिघडले? ताई इथे होती तेव्हा ती माहेरी गेली नाही. ताईची काळजी घेतली. ते तुला कसं दिसलं नाही? प्रत्येकवेळी तिच्यामध्ये काय दोष आहे हेच बघायचं का? आई, ह्या साठी माझं लग्न केलं का? ताईसाठी तुझा जीव तुटतो मला माहीत आहे. ती माहेरपणाला येत नाही. भाऊजी त्यांच्या आईसमोर एक शब्द बोलत नाही. तू मलाही बोलू देत नाही. मग आता आपण कोमलला देखील तशीच वागणूक द्यायची का?"
त्याचे डोळे खूप काही सांगत होते.
तो पुढे बोलू लागला.
तो पुढे बोलू लागला.
"आई, आता मला तुझ्यात ताईची सासू दिसायला लागली आहे. आई, हे सगळं प्लिज थांबव नाही तर नात्यात अंतर पडेल ते कायमचं. ते मला नको आहे."
त्याने दोन्ही हात जोडले.
तो रूममध्ये निघुन गेला.
ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत त्याच्या बोलण्याच्या विचार करू लागली.
समाप्त.
कथा लेखन - अश्विनी ओगले.
कथा आवडली असेल तर एक लाईक जरूर द्या आणि कंमेंट करायला विसरू नका.
साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा