Login

नात्यात गोडवा हवा भाग १

सुना जातात कामाला, घर सासु सांभाळते
"तुझी बायको काहीच कामाची नाही. ती जाते ऑफिसला घराकडे मला लक्ष द्यावं लागतं." साधना प्रतीकला रागातच म्हणाली.

"आई, वैभवी फक्त माझी बायको आहे का?  तुझी कोणीच नाही ती?"

तितक्यात वैभवी ऑफिसमधून आली. बॅग ठेवली आणि लगेच जेवण बनवायला किचनमध्ये गेली.

प्रतीक आणि वैभवी  दोघांचा संसार सुखाचा चालला होता.
दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.

दोघांचं अरेंज मॅरेज होते. नात्यातील एका व्यक्तीने लग्न जमवलं होतं. लग्न झाल्यावर एकमेकांचे स्वभाव समजायला जरा वेळ गेला.
वैभवी जास्त बोलायची नाही. तिचा स्वभाव चांगला होता. प्रतिकने हळूहळू त्याच्या प्रेमाची जादू अशी केली की, शांत वैभवी बोलकी झाली. प्रतिक समजुतदार होता,तिला समजून घ्यायचा.

प्रतिकचे आई बाबा गावीच राहायचे. सगळं ठीक चाललं होतं. अचानक आजाराचं निमित्त होऊन प्रतीकचे बाबा देवाघरी गेले.
साधनाला एकटीला गावी ठेवू शकत नाही हाच विचार करत असताना वैभवी आली.

बाबा गेल्याचे दुःख त्याच्या डोळ्यात दिसत होतं.
लहानमुलाप्रमाणे तो रडू लागला.

वैभवीला देखील त्याच्यासाठी वाईट वाटत होतं. तिलाही रडू येत होतं.

"वैभवी, बाबा आपल्याला सोडून गेले." डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. त्याला शांत केलं.

"प्रतीक, तू असा धीर सोडला तर मग आईने कोणाकडे बघायचे. बघ माझ्याकडे."

प्रतिकने तिच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिले.

"प्रतीक, आता घरातला कर्ता पुरुष तू आहेस. असं खचून चालणार नाही. हार मानू नको. आईंना आपणच सावरायला हवं की नाही?"

" तू बरोबर बोलतेय वैभवी. आईची काळजी घ्यायची जबाबदारी माझी आहे." त्याने डोळे पुसले.

"अजून एक आता बाबा होते तोपर्यंत सगळं ठीक होतं; पण आईंना असं इथे एकटं ठेवता येणार नाही. आपल्यासोबत मुंबईला घेऊन जाऊया.  आपल्यासोबत त्या राहिल्या की, त्यांचं मनही रमेल."

प्रतिकच्या मनातलं बोलली होती ती.

प्रतीक आईला मुंबईला घेऊन आला. नवऱ्याच्या विरहाने तिला त्रास होत होता. वैभवी तिचं मन वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. अधूनमधून मॉलला घेऊन जाणं, पिक्चरला घेऊन जाणं आवर्जुन करत होती.

साधना घरी राहिली की, अनेक आठवणीने तिचे मन भरून येत.
वैभवी सतत गप्पा मारत ह्या विचाराने की साधनाला बरं वाटेल.

वैभवी जे देखील करत होती ते प्रतीक पहात होता. त्याला वैभवीचं कौतुक वाटत होतं. बायकोच्या बाबतीत तो स्वतःला नशीबवान समजत होता.

"वैभवी, किती करते आहेस तू? आईला निराशेतून बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न करते.  मनापासून थँक्स वैभवी." तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवत म्हणाला. 

"प्रतीक, थँक्स बोलून तू मला परकं करतो आहेस. हे सगळं करते आहे ते मी माझ्या आनंदासाठी."

साधना हळूहळू विचारातून बाहेर पडली.

सोसायटीत तिच्या मैत्रिणी झाल्या.  पिकनिक, देवदर्शन हे होत राहायचे. साधनाचे मनही रमू लागले होते. ती आता खुश राहू लागली. अधूनमधून नवऱ्याच्या आठवणीने डोळे भरून यायचे. तरी तिने स्वतःला बऱ्यापैकी सावरलं होतं. त्यात वैभवीची मोलाची साथ होती.


सोसायटीतील मैत्रिणी संध्याकाळी जमल्या की, गप्पा कमी आणि  घरात काय चाललं आहे हे सांगत बसायच्या. एकमेकींना सुनांचे किस्से अगदी रंगवून सांगायच्या.  गाऱ्हाणे गात बसायच्या. साधना देखील सासूच्या भूमिकेत शिरली होती. वैभवीमध्ये काहीच कमी नव्हती. तिच्याबद्दल वाईट बोलायला ती तशी वागत नव्हती, मुळात तिचा स्वभाव तसा नव्हताच. हळूहळू साधना बदलत चालली होती. जशी संगत तशी रंगत चढते हे देखील तितकेच खरं.  आधी साधना वैभवीशी खुलुन बोलायची, मात्र आता ती जास्त बोलायची नाही. स्वतःच्या विश्वात राहू लागली.

तो बदल वैभवीच्या लक्षात आला. तिला आधी वाईट देखील वाटलं; पण तिने मनाची समजुत घातली, कमीत कमी साधना तिच्या मैत्रिणीसोबत खुश असते.

वैभवी लग्नाआधी जॉबला जायची. आता तिला घरात बसून कंटाळा येऊ लागला.

प्रतिकने तिला ऑफिसला जाण्याचा सल्ला दिला.

हो नाही करत तिने विचार केला 'जॉबला लागले की, मन रमेल. प्रतीक बरोबर बोलत होता. लग्न झालं म्हणून स्वतःचं अस्तित्व विसरून चालणार नाही.'

तिला कामाचा चांगला अनुभव होता.
कम्युनिकेशन स्किल देखील चांगलं होतं. एका चांगल्या कंपनीत तिने इंटरव्यू दिला आणि ती सिलेक्ट देखील झाली.

" वैभवी, आय एम सो हॅपी फॉर यू. फायनली तुला जॉब लागला. पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा." त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.

साधना इतकी काही खुश नव्हती.
वैभवी जॉब शोधते आहे हे तिने जेव्हा  तिच्या मैत्रिणीला शामलला सांगितले, तेव्हा शामलने एक कानमंत्र दिला होता.

"सुना,कामाला लागल्या की, घराकडे लक्ष देत नाही. त्या जातात कामाला आणि घराकडे लक्ष सासूला द्यावे लागते."

ठिणगी पडली होती. ती कसा पेट घेणार होती माहीत नाही.
एक मात्र होतं कानात गेलेलं विष हे नात्यांचा एक ना एक दिवस जीव घेतं.

(क्रमशः)
अश्विनी ओगले

काय होणार होतं पुढे?
साधनाच्या डोक्यात प्रकाश पडेल? सासू सुनेच्या नात्यात अदृश्य गाठ पडली होती ती सुटेल?