Login

नात्यात गोडवा हवा भाग २

सासू सुनेच्या नात्यात ठिणगी पडली होती.
"आई, आज मला ऑफिसवरून यायला उशीर होईल. मी रात्रीचे जेवण देखील बनवलं आहे. तुम्ही आणि प्रतीक जेवून घ्या."
ऑफिसची बॅग खांद्यावर ठेवत ती म्हणाली.

"हो ठीक आहे."

संध्याकाळी नेहमीप्रमाणे सर्व बायका जमल्या.
गप्पा सुरु झाल्या.

शामल म्हणाली,
"काय गं साधना अजून तुझी सून आली नाही? सात वाजेपर्यंत येते. साडेसात वाजले अजून आली नाही."

"हो आज उशीर होणार आहे तिला." तोंड पाडतच ती म्हणाली.

"बघ मी तुला म्हणाले होते ह्या सुनांचं असंच असतं. कामाला लागल्या की, कधीही येतात. माझीही सून अशीच आहे. अशीच उशिरा येते. सर्वांचा स्वयंपाक मला करावा लागतो, मग किचन मला आवरावं लागतं."

"वैभवी, स्वयंपाक करून गेली आहे."

"अगं नवीन नवीन करणारच. नंतर बघ ती कामातून काढता पाय घेणार.  अनुभवाचे बोल आहेत साधना. मी म्हणते काय गरज आहे नोकरी करायची? तुझ्या मुलाला चांगली नोकरी आहे, पगार आहे. कशाला जीवाचे हाल करायचे? तुला सांगते घरातील कामं नको म्हणून हा सगळा खटाटोप असतो."

साधना फार लक्ष देऊन ऐकत होती.

तिच्या मनाला ते पटत नव्हतं; पण बुद्धी मात्र नको ते विचार करू लागली होती.

वैभवीला घरी यायला दहा वाजले होते.

थकून गेली होती.

प्रतीक रुममध्ये बसला होता.

"वैभवी? कधी आली?"

"आताच आले. सॉरी प्रतीक खूप उशीर झाला. आज काम खूप होतं.
वरून ट्रेन देखील लेट होती."

"ठीक आहे गं. सॉरी काय? बरं तू आधी सांग जेवलीस का?" तिचा हात हातात घेत म्हणाला.

"नाही, कामाच्या नादात जेवले नाही."

"बरं चल जेवून घे."

"प्रतीक, मला भूक नाही."

"वैभवी, असं चालणार नाही. दोन घास खाऊन घे."

"बरं, पाच मिनिटं आराम करते." बेडवर आडवी पडत ती म्हणाली.

वैभवीच्या डोळ्यावर इतकी झोप होती की ती न जेवताच झोपणार होती. प्रतिकने ते ओळखले.

तो किचनमध्ये गेला. वैभवीसाठी जेवणाचे ताट केले.

साधना बाहेरच टीव्ही बघत होती.

"प्रतीक, काय करतो आहेस?"  ती चष्मा नीट करत म्हणाली.

"आई, वैभवीसाठी जेवण घेतोय."

आधीच तिला राग आला होता. शामलने जे सांगितले होते ते अजूनही डोक्यात फिरत होतं.

ती काहीच बोलली नाही.

टीव्ही बंद केला आणि रुममध्ये झोपायला गेली.
रुममध्ये गेली तरी तिला झोप कसली येतेय.

'महाराणी, माझ्या मुलाला सांगतेय जेवण वाढायला. शामल बरोबर बोलतेय हळूहळू ही अशीच करणार. जॉबला लागली आहे तेव्हापासून जरा जास्तच होतंय. तिला मी काही बोलत नाही तर आता फायदा घ्यायला लागली आहे. स्वतःच्या हाताने ताट वाढून घ्यायला काय होतंय? प्रतीक देखील खुशाल ऐकतोय तिचं. त्यालाही नाही म्हणायला काय होतंय? आताच असं वागतेय नंतर कशी वागेल देव जाणे. कसं व्ह्यायचे माझ्या मुलाचे.'

तिला प्रतिकची काळजी वाटू लागली.

खरंतर फार साधी गोष्ट होती. इतक्या गोष्टीचा बाऊ करायची गरजच नव्हती; पण आता कानात विष गेलं की, माणूस भ्रमिष्ट होतो. तसंच झालं होतं तिचं.


वैभवीला डोळा लागला. झोपेच्या अधीन कधी झाली हे तिलाच कळलं नाही.

"वैभवी." प्रतिकने तिला हळूच आवाज दिला.

गाढ झोपेत होती.

त्याने हातातील ताट बाजूला ठेवलं. तिला झोपेतून जागं केलं.
ती डोळे चोळतच उठली.

"चल दोन घास खाऊन घे." असं म्हणत त्याने ताट तिच्या पुढ्यात ठेवलं.

"प्रतीक हे काय? तू कशाला आणलं? मी घेतलं असतं. उगाच तुला त्रास."

"मला कसला आलाय त्रास. रात्री उशिर होणार म्हणून सकाळी लवकर उठून स्वयंपाक केला आणि स्वतःच इतकी दमली आहेस की ,  न जेवता झोपते आहे. मला माहित होतं तू जेवणार नाही म्हणून मीच वाढून आणलं."


"थँक्स प्रतीक."

त्याने एक घास तिला भरवला.

तिच्या डोळ्यात  टचकन पाणी आलं.

"वैभवी, काय झालं इतकं हळवं व्हायला?"

"काही नाही, अचानक आईची आठवण आली. ती देखील अशीच मला जेवण भरवायची."

प्रतीक आणि वैभवीचं नातं अगदी दृष्ट लागण्यासारखे होते.
छत्तीसच्या छत्तीस गुण जणू जुळले होते. भांडण हा प्रकार नव्हताच.

काही दिवसासाठी साधनाची मोठी बहीण सुमेधा राहायला आली होती.
तिला वैभवीचा स्वभाव फार आवडला.

कामाला जात होती; पण घराकडेही आवर्जून लक्ष देत होती. सुमेधाचा पाहुणचार खूप छान केला. कामावरून आली तरी ती सुमेधा सोबत गप्पा मारायची. तिच्या आवडीचा स्वयंपाक करायची.
वैभवीने खरंतर सुमेधाचं मन जिंकलं होतं.

साधना वैभवीशी जास्त बोलत नव्हती. सुमेधाला जरा शंकाच आली.
वैभवीचं वागणं, बोलणं ती बारकाईने पहात होती. तिला नावं ठेवावी असं काहीच नव्हतं.

साधनाने शामलची ओळख करून दिली. तिने शामलला एका नजरेत ओळखलं. तिच्या गप्पांचा विषय केवळ सुना. सुना कश्या वाईट असतात हेच ती पटवून द्यायची.

सुमेधाला कळून चुकलं साधना वैभवीशी अंतर ठेवून का वागते?

काय करणार होती सुमेधा?

(क्रमशः)
अश्विनी ओगले.
हा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा.