Login

नात्यात गोडवा हवा भाग ३ अंतिम

मनातलं मळभ दूर झालं की आपल्या माणसांशी एकरूप होता येतं
प्रतीक आणि वैभवी दोघेही ऑफिसला गेले होते.
साधना आणि सुमेधा दोघी घरी होत्या.

"बरं झालं ताई तू आली. मला खूप छान वाटतंय." साधना

"हो गं मीच म्हणाले सुमितला मावशीकडे घेऊन चल. फोनवर तर रोज बोलतो; पण प्रत्यक्षात समोर बोलण्यात वेगळीच मजा आहे."

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.

साधनाने पुस्तक वाचायला घेतलं.

सुमेधा बेडरूममध्ये चालली होती.

साधनाचा चष्मा रुममध्ये होता.

"ताई,मला जरा चष्मा आणून देतेस का?"

"हो आणते."

ती बेडरूममध्ये गेली. चष्मा आणला आणि तिला दिला.

साधनाने चष्मा घातला. तिला अक्षर नीट दिसत नव्हते.
डोळ्यावरून चष्मा काढला.
बघते तर काय तो सुमेधाचा चष्मा होता.

"ताई, हा तुझा चष्मा आहे. मला काहीच दिसत नाहीये."

"अगं प्रयत्न कर. तुला अक्षर दिसेल."

"अगं ताई तुझा नंबर वेगळा आहे आणि माझा नंबर वेगळा. तुझ्या चष्म्याने मला कसं बरं नीट दिसेल?"

"मग तुझं आयुष्य वेगळं आहे आणि शामलचं आयुष्य वेगळं. तिच्या दृष्टिकोनातून वैभवीची पारख का करतेय?"

सुमेधा खूप मोठी गोष्ट बोलून गेली.

"ताई, नक्की तुला काय म्हणायचे आहे?"

"मला काय म्हणायचे आहे हे तुला चांगलं कळलं आहे; पण तरीही सांगते. शामलची सून असेल तिला त्रास देणारी. तिला येत असेल वाईट अनुभव, मग तिचं ऐकून तू देखील वैभवीला तसंच वागवणार आहेस का? आल्यापासून बघतेय वैभवीसोबत तू कशी तुटक वागतेय. कसल्याही गोष्टीची कमी करत नाही ती पोरगी. जीव तोडून प्रयत्न करते आहे माणसं जोडायचा. अमकीची सून अशी वागते, तर माझीही सून अशीच वागेल तसा विचार करून तिच्याशी अंतर ठेवून वागणं कितपत योग्य आहे? तुलाही असाच अनुभव येईल हीच भीती डोक्यात ठेवून आधीच नात्यात दुरावा निर्माण केला आहेस. काही महिन्यांपूर्वी तूच मला सांगत होती की, वैभवी तुला मॉलला पिक्चरला घेऊन जाते, गप्पा मारते. साधना, तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्तच पाहिले आहे म्हणून सांगतेय असं वागू नको. तुला माहितीये आपल्या बाजूला लक्ष्मी काकू होत्या? आज वर्ष झालं एकट्याच गावी राहतात. नवरा देवाघरी गेल्यावर त्यांना आशा होती की, मुलगा त्यांना घेऊन जाईल पण तसं झालं नाही. वयोमानानुसार काहीच जमत नाही. आजारी पडल्या तर बाजूची माणसं दवाखाण्यात घेऊन जातात. मुलगा पैसे पाठवतो. त्यांना अजूनही आशा आहे मुलगा घेऊन जाईल. आजूबाजूला बरंच काही घडत असतं साधना. चांगल्या,वाईट अनेक घटना घडतात, त्यातून आपण काय घ्यायचं ते आपण ठरवायचे.

प्रतीकने मला सांगितले होते. तुझे मिस्टर देवाघरी गेले तेव्हा वैभवी स्वतःच म्हणाली होती की, तुला मुंबईला घेऊन जायचे. तुझं मन रमेल. प्रतीक नेहमी तिचे कौतुक करतो, ती आहेच अशी कौतुक करण्यासारखी, पण जर तू अशीच वागत राहिली तर तिचंही मन बदलायला वेळ लागणार नाही. माणूस कितीही चांगला असला; पण त्याला प्रत्येकवेळी गृहीत धरत राहिलं, तर तो माणूस बदलतो. एखाद्याच्या चांगल्या वागण्याचा कितपत वापर करावा हे समजलं पाहिजे.

त्या शामलचं ऐकून तू तुझ्या आयुष्यात कसं वागायचे हे ठरवू नको. दुसऱ्याच्या चष्म्यातून पाहिले, तर तुला सगळं अस्पष्टच दिसणार. आता तू तेच करतेय. शामलच्या नजरेतून तुला वैभवीचे फक्त अवगुण दिसत आहे. तू तुझ्या नजरेतून तिला बघ. तिने तुझ्यासाठी काय केलं आहे आणि करते आहे हे बघ म्हणजे सगळं स्वच्छ दिसेल."

तिने साधनाचा चष्मा दिला.

साधनाने सुमेधाच्या बोलण्याचा विचार केला.

इतके दिवस वैभवीला तिने उगाच डोळ्यावर धरले होते.
विनाकारण तिच्यावर चिडचिड देखील करत होती. मनातल्या मनात धुसफूस करत होती.

आज मात्र सुमेधाने तिचे डोळे उघडले.

"ताई, खरंच गं मी तिच्याविषयी नको ते विचार करत होते. माझंच वागणं बदललं. शामलच्या बोलण्याला मी भुलले. मला माहित नाही काय झालं. तिच्याशी बोलणं कमी केलं. सतत आई आई करत राहते आणि मी मात्र तिला दूर ठेवते. आता असं नाही वागणार. मी माझ्या चष्म्याने तिला बघणार."

सुमेधाने खऱ्या अर्थाने डोळे उघडले होते.

रात्र झाली. सगळे झोपले होते.
वैभवी हळूच उठली. किचनमध्ये गेली. तिने फ्रिजमधून केक काढला. साधनाचा वाढदिवस होता. प्रतिकला देखील उठवलं.
वैभवीने दार ठोठावलं.

साधनाने दार उघडलं पाहते तर काय वैभवी आणि प्रतीक केक घेऊन उभे होते.

"हॅप्पी बर्थडे आई."
वैभवी आणि प्रतीक एका सुरात मोठयाने बोलले.


"आई, बघ विसरलो; पण वैभवी तुझा वाढदिवस विसरली नाही. वैभवीनेच केक आणला."

साधनाचे डोळे काठोकाठ भरले.

सुमेधा तिच्या कानात हळूच म्हणाली,
"आता चष्म्याची गरज नाही ना?"

"ताई, आता सगळं स्वच्छ दिसतंय. आता कसलाच चष्मा नको."

केक कट केला. वैभवीने साधनाला केक भरवला.

"प्रतीक, माझ्या सुनेने बरोबर माझा वाढदिवस लक्षात ठेवला बघ."

"आई, तुझी सून?" तो हसत म्हणाला.

"हो माझी सून." असं म्हणत तिने वैभवीला केक भरवला.
नात्यांचा गोडवा आज कैकपटीने वाढला होता.
वैभवीबद्दल जे ही मत तिने बनवलं होतं ते दोघींमध्ये अंतर निर्माण करत होतं. साधनाच्या मनात कटुता आली होती; पण सुमेधाने योग्य पद्धतीने तिचे डोळे उघडले, म्हणुनच सासू सुनांच्या नात्यात पुन्हा गोडवा आला होता.
समाप्त.
कथा लेखन - अश्विनी ओगले.
कथा आवडली असेल तर एक लाईक जरूर द्या आणि कंमेंटमध्ये कथा कशी वाटली ते देखील सांगा.
कथेचा वापर youtube किंवा कुठेही आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.