Login

नात्यातील अंतर भाग 2

समोरच्या व्यक्तीबद्दल कधी कधी मनात एक ग्रह आपण निर्माण करून ठेवतो पण कधी कधी कोण आपलं आणि कोण परकं हे परिस्थिती अचूक दाखवून देते. कौटुंबिक विषयाभोवती फिरणारी एक अनोखी कथा.
आसावरीची ती संपूर्ण रात्र तळमळीतचं गेली. मिनिटभरसुद्धा डोळ्याला डोळा लागला नाही. मधुराचा निकाल मनाविरुद्ध लागला होता. मधुरानं डॉक्टर होण्याचं लहानपणी पासून पाहिलेलं स्वप्न तिची आई म्हणून आसावरीसुद्धा कित्येक वर्ष स्वतः सुद्धा रंगवत आली होती. मधुरासोबत तिच्या स्वप्नात रंग भरताना कधी ते स्वप्न तिचं सुद्धा झालं ते तिला स्वतःलाही कळलं नव्हतं. जणू काही आपल्यालाचं डॉक्टर व्हायचं आहे इतकं आसावरी मधुराच्या स्वप्नात रमली होती.

पण मधुराच्या निकालाने सगळ्यांची अपेक्षा धुळीस मिळाली. तिला एनट्रन्स परीक्षा क्रॅक करता आली नाही. बारावीत नव्वद टक्के असूनही आता मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळणं मुश्किल झालं होतं. ऍडमिशन मिळाली असती तरी लाखो रुपयांचा खेळ होता. लेकीचं स्वप्न आपण पूर्ण करू शकणार नाही ह्याचं गिल्ट आसावरी आणि प्रशांतच्या मनात होतं. आपल्याकडे आशेनं डोळे लावून बसलेल्या आपल्या लाडक्या लेकीला हे सत्य कसं सांगावं हेचं त्या दोघांना समजत नव्हतं.

आसावरीच्या डोक्यात विचारांची गर्दी जमली होती. ह्यातून काही मार्ग निघतोय का ह्याचा विचार करावा की आता सासू सासरे येणार त्यांच्या सेवेला उभं राहावं ह्या संभ्रमात ती सापडली होती. आसावरीच्या मनात त्या दोघांबद्दल पूर्वीपासूनच अढी होती. त्याचं नवीन नवीन लग्न झालं होतं त्यानंतर काही दिवसांनी लगेच आसावरी आणि प्रशांत त्याच्या ऑफिसच्या शहरात शिफ्ट झाले होते.

त्यांचा नव्या नवलाईचा संसार खुलत फुलत होता. आसावरी प्रशांत सोबत त्याच्या नोकरीच्या शहरात आली. नवं शहर नवा संसार. अगदी हरखून गेली. आता घरात आपण दोघेच असणार याचं तिला फार अप्रुप वाटलं होतं. त्यात त्याला त्यावेळी तब्बल पन्नास हजार पगार होता. म्हणजे आता आपल्याला हवं तसं जगता येईल, काटकसर करावी लागणार नाही, हवी ती मजा करता येईल, आपला संसार आपल्याला हवा तसा सजवता येईल अशी स्वप्न आसावरीच्या डोळ्यात होती. पण त्या स्वप्नांना दुसऱ्याचं महिन्यात दृष्ट लागली होती जणू.

एक दिवस पगार झाल्यावर प्रशांतने तिच्या हातात एक कागद दिला होता त्याने तो उत्सुकतेपोटी उघडूनही पाहिला. त्यामध्ये तिच्या सासर्‍यांना वीस हजार रुपये डिपॉझिट केलेले तिला दिसले.

"अहो प्रशांत गावाकडे सगळे ठीक आहे ना म्हणजे आई बाबांची तब्येत ठीक आहे ना?" आसावरीने प्रशांतला काळजीने विचारले होते.

"हो हो अगदी मजेत आहे दोघे का ग काय झालं? असं अचानक का विचारलंस?" प्रशांतने तिला विचारले.

"काही नाही ओ. आत्ता तुम्ही मला हे पाकीट ठेवायला दिले ना, ते मी उघडून पाहिले तर त्यात मला वीस हजार रुपये डिपॉझिट केलेला कागद दिसला. मला कळेना की तुम्ही एकदम एवढे पैसे गावाकडे का बरं पाठवले? म्हणून मी विचारलं." आसावरीच्या मनात शंका निर्माण झाली होती.

"अगं ते होय? जसा मी नोकरीला लागलो तसा पागरतले काही पैसे मी दर महिन्याला गावाला पाठवतो." प्रशांत सहज बोलून गेला.

"एवढे पैसे दर महिन्याला का बरं पाठवता तुम्ही गावाला?" आसावरी च्या स्वरामध्ये आश्चर्य होतं.

"अगं का म्हणजे काय? मी दर महिन्याला पाठवतो पैसे. माझी नोकरी लागल्याच्या पहिल्या महिन्यापासून मी पैसे पाठवतो. अगदी पाच हजारांपासून सुरुवात केली होती. हळूहळू पगार वाढत गेला. आता वीस हजार पाठवतो. बाबा म्हणाले, पगार वाढला की जास्त पाठवत जा. खरं सांगू का, त्यांनी माझ्या शिक्षणावर बराच पैसा खर्च केला होता. आता त्यांनाही आनंदात राहायचं असेल, म्हणून ते काही पैसे माझ्याकडून घेत असतील. शेवटी ते सुखात राहणे ही देखील माझी जबाबदारी आहे ना."प्रशांत म्हणाला.

त्याच्या बोलण्याच्या टोनवरून त्याला स्वतःलाही हे आवडत नाही हे आसावरीला जाणवलं, पण तरीही प्रशांत त्यांना विरोध का बर करत नाही ह्याच तिला आश्चर्य वाटलं होतं.

"आसावरी आज विषय निघालाच आहे म्हणून तुला सांगतो, मलाही कित्येक खर्च आहेत. आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण कराव्या वाटतात, पण आमच्या घरी पहिल्यापासून आमचे बाबा म्हणतील ते शेवटचं असतं. त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याची माझ्यातरी हिंमत नाही. आणि मी जोपर्यंत पैसे पाठवणार नाही तोपर्यंत ते रोज फोन करत राहतात थोडक्यात काय तर यातून माझी सुटका नाही हे खरं." प्रशांतला ही त्यावेळी एवढी मोठी रक्कम गावाकडे पाठवायला जीवावर यायचं पण त्याकडे इलाज नव्हता.

हे सगळं कळलेल्या दिवसापासून मात्र आसावरी तिच्या सासू-सासर्‍यांवर कायमची नाराज झाली. सणावाराला कधी सासरी गेली आणि सासूबाईंनी त्या दोघांचे खाण्यापिण्याचे लाड जरी पुरवले तरी तिला वाटायचं हे आपल्याच पैशांनी तर करत आहेत. त्यांनी हे करायलाच हवं. तिच्या मनात त्यांच्याविषयी आढी राहिली ती कायमचीच! ती कधीच सासरी सहजपणे वावरू शकली नव्हती. आपल्या नवऱ्याचा कष्टाचा पैसा हे दोघे काढून घेतात. असेच तिला आजतागायात वाटत होतं. हळूहळू वर्ष सरली पण पाठवण्यात येणाऱ्या पैशात वाढत होत गेली.

आपल्या सासऱ्यांनी एवढे वर्ष जर आपल्याकडून पैसे मागितले नसते तर आज आपल्या मुलीच्या ऍडमिशन साठी आपल्याकडे भरपूर पैसे जमले असते आपल्या मधुरावर ही वेळ आली नसती. आत्तासुद्धा आसावरीच्या मनात मुलीच्या भविष्याचेचं विचार घोंगावत होते.


.....क्रमशः
वरील कथा काल्पनिक आहे. वास्तवाशी काही संबंध नाही.
भाग : दुसरा
लेखिका : सायली पराड कुलकर्णी.
Disclaimer : कथा आवडल्यास शेअर जरूर करावी पण लेखिकेच्या नावासहित शेअर करायला परवानगी आहे. ह्या कथेचे सगळे हक्क राखीव.

0

🎭 Series Post

View all