Login

नात्यातील अंतर भाग 1

समोरच्या व्यक्तीबद्दल कधी कधी मनात एक ग्रह आपण निर्माण करून ठेवतो पण कधी कधी कोण आपलं आणि कोण परकं हे परिस्थिती अचूक दाखवून देते. कौटुंबिक विषयाभोवती फिरणारी एक अनोखी कथा.

मधुराच्या "नीटच्या" परीक्षेचा निकाल मनासारखा लागला नसल्यामुळे आसावरी घरात अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती. आपल्या पोरीच्या भविष्याची चिंता तिला लागून राहिली होती. संध्याकाळी लवकर स्वयंपाक करून आसवरी नवऱ्याची वाट पाहत बसली होती. मधुराच्या ऍडमिशनचं आता काय करावं याची चर्चा तिला प्रशांतसोबत करायची होती.

काल संध्याकाळी निकाल लागल्यानंतर उदासीनतेची एक काळी छाया त्या परिवारावरती गडद झाली होती. रात्री सासर्‍यांचा फोन आला तेव्हा त्यांना नातीचा निकाल सांगताना तिला कसंनुस झालं होतं, रडायला यायला लागलं होतं. सासर्‍यांनी मग समजून घेऊन फोन ठेवून दिला होता. त्यानंतर मात्र त्यांचं एकमेकांशी काहीच बोलणं झालं नव्हतं.

सकाळी प्रशांत घाईनचं ऑफिसला गेला होता आणि तसंही सकाळी एकमेकांशी ह्या विषयावर बोलायला वेळ तरी कुठे मिळाला होता? खरंतर सकाळच्या घाई गडबडीत मुद्दामूनच आसावरीने या विषयावर प्रशांतशी बोलायचं टाळलं होतं. पण न बोलून प्रश्न निकालात निघणार नव्हता म्हणूनच ती संध्याकाळपासून प्रशांत ची वाट पाहत होती.

संध्याकाळ रात्री कडे कलली. एव्हाना प्रशांत घरी यायला हवा होता. त्याची घराकडे परतण्याची रोजची वेळ उलटून गेली होती. आसावरी त्याला फोन करणार एवढ्यात दारावरची बेल वाजली. प्रशांत घरी आला होता. आसावरीने त्याला पाण्याचा ग्लास दिला. घटघट पाणी पिऊन तो लागलीचं उठून खोलीत आवरायला निघून गेला. दोघांमध्येही एका शब्दाचाही संवाद झाला नव्हता. एक विचित्र शांतता घरात पसरली होती.

प्रशांत फ्रेश होऊन परत आला तेव्हा डायनिंग टेबलवर गरमागरम चहाचा कप तयार होता. प्रशांत मोबाईलवर रिल्स बघत शांतपणे चहा घेऊ लागला. त्याचं ते अलिप्त वागणं बघून आसावरीला प्रचंड राग येत होता. आता काय होईल ते होईल पण त्याच्याशी बोलायचंच असं मनाशी ठरवून आसावरीने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. शक्य तितक्या नॉर्मल आवाजात ती बोलायला लागली.

"प्रशांत अहो मधुराच्या शिक्षणाचं आता पुढे काय करायचं तुम्ही ठरवलं आहे? तिच्या ऍडमिशनचं आता काय?"

हातातला अर्धा झालेला चहाचा कप तसाचं टेबलवर ठेवत प्रशांत शांतपणे म्हणाला,
"नको काळजी करूस, बघूया, ठरवू नंतर काय करायचं ते मी सुद्धा त्याच विचारात आहे."त्याचं मोघम बोलणं ऐकून आसावरीनेही संभाषण आवरतं घेतलं.

प्रशांत असं मोघम बोलून उठून गेला. हॉलमध्ये बसून त्याने टीव्ही लावला आणि त्यांचं संभाषण आपोआपच थांबून गेलं. आसावरी नाराज होऊन परत स्वयंपाक घरात आली. मनाशी पुटपुटू लागली.
"इथे माझा जीव टांगणीला लागलाय आणि यांना तर टीव्ही बघायचा सुचतोय!"
असं मनाशी बोलत तिने भाजीसाठी कांदा चिरायला घेतला. कांदा चिरता चिरता तिचे डोळे पाझरू लागले. त्यात दुःखाश्रू कधी मिसळले तिचा तिलाच कळलं नाही. मधुराचं चांगलं व्हावं एवढंच तिला वाटत होतं. आई म्हणून तिची फार चिडचिड होत होती.

स्वयंपाक झाला. तिघे जेवायला डायनिंग टेबलवर बसले. आसावरीने निमूटपणे जेवायला वाढलं. मधुरा मुकाटपणे जेवत होती. जेवत कसली भाताची शितं चिवडत होती. जेवणं शांततेतचं पार पडली. कोणी कोणाशी जास्त बोललं नाही. जेवण झाल्यावर प्रशांत उठून गेला. ऑफिसमधून आल्यापासून तो गप्प गप्पच होता. डायनिंग टेबलवरचं मागचं सगळं आवरून आसावरी आता हॉलमध्ये निवांत येऊन बसली. तिची रोजची सिरीयल टीव्ही वरती लागली होती पण आज त्याच्याकडेसुद्धा तिचं लक्ष नव्हतं. उगीच चाळा म्हणून ती चॅनेल बदलत राहिली. आपल्याच विचारात गढल्यामुळे सगळेजण आपापल्या खोलीत निघून गेल्याचे सुद्धा तिच्या लक्षात आलं नाही. लक्षात आल्यावर टीव्ही बंद करून आसावरी सुद्धा बेडरूम मध्ये झोपायला निघून गेली.

"उद्या आई-बाबा येणार आहेत." संध्याकाळ पासून शांत असणाऱ्या प्रशांतने आसावरी बेडरूम मध्ये झोपायला येताचं सांगितले. तशी असावरी संतापली.

"अच्छा! म्हणजे आई बाबा येता आहेत तर मी काय म्हणेन ह्याची तुम्हाला भीती वाटत होती तर! म्हणून तुम्ही संध्याकाळपासून गप्प बसला होतात! मला तर वाटलं की तुम्हाला मुलीच्या ऍडमिशनची काळजी आहे, टेन्शन आहे म्हणून गप्प बसलात." आसावरीच्या बोलण्यात नाराजी स्पष्ट दिसत होती.

"आणि काय हो? हे दोघे आता कशाला येत आहेत? घरात आधीच काय परिस्थिती आहे तुम्हाला ठाऊक आहे ना? अशा वेळेस मी त्या दोघांकडे लक्ष देऊ शकणार आहे का? आणि तुम्हाला माहिती आहे मी सध्या या मूडमध्ये पण नाही. तुम्ही त्या दोघांना थोड्या दिवसानंतर यायला सांगितलं तर फार बरं होईल." जितक्या शांतपणे बोलता येईल तितक्या शांतपणे बोलण्याचा प्रयत्न आसावरी करत होती. तिच्या मनात रागाचा आगडोंब उसळला होता.

"एक मिनिट आसावरी तू काय बोलतेस तुला तरी कळतंय का? अगं ते माझे आई-वडील आहेत. हे घर त्याचंही आहे. त्यांना हवं तेव्हा ते येणार की गं इथे. त्यांना आहे का कोणी आपल्याशिवाय? असं परक्यासारखं काय बोलतेस आणि तुला त्यांची काहीही काळजी करण्याची गरज नाही. माझी आई अजूनही स्वतःची कामं स्वतः करते आहे. तुला त्यांच्यासाठी काही वेगळे करण्याची गरज सुद्धा लागणार नाही." प्रशांतच्या आवाजातही आता राग होता. त्याला आसावरीचं बोलणं अजिबात पटलं नाही. त्यानी लागलीचं कुस बदलली आणि आसावरीकडे पाठ करून डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागला.

डोक्यात सतराशे साठ विचार असल्यामुळे दोघांनाही झोप लागत नव्हती. रात्रीच्या अंधारात विचारांची ज्योत अधिकच तेजळली होती.

..... क्रमशः


वरील कथा काल्पनिक आहे. वास्तवाशी काही संबंध नाही.
भाग : पहिला
लेखिका : सायली पराड कुलकर्णी.
Disclaimer : कथा आवडल्यास शेअर जरूर करावी पण लेखिकेच्या नावासहित शेअर करायला परवानगी आहे. ह्या कथेचे सगळे हक्क राखीव.
0

🎭 Series Post

View all