Login

नात्यातील गोडवा भाग १

शेवटी भावना महत्वाची
कथेचे शीर्षक - नात्यातील गोडवा

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

"प्रिया, ताईचा फोन आला होता.  उद्या ताई आपल्याकडे येणार आहे."
महेशने फोनवर त्याची मोठी बहीण तिच्या नवऱ्यासोबत आणि मुलीसोबत येणार असल्याचे सांगितले.

"ह...ठीक आहे. बरं, जेवण काय बनवू?" प्रियाने विचारले.

"तुला जे आवडेल ते बनव."

"असं काय करता हो. माधवी ताईंची आवड तुम्हाला माहीत असेलच. प्लीज सांगा ना."


"ताईला गोड खायला खूप आवडतं."

"बरं, मग मी पुरणपोळी करते. चालेल?"

"चालेल काय  म्हणतेस ? अगं धावेल.  बरं, चल मी फोन ठेवतो जरा, काम आहे." त्याने फोन ठेवला.

प्रिया आणि महेश दोघांचं लग्न होऊन दोन महिनेच झाले होते.  महेशची बदली झाली.  तो आणि प्रिया  पुण्याला शिफ्ट झाले.  प्रियाने देखील पुण्यातच नोकरी शोधली.  सासू-सासरे आणि बाकीचे नातेवाईक देखील मुंबईतच होते. प्रियाला इथे आल्यापासून फारच एकटेपणा वाटत होता. तसा तिचा स्वभाव हा बोलका होता.  एकत्र कुटुंबात  वाढलेली प्रिया चार माणसांमध्ये सहजच रमून जात.  चार चौघांना आपलंस कसं करायचं हे तिला सहज जमायचं.  त्यात तिला स्वयंपाकाची भारी हौस  होती.  तिच्या हाताला वेगळीच चव होती.  आवर्जून स्वयंपाक करणे आणि घरच्यांना खाऊ घालणं हा तिचा छंद होता. ती तिच्या आईकडून शिकली होती; कारण आई देखील अशीच होती.  तिच्या माहेरी देखील सतत पाहुणे  असायचे. कोणी घरी आलं की, आई लगेच पदर खोचून कामाला लागायची.  आग्रहाने जेवू घालणं, आलेल्या व्यक्तींना मानपान देणं हे सगळं तिने जवळून पाहिले होते. अगदी शेजाऱ्यांशी देखील आईचे खूप छान संबंध होते.  कोणालाही मदत लागली तर स्वतःहून आई पुढे जायची.  प्रियाची काकी देखील तशीच होती.  प्रियाची काकी आणि तिची आई दोघींचे इतके  छान संबंध होते की,  त्या जावा नसून जणू काही बहिणीच आहे असं लोकांना वाटत असे. आताच्या जमान्यामध्ये एकत्र कुटुंबपद्धत टिकवून ठेवणे  हे मुश्किल झालं आहे;  पण प्रियाच्या माहेरी तशी परिस्थिती नव्हती. एकत्र कुटुंब म्हणजेच खरं सुख.  आपल्या माणसांसोबत मिळून मिसळून राहणं हा एक आधार असतो, ताकद असते हे तिला चांगल्याप्रकारे माहीत होतं. प्रियाची आत्या, तिची आजी गेल्यावरही माहेरपणाला येत असे. तो जिव्हाळा अजूनही टिकून होता, तो तिच्या आईमुळे आणि काकीमुळे. दोघींनी अशा प्रकारे घर, घरातील माणसं जोडून  ठेवली होती की,  त्या घरात आलेली व्यक्ती समाधानी होत असे.

प्रियाने हे सर्व जवळून बघितलं होतं. त्या सर्व गोष्टींचा तिच्यावर प्रभाव होता.

प्रियाची नणंद येणार आहे,  तर बघूया ती कसा पाहुणचार करते.
पुढचा भाग जरूर वाचा.

क्रमशः
अश्विनी ओगले.