कथेचा पूर्वार्ध
गेल्या भागात आपण पाहिले की प्रियाने खूप छान पद्धतीने नणंदबाईंचा पाहुणचार केला. महेश ऑफिसवरून आला, तर त्याला ती उदास दिसली. आता पाहू पुढे.
गेल्या भागात आपण पाहिले की प्रियाने खूप छान पद्धतीने नणंदबाईंचा पाहुणचार केला. महेश ऑफिसवरून आला, तर त्याला ती उदास दिसली. आता पाहू पुढे.
"काही नाही." प्रिया डोळे पुसतच म्हणाली.
"काही नाही? आणि मग इतकं उगाच रडतेस का?" महेश तिच्या पाठीवर अलगद हात फिरवत म्हणाला.
ती काहीच बोलेना.
महेशला समजलं होतं की, ती असं सहजा सहजी सांगणार नाही.
"प्रिया, तुला माझी शपथ आहे. सांग मला का रडतेस?"
"कशाला शपथ घातली?" प्रिया म्हणाली.
"त्याशिवाय तू ऐकणार नाही. आता सांगणार आहेस का?"
"मला सासूबाईंचा फोन आला होता. त्या म्हणत होत्या की माधवी ताईंना कसली साडी नेसवली आहे. अशी साडी देण्यापेक्षा नसती दिली तरी बरं झालं असतं." असं बोलून ती शांत बसली.
"आई असं म्हणाली?"
"हो. अहो ती साडी ट्रेंडमध्ये आहे म्हणून घेतली आणि दोन हजाराची आहे. मलाही ती साडी खूप आवडली म्हणून मी देखील तशीच सेम साडी माझ्यासाठी घेतली. माझ्या मनात तसं काहीच नव्हतं. मला कल्पना नव्हती की त्यांना आवडणार नाही."
"प्रिया, स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तू सगळं चांगल्या मनाने केलं आहेस. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. थांब मी आईशी बोलतो."
"नका बोलू उगाच अजून त्या रागावतील."
"बरं ठीक आहे, नाही बोलत."
तो तिला म्हणाला तर खरं; पण प्रियाला असं बोललेलं त्याला आवडलं नाही. त्याने पाहिलं होतं की माधवीसाठी प्रियाने काय काय केलं होतं.
महेशने तिला समजून घेतलं हे तिच्यासाठी पुष्कळ होतं.
"प्रिया, दोन दिवस सुट्टी आहे, आपण घरी जाऊया." त्याने प्रियाला सांगितले.
"ठीक आहे." प्रिया म्हणाली.
प्रियाने जाताना सर्वांसाठी काही ना काही वस्तू घेतल्या होत्या.
खूप दिवसाने ते दोघेही मुंबईला चालले होते.
सासू, सासरे आणि लहान दिर यांच्यासाठी खायला अनेक वस्तू घेतल्या होत्या.
गेल्यावर तिने सासूबाईंना दिलं.
"हे काय आणलं आहेस गं ?" सासुबाई म्हणाल्या.
"तुमच्या सर्वांसाठी आणले आहे."
"कशाला आणलं? इथे काय मिळत नाही का?" सासुबाई जरा तुटकच बोलल्या.
तिला वाटलं होतं की त्यांना आवडेल; पण झालं भलतंच.
तिचा चेहरा पूर्णपणे उतरला.
आता महेशला रहावलं नाही.
तो बोलू लागला.
"आई, इथेही ह्या सर्व गोष्टी मिळतातच; पण ज्या भावनेने तिने आणलं आहे ना ती भावना खूप महत्त्वाची आहे. कितीही पैसे दिले तरी भावना विकत घेता येत नाहीत.
माझ्या काहीच लक्षात नव्हतं; पण तिने आठवणीने सर्व काही आणलं. प्रेमाने आणलेल्या वस्तूचा आदराने स्वीकार करायचा असतो. ती वस्तू कशी आहे? किती किमतीची आहे? त्या वस्तूची गुणवत्ता हे सगळं बघत बसायचं नाही."
असं बोलून तो निघून गेला.
माझ्या काहीच लक्षात नव्हतं; पण तिने आठवणीने सर्व काही आणलं. प्रेमाने आणलेल्या वस्तूचा आदराने स्वीकार करायचा असतो. ती वस्तू कशी आहे? किती किमतीची आहे? त्या वस्तूची गुणवत्ता हे सगळं बघत बसायचं नाही."
असं बोलून तो निघून गेला.
"महेशची आई, तो बरोबर बोलला. सूनबाईने जे आणलं आहे त्यामागे भावना बघा." सासरेबुवा म्हणाले.
आता एक वेगळीच शांतता पसरली.
त्या देखील रूममध्ये निघून गेल्या.
महेशच्या बोलण्याचा काय परिणाम होणार ? हे पाहू पुढच्या भागात
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.