Login

नात्यातील गोडवा भाग ४ अंतिम

शेवटी भावना महत्वाची
नात्यातील गोडवा भाग ४ अंतिम.

कथेचा पूर्वार्ध
गेल्या भागात आपण पाहिले की महेशची आई प्रियाला सुनावते की माधवीला नीट साडी दिली नाही. महेश प्रियाची बाजू घेतो. आता पाहू पुढे.

"सासूबाईंना माझा राग आला असणार. तुम्ही असं का बोललात?"

"प्रिया, कधी कधी बोलावं लागतं.  आईचं चुकलं म्हणून मला बोलावं लागलं. मला माहितीये आईला राग आला असणार; पण यापुढे बोलताना आई थोडा तरी विचार करेन. तुला माहीत आहे का, आईनेच मला लहानपणी शिकवलं होतं की, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो.  चुकीच्या गोष्टी मला सहन होत नाही. ठीक आहे, तू आता जास्त विचार करू नकोस. मस्त असा चहा कर. आईला कसं मनवायचे हे मला चांगलं माहीत आहे. "

तो आईकडे गेला.

"आई, माझ्या बोलण्याचा तुला राग आला असेल, वाईट वाटलं असेल तर खरंच मला माफ कर; तुला दुखवण्याचा उद्देश नव्हताच पण प्रियाशी असं तुटकपणे नको वागू. प्रिया माझी  खूप काळजी घेते.
आई, जशी तू माझी काळजी घेते अगदी तशीच. माझ्या आवडी निवडी जपते.  त्यादिवशी ताईला जी साडी दिली ती दोन हजाराची होती. खरंतर माझ्या डोक्यात ताईला साडी घेण्याचा विचार नव्हताच, ते प्रिया बोलली म्हणून मी साडी घ्यायला लावली. तुला साडी आवडली नसेल; पण जो पाहुणचार प्रियाने केला तो अगदी मनापासून केला. ताईला एकाही कामाला हात लावू दिला नाही. तिने जे देखील केलं ते अगदी मनापासून केलं.  हे सगळं मी जवळून पाहिले. ती कुठेच चुकत नाही, फक्त एकच विनंती तिचं कौतुक करता आले नाही तर करू नको; पण तिच्या मनाला लागेल असं बोलू नको.  त्यादिवशी तू फोनवर जे बोलली त्यामुळे तिला फार वाईट वाटलं. प्रिया चुकीचं वागत असती, तर मी तिला नक्कीच बोललो असतो; पण ती तर सारं काही मनापासून करते आहे. "

तिने महेशच्या बोलण्याचा विचार केला.


"खरंच महेश,  कधी कधी मोठी माणसंही चुकतात. माझं चुकलं,  मी असं बोलायला नव्हतं पाहिजे. प्रियाबद्दल मीच  गैरसमज निर्माण केले.  तू माणसं ओळखण्यात पारंगत आहेस हे देखील मला माहित आहे. पुन्हा असं नाही होणार. "

"बरं चल, तुझी सून सर्वांसाठी चहा बनवते आहे." .


प्रिया किचनमध्ये गेली.

सर्वांसाठी चहा बनवला.

बाहेर येऊन बघते तर काय प्रियाने जे खायला आणलं होतं ते सासूबाईंनी प्लेटमध्ये ठेवलं होतं.

"प्रिया, सगळेच  पदार्थ  खूप छान आहेत." सासुबाई म्हणाल्या.

"हो वहिनी, सगळं टेस्टी आहे." दिर देखील म्हणाला.

तिने महेशकडे पाहिले. त्याने  डोळे मिचकावले.

महेशच्या स्पष्ट बोलण्यामुळे थोड्यावेळापूर्वी घरात जे गंभीर वातावरण होतं, ते हलकं  झालं होतं.

घराचे ऐक्य तेव्हाच टिकून राहते जेव्हा घरातील माणसं एकमेकांच्या मताला महत्व देतात आणि एकमेकांचा आदर करतात.

समाप्त.
अश्विनी ओगले.
कथा आवडली असेल तर एक लाईक जरूर द्या आणि कंमेंट करायला विसरू नका.
साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे
0

🎭 Series Post

View all