नात्यातला गुंता भाग 1

नात्यातला गुंता वाढू देवू नका. तो वेळेत सोडवा
नात्यातला गुंता भाग 1

©️®️शिल्पा सुतार

"शुभदा अग कोणती साडी आवडली पसंत कर पटकन." लताताई घाई करत होत्या. त्या, शुभदा, आणि मावशी तिघी शॉपिंग साठी आल्या होत्या. अगदी दोन दिवस हातात होते. शुभदाला बघायला पाहुणे येणार होते.

"आई नवीन साडी कशाला हवी. मी तुझी साडी नेसते ना." शुभदा सहज म्हणाली.

"नको बाई नवरा मुलगा बघायला येतो म्हणतो तू ह्या साडीत छान दिसतेस. तुझ्या सोबत ही साडी घे. आपली पहिली आठवण आहे." मावशी म्हणाली. लताताई, मावशी हसत होत्या. शुभदा लाजली होती.

मावशीच्या नात्यातल स्थळ होते. मुलगा चांगल्या पोस्टवर होता. शिकलेले लोक होते. लग्न जवळ जवळ ठरल्या सारखं होत.

शुभदाने मुलाचा बायोडेटा बघितला होता. अनिकेत नाव होत. ते मला अस म्हणतील का की ही साडी सोबत घे? त्यांना मी एका बघण्यात इतकी आवडेल? आई मावशीचा अनुभव पाठीशी आहे. अस होत असेल. तिच्या चेहर्‍यावर हसू होतं.

तिने गडद निळी साडी पसंत केली. तो रंग तिच्यावर खूप खुलून दिसत होता. अनिकेतच्या विचाराने तीच रूप खुललं होत. खूप शॉपिंग झाली. आई बाबा कशाची कमी करत नव्हते. अतिशय लाडात वाढलेली शुभदा खुश होती.

दोन दिवस धावपळीत गेले. आज पाहुणे येणार होते. सकाळ पासुन धावपळ सुरू होती. लता ताई घर आवरत होत्या. मावशी पोहे करत होत्या. बाकीचे पदार्थ बाहेरून आले होते.

"शुभदा तयारी झाली का?" बाजूच्या काकू आत डोकवत होत्या.

"सुरू आहे काकू. या ना."

"काही मदत करू का?" त्यांनी विचारल.

"ताई बघा सगळं नीट आहे का?" लताताई म्हणाल्या.

"तुमच करणं चांगल आहे. हे लग्न जमेल बघा."

लताताई खुश होत्या. बाजूच्या काकू जरा वेळ बसुन गेल्या.

शुभदा अतिशय सुंदर दिसत होती. चापून चोपून नेसलेली साडी. थोडासा मेकअप. डोळ्यात काजळ. कपाळावर छोटी टिकली. एक वेणी. त्यावर गजरे. जो येत होत तो शुभदा कडे बघून खुश होत होतं. ही खूपच सुंदर आहे.

बाहेर कार थांबली. घरात एकच धावपळ उडाली. शुभदा खिडकीतून बघत होती. एक एक लोक उतरून आत येत होते. अनिकेत स्वतः कार चालवत होता. त्याने कार पार्क केली. तो शुभदाच्या भावाशी बोलत होता.

व्हाइट शर्ट ,ब्लॅक पँट. वेगळाच कॉन्फिडन्स त्याच्या चेहर्‍यावर होता. त्याच्याकडे बघतांना शुभदा लाजली होती. त्याने ही खिडकीकडे बघितलं. ती एकदम मागे झाली. तिला खूप धडधड झाली. तिच्या मावस बहिणीने मागून धक्का दिला.

"कसे वाटतात जिजाजी, खूप भारी ना."

ती काही म्हणाली नाही. बाहेर सगळे बोलत होते. ती आतून ऐकत होती. बोलावल्यावर बाहेर गेली.

सासुबाई, सासरे, नणंद मनीषा, तिच्या घरचे, मोठे, दीर, जावू बाई दीप्ती सगळे आले होते.

तिची ओळख करून दिली. चहा पोहे झाले. तिने बघितलं सासुबाई आणि मनीषा... दीप्तीशी जास्त बोलत नव्हत्या. तिथल्या तिथे दोन ग्रुप पडल्या सारख वाटत होत. दीप्ती ही अलिप्त होती. यायच म्हणून आल्या सारखी.

थोड्या वेळाने दीप्ती आत आली. तिचा स्वभाव तर खूपच चांगला वाटला. त्यांचा छोटा मुलगा सोबत होता. शुभदाला तो खूप आवडला. त्या दोघी बरच बोलत होत्या.

मनीषा आत आली. तिच्या चेहर्‍यावर नापसंती होती. दीप्ती उठून बाहेर गेली. शुभदा सगळं बघत होती.

बाबानी बाहेर बोलवलं. ती अनिकेतशी बोलायला टेरेसवर आली. दोघांनी खूप गप्पा केल्या. माझ्याकडुन होकार आहे तो म्हणाला. शुभदा लाजली होती तो तिच्याकडे बघत होता. तू या लग्नासाठी तयार आहेस ना?

ती हळूच हो म्हणाली.

"तुला ही साडी छान दिसते. तुझी आहे ना? सोबत घेवून ये." तो म्हणाला. शुभदा आश्चर्य चकित झाली. मावशी म्हणाली तस झालं. ती हसत होती.

"मग खाली हो सांगायच ना."

ती हो म्हणाली. सगळे आनंदात होते. पाहुणे गेले.

दुसर्‍या दिवशी मनीषाचा फोन आला. ती घराबद्दल सगळं सांगत होती. तिने दीप्ती बद्दल सांगायला सुरुवात केली." ती चांगली नाही. आईच काहीच करत नाही. तिचा नुसता माहेरी ओढा. तू तिच्यापासून दूर रहा. तिने घर तोडलं. उगीच तुला काही शिकवेल."

"हो ताई. " शुभदा घाबरली. पण दीप्ती चांगली वाटत होती. ह्या का अस म्हणतात? तिला समजल नाही. तिने आईला सांगितल. त्या मनीषाताई अस का म्हणाल्या?

"घर आहे. थोड फार असतं बेटा. " लता ताई म्हणाल्या.

"मी दीप्ती ताई पासून दूर राहील. "

"तु आता पासुन कोणाबद्दल मत बनवू नकोस. तिकडे गेल्यावर स्वतः च्या अनुभवावरून बघ. कोण खर आहे आपल्याला माहिती नाही. " लता ताई म्हणाल्या.

"बरोबर आहे आई. "

अनिकेत ती रोज भेटत होते. त्यांच्यात खूप छान नात तयार झाल होत .पण तो घरच्या बद्दल जास्त सांगत नव्हता.

दोघांच वाजत गाजत लग्न झालं. दीप्ती खूप कामात होती. तिने तीच कर्तव्य केलं. ती खूपच चांगली आहे शुभदाने मान्य केल. मग घरचे तिच्याबद्दल अस का सांगत आहेत? अनिकेत ही दादा, वहिनीशी चांगल बोलत होता.

ती सासरी आली. त्यांची एक मोठी बिल्डिंग होती. चार मजले होते. दोन भावांचे दोन फ्लॅट. एक नणंदेचा. एक सासू सासरे यांच्यासाठी. नणंद दुसरीकडे रहायला होती. तिच्या घरात भाडेकरू होते.

"आई बाबांच आपल्याला सगळं कराव लागेल. त्यांच्या खाण्याच्या वेळा पाळायच्या." अनिकेतने सांगितलं.

शुभदाला काही वाटल नाही. ठीक आहे यांचे आई, बाबा आहेत त्यांच कराव लागेल.

दोघ फिरून आले. अगदी स्वप्नवत दिवस होते. माझ्या सारखी लकी कोणी नाही. शुभदा विचार करत होती. अनिकेतची सुट्टी संपली तो पर्यंत खूपच छान सुरु होतं.

🎭 Series Post

View all