Login

नात्यातला गुंता भाग 2

नात्यातला गुंता वाढू देवू नका त्याला वेळेत सोडवा
नात्यातला गुंता भाग 2

©️®️शिल्पा सुतार

आजपासून अनिकेत ऑफिस जॉईन करणार होता. शुभदा सकाळी उठली. डबा केला. नाश्ता केला. चहा तयार केला. अनिकेत आवरून तयार होता. तो ऑफिस मधे जाण्याआधी खाली आईच्या रूम मधे गेला.

"आठ वाजले अजून वरून चहा नाही आला. शुभदा काय करते आहे?" त्या नाराज होत्या.

तेवढ्यात शुभदा चहा, नाश्ता घेवून आली.

"आई, बाबांना आधी चहा देत जा." अनिकेत म्हणाला.

"हो, अहो मला या धावपळीची सवय नाही. करता करता समजेल. उद्या पासून सकाळी सातला चहा देत जाईल." शुभदा म्हणाली.

ती वरती आली. आवरल. थोड्या वेळाने ती दीप्तीकडे गेली. तिकडे बसली. त्या दोघी लग्नाचा व्हीडीओ बघत होत्या. साडेबारा झाले तिचा मोबाईल वाजत होता. अनिकेत नाव बघून ती खुश होती.

" बोला काय करताय. ऑफिस मधे माझ्या शिवाय करमत की नाही. " ती खट्याळ पणे म्हणाली.

" शुभदा आई बाबांना अजून जेवायला दिल नाही. ते एक वाजता जेवता ना. जा आधी त्यांच बघ." अनिकेत चिडला होता.

"हो पण अजून वेळ आहे. मी करेन ना. तुम्ही नका बर यात लक्ष देवू." तिला कसतरी वाटल. हे काय चिडचिड करत आहेत. नुसत आई बाबा, आई बाबा. हे माझ्याशी असे काय वागता आहेत.

" लक्ष देवू नका म्हणजे काय? तू तुझे काम नीट केलं तर मी बोलणार नाही. " त्याने रागाने फोन ठेवला.

" अरे हे काय होत?" ती विचार करत होती.

" काय झालं शुभदा? " दीप्तीने विचारल.

" अनिकेत माझ्यावर चिडले आहेत. काय तर म्हणे आई, बाबांना जेवायला उशीर झाला."

"अग असच करतात ते. विचारू नको. जा बघ त्यांच आणि जरा भावोजींना समजून सांग. त्या आई बाबांच्या नादी लागु नका. ते सारखीच कंप्लेंट करतात. जरा सुखाने राहू देत नाही. त्यांना काहीच पटत नाही. त्यांना मुलांचा संसार मोडायचा आहे. " दीप्ती म्हणाली.

" बापरे दीप्ती ताई. "

" हो मला ही खूप त्रास दिला. म्हणून मी अशी अलिप्त आहे. तर त्या माझी सगळीकडे बदनामी करतात. मी घर तोडल वगैरे. " दीप्ती खूप सांगत होती.

ती खाली जेवण घेवून गेली. तिच्या तोंडावर आलं होतं. की सारख काय सगळं अनिकेतला सांगतात. बोलू का? पण ती गप्प होती. नवीन लग्न आहे. जावू दे उद्या पासून यांच वेळेवर करू. पण हे आई, बाबा कठिण आहेत. आमच्यात भांडण लावतात.

संध्याकाळी ती खाली वॉकला गेली होती. येतांना फळ, भाजी घेवून आली. तिने उसळ केली. थोड्या वेळाने अनिकेत आला.

" जेवण खाली नेवून द्या." तिने सांगितल.

"तू जा, त्यांना वाढ. त्यांच जेवण झालं की वरती ये. सकाळी ही नुसत जेवण देवून आली." अनिकेत म्हणाला.

बापरे हे घरचे याला सगळे सांगतात वाटत. तिला खर तर खूप राग आला होता. खूप रडू येत होत. ती खाली गेली सासू सासर्‍यांच ताट केल. मनीषा आलेली होती. तिच्या साठी ही वरून जेवण आणलं.

" ही थोड ही जास्त करत नाही का? अगदी मोजून पोळ्या आणल्या. " मनीषा म्हणाली.

"बघ ना. दोन म्हणजे दोनच पोळ्या आणते. " सासुबाई म्हणाल्या.

" अस नाही आई, तुम्ही म्हणाल्या ना पडून रहात. लागत तेवढच करत जा. " शुभदा कसतरी म्हणाली.

" आम्हाला उसळ नको. " सासुबाई असहकार मोड वर होत्या.

ती परत वरती आली. उसळ नको तर बटाट्याच्या भाजी करत होती .

" शुभदा स्वयंपाक काय करायचा आधी आई बाबांना विचारून घेत जा ना." अनिकेत म्हणाला.

हो.

शुभदा बटाट्याची भाजी घेवून खाली गेली. मनीषा उसळ घरी घेवून गेली होती . ओह यांना भाजी न्यायची असेल म्हणून आईंनी मला दुसरी भाजी करायला सांगितली. नीट सांगायच ना मी केल असत. बापरे काय लोक आहेत. पहिल्यांदा बघितले. शुभदा विचार करत होती.

दुसर्‍या दिवशी काय खाणार ते शुभदा विचारत होती. तर इतके हो नाही करत होते. काय खाणार नीट सांगत नव्हते . स्वयंपाक साठी उशीर झाला. अनिकेत घरी आला.

"अजून आई, बाबांच जेवण झालं नाही?" तो खूपच रागावला होता, तिला बोलला.

"तुम्हाला माहिती का काय झालं ते? तुम्ही खालून काहीही ऐकून येतात. मला बोलतात. मला चालणार नाही." शुभदा चिडली.

"चालणार नाही म्हणजे? चुका करायच्या वरून ऐकून घ्यायचं नाही. काय प्रकार आहे हा शुभदा? नीट वागत जा." अनिकेतचा आवाज खाली पर्यंत जात होता.

मनीषा वरती आली. "शुभदा आजकाल दीप्ती सोबत असते म्हणून अस करते. "तिने काडी लावली.

" हे काय आहे शुभदा? आई, बाबा म्हणतील ते ऐकायच. एक शब्द ही उलट बोलायच नाही. नाहीतर इथून निघायच." त्याने तिच्या माहेरी फोन केला. सगळं सांगितल. त्यांना ही खूप बोलला.

घरचे काळजीत होते. शुभदा रडत स्वयंपाक करत होती.

आता हे नेहमीच झालं होत. दिवस रात्र कितीही करा. सासू, सासरे अनिकेतचे कान भरत होते . तो रात्री शुभदाला ओरडायचा. सारखी माहेरी कंप्लेंट करायचा. कितीही समजवा पालथ्या घड्यावर पाणी होतं. मला इथे रहायचं नाही. शुभदा कंटाळली होती. आज ती वरती दीप्तीकडे गेली होती .

"काय झालं ग?"

ती सगळं सांगत होती. "इथे काही खर नाही. सासू, सासरे काही सुचू देत नाही. हे त्यांच ऐकतात."

"जिवनातला हा फेज कठिण असतो जेव्हा आपला नवरा ही आपलं ऐकत नाही. आपली चुकी नसतांना बोलणे बसतात तेव्हा खूप त्रास होतो. यात अनिकेत भाऊजींची चुकी आहे. ते तुझ्या सोबत नाही म्हणूनच इतरांना फावत. ते जास्त त्रास देतात. म्हणून मी सासू सासर्‍यांशी संबंध ठेवत नाही. ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो. खूप कठिण लोक आहेत. तू अशी मुळमुळ राहू नकोस." दीप्ती तिला समजावत होती.

"इथे बोलून उपयोग नाही. मला ते ऑप्शन नाही. हेच माझ्या बाजूने नाहीत मी काय करू." शुभदा हताश झाली होती.

🎭 Series Post

View all