नऊ रूपे तिची

तिची नऊ रूपे
नऊ रूपे तिची..

पहिले कन्येचे..

"तुला किती वेळा सांगितलं आहे, माझी औषधे आणत जाऊ नकोस.. प्रशांत आणेल ना.." सीमावर रागवत तिचे वडिल म्हणाले.

"मी आणलेली औषधं घेऊन तुमचं आजारपण वाढणार आहे का?" आतून पाणी घेऊन येत सीमाने विचारले.

"अगं बरं दिसतं का ? तुझ्या सासरचे काय म्हणतील?"

"कोणी काही म्हणणार नाही. माझ्या लहानपणी तुम्ही जसं अर्ध चॉकलेट मला देत होता आणि अर्ध दादाला.. तसंच आता तुमच्या आजारपणातला अर्धा खर्च त्याचा आणि अर्धा खर्च माझा.. समजलं." सीमा ठामपणे म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर तिच्या बाबांना शैलपुत्रीचे तेज दिसत होते.


दुसरे सहचारिणीचे..


"मला तुझ्याशी लग्न करायचे नाही.. सांगितले ना तुला. मग का परत परत इथे येते आहेस?" तो चिडून म्हणाला.

"कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे." ती शांतपणे म्हणाली.

"पण माझे नाहीये तुझ्यावर.. तुला समजत नाही का?" त्याचा स्वर चढाच होता.

"समजलय.. म्हणूनच आले आहे. तुला काय वाटले मी सहजासहजी तुला सोडून जाईन? तुझ्या दुर्देवाने तुझे डॉक्टर मला भेटले आणि तू जो मूर्खपणा करायला निघाला आहेस तो त्यांनी मला सांगितला. तू बाप होऊ शकत नाहीस म्हणून तुला लग्न करायचे नाही, हा कुठला उपाय?" तिने त्याच्या जवळ जात विचारले.

"पण तुला असलेली मुलांची आवड?" त्याचा स्वर कापरा झाला होता.

"अरे, आपण आधुनिक काळात राहतो.. काहीतरी उपाय शोधता येईलच की.. आणि नाहीच झालं काही तर दत्तक घेऊ एखादं." ती हसत म्हणाली. तिच्यामध्ये त्याला ब्रम्हचारिणी दिसली.


तिसरे चंद्रघंटेचे...


"काही होणार नाही आता.. संपलं.. सगळं संपलं." तिचे सासरे निराश झाले होते.

"काय झालं बाबा?"

"मी हरलो.. मी ज्यांच्यासाठी तारण राहिलो होतो त्यांनी मला फसवलं. माझ्या हातातून माझी कंपनी जायची वेळ आली आहे."

"शांत व्हा बाबा.. उपाय नाही अशी कोणतीही समस्या नाही. तुम्ही काही कागदपत्रे तर बनवली असतील ना?"

"हो.. पण त्याने काही होणं शक्य नाही. आपल्या वकिलांनी सांगितले आहे."

"मी एकदा बघू का?"

"तुला समजते का?"

"बाबा, तुम्ही कदाचित विसरत असाल की माझे लॉ झाले आहे." ती म्हणाली. नाईलाजाने त्यांनी कागदपत्र तिला दाखवली. ती बघून तिच्या चेहर्‍यावर स्मितहास्य आले.

"काय झाले?"

"मिळाला उपाय."

"कसे शक्य आहे? आपल्या वकिलांनी तर.."

"बाबा त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघितले.. मी माझ्या संसाराच्या नजरेतून बघते आहे. म्हणून उपाय सापडला."

तिला बघून तिच्या सासऱ्यांना चंद्रघंटा आठवली.. सांसारिक त्रासातून मुक्ती मिळवून देणारी.


नवरात्रीच्या नऊ रूपांपैकी ही तीन रूपे. कशी वाटली नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all