नऊ रूपे तिची.. भाग २

तिची नऊ रूपे
चौथे जग्नमातेचे...


"सॉरी... पण तुम्ही आई होऊ शकत नाही." हे शब्द तिच्या कानामध्ये घुमत होते. ती सैरभैर झाली होती. लग्नाला पाच वर्ष झाली तरी मूलबाळ नाही म्हणून तिने स्वतःच्याच मनाने सगळ्या टेस्ट करून घेतल्या होत्या. आज त्याचा रिपोर्ट आला होता. डॉक्टर आधी सांगायलाच तयार नव्हते पण हिने खूपच आग्रह केला म्हणून त्यांनी सांगितले. ते ऐकून ती तुटून गेली होती. परत परत तेच शब्द तिच्या डोक्यात येत होते. वाट फुटेल तिथे ती जात होती. शेवटी थकून भागून ती समोरच्या बाकावर बसली. समोरच रस्त्यावर राहणाऱ्या बाईची दोनतीन पोरं तिथेच घाणीत खेळत होती आणि अजून एक पोर पोटात दिसत होतं. ते बघून तिला अजूनच भडभडून आलं. ज्यांना मुलांना हवं ते देता येत नाही त्यांना भरभरून मुले देतोस.. आणि मला एकही होऊ नये? ती देवाशी मनातल्यामनात भांडत होती.

"मनात आणलंस तर तू या मुलांची आई होऊ शकते." तिच्या कानामध्ये आवाज आला.

"मला स्वतःचं बाळ हवं आहे.." तिने विरोध केला.

"सर्व तुझीच मुले मानून बघ.." तो आवाज बंद झाला. तिने डोळे पुसले. मनाशी दोन गोष्टी ठरवून ती घरी आली. तिच्या काळजीत असलेल्या नवर्‍याला तिने त्या सांगितल्या.

"तुझी एक गोष्ट मान्य.. दुसरी अमान्य.." तिला जबरदस्ती मिठीत घेत तो म्हणाला.

वर्षभरातच तिने रस्त्यावरच्या मुलांसाठी केंद्र सुरू केले. पण त्याआधी महत्त्वाचे म्हणजे झोपडपट्टीत चालणारे बालविवाह आणि त्यातून होणारी संतती याचे दुष्परिणाम तिने त्यांना समजावून सांगायला सुरुवात केली. आधी प्रचंड विरोध झालेली ती आता तिकडच्या लोकांची माई झाली होती. तरीही स्वतःची रिती ओटी तिला खूप अस्वस्थ करायची.

"तुझ्यासाठी एक गुडन्यूज आहे.." तिचा नवरा खूप उत्साहात होता.

"परत एखादा बालविवाह रोखला का?" तिने विचारले.

"नाही.. मी काही डॉक्टरांशी बोललो आहे. त्यांचे म्हणणे आहे की एक छोटेसे ऑपरेशन आणि तू आई होऊ शकतेस."

"पण ते डॉक्टर?" तिचा या बातमीवर विश्वास बसत नव्हता.

"कमॉन.. ते पण माणूस आहेत ना.. होऊ शकते चूक. दुसरा हा विचार कर, त्यांनी जर ते सांगितले नसते तर आज तू या एवढ्या मुलांची माई होऊ शकली असतीस का?" त्याच्या नजरेत तिच्यासाठी अभिमान होता आणि तिच्या नजरेत.. कूष्मांडा देवीसारखे आपल्या अपत्यांवर प्रेम.


चौथे मातेचे..


"आई प्लीज.. मला या तुरूंगातून सोडव ना." सुमेध विनवणी करत होता. त्याच्याकडे लक्ष न देता ती तिथून बाहेर जात होती.

"आई प्लीज.. मी नाही गाडी चालवणार परत." ती जाते आहे हे बघून तो परत ओरडला. वीणा मागे वळली.

"तुला इथे गाडी चालवली म्हणून ठेवले नाही तर दारू पिऊन गाडी चालवलीस म्हणून तू इथे आहेस. तुझ्यामुळे ते घर उद्ध्वस्त झालं असतं. नशीबाने तो मुलगा वाचला. मला तर विचारच करवत नाही की त्याला काही झाले असते तर त्याच्या आईवडिलांचे काय झाले असते." वीणाच्या डोळ्यातली आग बघून सुमेधही क्षणभर घाबरला.

"आपण दोन मिनिटं बोलूयात का?" तिकडच्या पोलीस निरीक्षकांनी विचारले.
ते दोघे बाहेर आले.

"बाई, तुम्ही चांगल्या घरातल्या दिसत आहात म्हणून सांगावेसे वाटते. मी जर याच्यावर गुन्हा दाखल केला तर कमीतकमी तीन महिन्याची जेल होईल. आणि आमचा अनुभव. खूप कमीजण तिथून बाहेर पडताना स्वतःचा निरागसपणा कायम ठेवून येतात. काही निगरगट्ट होतात तर काही खचून जातात. शेवटी निर्णय तुमचा आहे."

"साहेब.. खूप मोठं मन आहे तुमचं. हा लहान असताना अश्याच मुलांच्या गाडी चालवण्यामुळे याचा बाबा अपघातात गेला. त्याच्यामागे लहानाचा मोठा केला आहे मी याला. आणि हा ही कोणाच्यातरी अपघाताचे कारण ठरावा हे सहनच झाले नाही मला. पण तुम्ही म्हणालात ते पटलं मला. चुकीप्रमाणेच शिक्षा हवी."

"चल, हो बाहेर.. आता तुला सोडतो आहे पण परत चूक केलीस तर बघ.." इन्स्पेक्टरने दम देऊन त्याला लॉकअपच्या बाहेर काढले.

"आई.. मी परत अशी चूक नाही करणार. आय प्रॉमीस.." सुमेध खुशीत आला होता. त्याच्या आईने भलत्याच रस्त्यावर गाडी घेतली हे बघून तो थोडा घाबरला.

"आई, आपण कुठे चाललो आहोत?"

"तीन महिन्याची तुला तिकडे शिक्षा नाही झाली. पण इथे होणार. ज्या मुलाचा तुझ्यामुळे अपघात झाला, तो कष्ट करून आपले घर चालवत होता. तो बरा होईपर्यंत तेच काम करून तुला त्याचे घर चालवायचे आहे.. आणि हो.. नकार द्यायचा विचारही करू नकोस. जी इस्टेट मी मोठ्या मेहनतीने कमावली आहे त्यातून बेदखल करायला मला वेळही लागणार नाही." गाडी चालवत ती ठामपणे म्हणाली. जणू तिच्यात संचारली होती आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करणारी पण चुकीसाठी शिक्षाही देणारी स्कंदमाता.


सदर कथांवर लेखिकेचा कॉपीराईट आहे. तिच्या परवानगीशिवाय यूट्युब तसेच नाव उडवून इतर ग्रुपवर शेअर करण्यास सक्त मनाई आहे. बाकी नेहमीचे प्रेम करणारे वाचक ही दोन रूपे कशी वाटली ते सांगतीलच.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all