नऊ रूपे तिची.. भाग ३

नऊ रूपे तिची
सहावे बहिणीचे..


"त्यांचे यकृत पूर्ण खराब झाले आहे. तुमच्या मनाची तयारी करा. तुम्हाला जर कोणाला बोलवायचे असेल तर बोलावून घ्या." डॉक्टरांनी सांगितलं. ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. उणापुरा तीसेक वर्षांचा तो, नुकतेच झालेले लग्न, तिच्या पोटात वाढणारा त्याचा अंकुर.. आणि अचानक हे सगळं.

"डॉक्टर, पण यावर काही ना काही उपाय तर असेल ना?" त्याच्या बहिणीने काकुळतीने विचारले.

"लिव्हर ट्रान्सप्लान्ट हा एकमेव उपाय आहे."

"मग डॉक्टर काय अडचण आहे? आम्ही तयार आहोत यासाठी." त्याची बायको पटकन म्हणाली.

"लिव्हर मिळणे एवढे सोपे नाही. आणि तुमच्या आधीपासून तिथे पेशंटचे नंबर लागलेले असतात." डॉक्टर म्हणाले.

"डॉक्टर, त्यासाठी काही टेस्ट असतात का?" त्याच्या बहिणीने विचारले.

"हो.. "

"मग माझ्या कराल का? मी तयार आहे यासाठी." बहिण म्हणाली.

"ताई..." त्याच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आले.

"अगं माझ्या पाठीला पाठ लावून आलेला तो.. जन्माच्या आधीपासून एकत्र रहायची सवय आम्हाला. कसं एकटं सोडेन मी त्याला?" आपल्या जुळ्या भावाकडे बघत ती म्हणाली. अपेक्षेप्रमाणेच तिचे यकृत त्याला देण्यासाठी योग्य होते. ऑपरेशन झाले. दोघेही सुखरूप घरी परत आले. काहीही न बोलता भावाने तिच्यासाठी कृतज्ञता दाखवली. ती फक्त हसली.. कात्यायनीदेवीसारखी.. यकृतरूपी राक्षसाशी लढून आपल्या भावाला वाचवण्याचे समाधान तिच्या चेहर्‍यावर होते.


सातवे सहकार्याचे


"काय रे सचित.. असा का बसला आहेस तोंड पाडून?" धनश्रीने विचारले.

"काय सांगू?" हताशपणे सचित बोलला.

"जे झाले आहे तेच.." धनश्री म्हणाली.

"आपला बॉस.. अगदी अवघड जागेचे दुखणे झाला आहे." हळू आवाजात सचित म्हणाला.

"त्यात नवीन काय? आल्यापासून त्याचे अनुभव येत आहेत की आपल्याला."

"पण यावेळेस खूप गंभीर आहे."

"काय झालं सांगशील?"

"सांगतो.. नाहीतरी माझे या ऑफिसमध्ये अजून किती दिवस आहेत माहित नाही. कोणालातरी सत्य माहित असावे. त्यादिवशी टेंडर भरायचा शेवटचा दिवस होता. मी सुट्टीवर जाणार होतो म्हणून यावेळेस निशांत ते भरणार होता. मी निघायच्या आधी तशी त्यालाही आठवण करून दिली होती आणि सरांनाही. पण तो मूर्ख विसरला म्हणे. त्याने टेंडर भरलेच नाही. आणि सरांनी सगळा दोष मलाच दिला. जीव तोडून काम केल्यावरही कौतुक तर मिळतच नाही पण दुसऱ्यांनी केलेल्या परिणामांचे खापर फोडायला मात्र तयार." सचितच्या डोळ्यात पाणी आले.

"तू बोलला नाहीस का सरांना काही?" गंभीरपणे धनश्रीने विचारले.

"ते ऐकून घ्यायला तयारच नाहीत. मला तर वाटते आहे नोकरी सोडायला लावतील मला. माझी चूक असती तर मी ऐकलंही असतं.. पण त्याच्या चुकीची शिक्षा मी का भोगायची?"

"चल माझ्यासोबत.." धनश्री जागेवरून उठली.

"कुठे??" सचितने विचारले.

"चल म्हटलं ना.." सचितला घेऊन धनश्री मोठ्या साहेबांकडे गेली.

"सर, हा सचितचा राजीनामा आणि हा माझा.. आम्ही नोटीस पिरियड पूर्ण करून जाऊ."

"अगं हो हो.. आलीस काय? आणि एका कागदावर राजीनामा लिहून देतेस काय? असं झालं तरी काय?" त्यांनी शांतपणे विचारले.

"सर, आपली ही कंपनी घरच्यासारखी आहे आमच्यासाठी. इतके दिवस आम्ही एक दुसऱ्यांना सांभाळून घेत काम करत होतो. पण म्हणून एकाची शिक्षा दुसर्‍याला होऊ देत नव्हतो."

"म्हणजे?"

"सर, माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही सचितला द्याल का?"

"नाहीच.. ते अयोग्यच आहे."

"मग निशांतने जे टेंडर भरले नाही त्यासाठी सचित चुकीचा कसा? याआधीही सर आमच्याशी चुकीचे वागायचे पण आम्ही सोडून द्यायचो. पण आता नाही. चुकीच्या वागण्याला आम्ही साथ देणार नाही. नोकरी आम्हालाही दुसरीकडे कुठे मिळू शकते आणि तुम्हालाही नवीन कर्मचारी मिळू शकतात. पण हे असं चुकीच्या ठिकाणी काम करणं मला जमणार नाही." धनश्री तावातावाने बोलत होती. मोठे सर तिच्याकडे बघत होते आणि सचितचे फक्त तोंडात बोट घालणं बाकी होते.

"मी बघतो काय झालं आहे ते.. एका गोष्टीची खात्री देतो दोषी व्यक्तीला शिक्षा नक्कीच होईल. हा माझा शब्द."

"थॅंक यू सर.." म्हणत दोघेही जायला निघाले.

"एक मिनिट धनश्री.. इतके दिवस शांतपणे बोलणारी तू अचानक कालीचे रूप का धारण केलेस? मी ही एक क्षण घाबरलो ना तुला.." मोठ्या सरांच्या चेहर्‍यावर हास्य होते.

"सर, कोणावरही अन्याय झालेला मी नाही सहन करू शकत. एखादी व्यक्ती फक्त आपल्यापेक्षा मोठ्या पदावर आहे म्हणून निरपराधाला शिक्षा करण्याचा त्याला हक्क आहे, हे सहनच झाले नाही मला.. सॉरी.. त्यासाठी." धनश्री म्हणाली.

"गरज नाही त्याची. तू जर इथे आली नसतीस तर तुमच्या सरांवर विश्वास ठेवून या सचितला शिक्षा झाली असती."

पुढे काहीच न बोलता धनश्री तिथून निघाली. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या कालीचे तेज तिच्या चेहर्‍यावर होते.


देवीची ही रूपे कशी वाटली ते नक्की सांगा.


(सदर कथांचा किंवा माझ्या कोणत्याही कथेचा उपयोग यूट्युबसाठी करण्यास मनाई आहे. दिसून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) हे खास युट्यूबरसाठी लिहावे लागते.. वाचक समजून घेतील ही अपेक्षा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all