धरलं तर चावतयं भाग एक

धरलं तर चावतयं Naughty Daughter In Law
धरलं तर चावतयं भाग एक

“सुनबाई ए सुनबाई किती वेळ आहे अजून स्वयंपाकाला? मला भूक लागली आहे.” घड्याळाचा काटा जसा जसा बाराच्या पुढे जात होता तसा तसा मीनाताईंच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळत होता. सकाळी सुनेला उपमा करायला सांगितलं तर तिने त्याची खीर बनवली होती. काल पोहे करायला सांगितले तर पोहे न भिजवताच सुनेने कांदा मिरचीची फोडणी करून त्यात पाणी घातलं होतं, आणि त्या फोडणीच्या पाण्यात पोहे टाकले होते.

काही सांगावं तर सुनबाई काहीच्या काही करून ठेवत होती. पण मुलाचा प्रेमविवाह असल्याने मीनाताई फार काही बोलू शकत नव्हत्या. आपल्याला जसं जमेल तसं त्या स्वयंपाकाचा आवरून घ्यायच्या पण तरीही सुनबाई काही ना काही कारनामा करून ठेवतच होती.

एकतर त्यांच्या सुनेला वागण्या बोलण्याचा पोच नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे ती स्वतःची चूकही मान्य करायला तयार नव्हती. प्रत्येक वेळी तिला असं वाटे की सासुबाई उगाच त्यांची फुशारकी मीरवत आहेत. बरं व्यवहार ज्ञानही तिला फारसं नव्हतं. मीनाताई जे सांगायच्या सुनबाई तसंच वागायची. बुद्धी तिने जणू खुंटीला टांगली होती. मुलखाची आळशी असल्याने ती मुद्दाम तसं वागे. सगळी अक्कल जणू तिने केवळ सोशल मीडिया आणि सेल्फी काढण्यासाठीच वापरायची असा पक्का निर्धार केला होता.

दिवाळीच्या वेळी मीनाताईंनी ओले गहू दळून आणून, त्याची पिठी भाजून ठेवली होती. त्या पिठीत साखरही कालवून झाली होती. तेवढ्यात बहिणीचा फोन आला, म्हणून त्यांनी सुनेला लाडू बांधायला सांगितले, तर सुनबाईंनी चक्क दोऱ्याने सगळे लाडू बांधले. मीनाताईंनी ते बघून डोक्याला हात मारला आणि विचारलं, “सुनबाई हे लाडू दोऱ्याने का बांधले?” तर सुनबाईने उत्तर दिले, “तुम्हीच तर लाडू बांधायला सांगितले होते ना? किती वेळ लागला मला, हे इतके लाडू बांधायला.” दोऱ्याचे दोन रीळही कमी पडले.” सुनेचे हे उत्तर ऐकून मीनाताईंना दे माय धरणी ठाय असं झालं.

शेवटी मीनाताई वैतागून बोलल्याच, “अग मी तुला लाडू वळायला सांगितले असते तर तू काय केलं असतं?”

“काय केलं असतं म्हणजे? अगदी सोप्प आहे लाडू वळणं. ती भाजलेली पिठी आहे ना त्यात पाणी घालून कणकेसारखी मळून घेतली असती, आणि फाफड्या सारखं पोलपाटावर त्याच्या गोल गोल पुंगळ्या केल्या असत्या.” सुनेने अगदी बिनधास्तपणे उत्तर दिले.

खरंतर मीनाताई स्वतः अगदी सुगरण होत्या, पण त्यांना सून अशी बहाद्दर मिळाली होती की ज्याचं नाव ते.

केवळ स्वयंपाकासाठी घरात तंटा नको म्हणून त्या मुलाच्या कानावर काही घालत नव्हत्या. पण सुनेला मनापासून काही शिकण्याची आवड नव्हती आणि इच्छाही नव्हती.

लग्न झाल्यावर मीनाताईंनी सुनेला म्हटलं, “सुनबाई सकाळी लवकर उठत जा. तेवढीच मला कामाला मदत.” तर सुनबाई पहाटे साडेचारला उठून बसली, घरातले सगळे दिवे लावले, आणि मोबाईलवर जोरात लता मंगेशकरची भजनं सुरू केली. वरून मीनाताईंना उठवायला जाऊन विचारलं, “आई आता काय करायचं?”

मीनाताईंचे यजमान तर मीनाताईंकडे ‘खाऊ की गीळू’ या नजरेने बघत होते. मीनाताईंचा मुलगा त्याच्या बायकोवर ओरडला तर तिने सांगितलं,“सासूबाईंनी मला सकाळी लवकर उठायला सांगितलं होतं. सकाळी उठल्यावर मी काय टीव्हीवर सिनेमा बघायला हवा होता, की सोशल मीडिया करता रिल्स बनवायला हव्या होत्या?”

बायकोने केलेल्या कारनाम्या मुळे वैतागलेला तिचा नवरा त्याच्या आईकडे अतिशय केविलवाण्या नजरेने बघत होता आणि त्याने हात जोडून आईला विनंती केली, “आई माझी तुला हात जोडून विनंती आहे, तु तुझ्या सुनेला सकाळी उठवण्याचे कष्ट देऊ नकोस. तिच्या लवकर उठण्याने माझाच जीव फार दुःखी कष्टी होतो.”


शेवटी मीनाताईंनी सुनेला तिच्या रोजच्या वेळेवर सकाळी आठ वाजता उठण्याची मुभा दिली. सुनबाईंच्या तर हे पथ्यावरच पडलं.

एकदा मीनाताईंकडे गावाकडचे लोकं आले होते, तेव्हाही सुनेने असाच कारनामा केला.

पुढल्या भागात बघूया सुनेने काय गुण उधळले. तोपर्यंत हा भाग कसा वाटला नक्की सांगा.


©® राखी भावसार भांडेकर नागपूर.

सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशी कसलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.