आली नवी ही प्रभात, उजळल्या दाही दिशा
श्रांत लोचनी देऊन, नवे स्वप्न नवी आशा
संपवून काळी रात्र, सारा तिमिर संपला
लाल-केशरी रंगाचा, नभा शेला पांघरला
रविकिरणे सोनेरी, त्यांची प्रभा पसरली
मुक्त उधळण सारी, पाखरेही मोहरली
थेंब थेंब हा दवाचा, तृणपर्णी ओघळला
हरितवर्णी पर्णावर, सडा रत्नांचा भासला
पारिजाताचा सुवास, आसमंती पसरला
चाफा, केवडा, गुलाब, अंगोपांगी बहरला
इथे अत्तर सांडले, जणू कुपी लवंडून
मन उधाण हे झाले, आसमंती विहरून
नाचे रानात मयूर, करी कोकिळ कूजन
सुवासिनींचे सजून, चाले तुळशी पूजन
अशा सुंदर सकाळी, नववर्षाची चाहूल
नवे स्वप्न नवी आशा, अन सुखाचे पाऊल
सर्वां भुकेला जेवण, शांत निराकुल मन
करी सर्वांचे रक्षण, लाभो आरोग्याचे धन
यश-कीर्तीची किनार, प्रेम-जिव्हाळा अपार
देई, देवा! हे आंदण, तुझ्या कृपेची पाखर.
© स्वाती अमोल मुधोळकर
सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.
सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा