दोन तीन वेळा बेल वाजवूनही कोणी दार उघडलं नाही तेव्हा प्रसाद जरा आश्चर्यचकित झाला. कोणीच घरी नाही कसं शक्य आहे. आईबाबा कधीच नुसत लॅच लावून बाहेर जात नाहीत, कुलूप लावतात. आपल्याजवळील लॅचकिने दार उघडून तो आत आला. बॅग सोफ्यावर टाकून त्याने बूट काढले तेव्हड्यात आदिती बाहेर आली.
“अरे तू आहेस घरात”
“जस्ट आले, वॉशरूममध्ये होते, बेल ऐकली, मला वाटलंच तू असशील.”
“घरात कोणीच दिसत नाही, गेलीत कुठे मंडळी?” आजूबाजूला बघत प्रसाद म्हणाला.
“सगळे आत्याकडे गेलेत. काकांना भेटायला. दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला त्यांना.”
“मला कसं माहीत नाही”
“अचानक ठरलं. रविवारी जायचा प्लॅन होता पण भावजी ताईला न्यायला येणार म्हणून आज गेले सगळे. आई म्हणाल्या तुम्ही दोघं पण वेळ मिळाला की जाऊन या” अदितीने चहाचा कप हातात देत प्रसादला सांगितले.
“हल्ली मला कोणी काहीच सांगत नाही, लाडक्या सुनेला सांगतात, आमचा भाव कमी झाला” प्रसाद आदितीला जवळ घेत म्हंटला.
“लाडात येऊ नकोस प्रसाद, स्वयंपाक करायचा आहे मला. आधीच उशीर झालाय. पहिल्यांदा एकटीने जेवण बनवणार आहे, खूप टेन्शन आलंय. ज्यावेळी लवकर निघायचं असत त्याचवेळी बरोबर अर्जेंट काम येत. त्यात ट्रेन लेट, ट्रॅफिक आहेच पाचवीला पुजलेलं” अदिती स्वतःवरच वैतागली होती..
“ते जेवून येणार असतील ना”
“पेशंटला भेटायला गेलेत रे, जेवणखाण करायला नाही, थोड्यावेळ बसून येतील.”
“तू बस ना माझ्याजवळ आदू, पार्सल मागवू आपण”
“आई पण सकाळी हेच म्हणत होत्या, ऑफिसमधून आल्यावर एकटी काही करत बसू नकोस, पार्सल मागव. पण मीच म्हंटल, बाई पोळ्या करून जातील, आमटी भात, भाजी मी करेन. कसं वाटेल आईला सुनेला चार, पाच माणसांसाठी डाळभात, भाजी पण करता येत नाही.”
“तू पण ना”
“नाईलाज आहे” म्हणत प्रसादच्या मिठीतून स्वतःला सोडवत अदिती किचनमध्ये पळाली.
प्रसादने रगारागाने रिमोट हातात घेतला.
गेल्याच महिन्यातच आदिती आणि प्रसादचा प्रेमविवाह संपन्न झाला होता. सहा वर्षापासून दोघं एकमेकांना ओळखत होते. एकाच ऑफिसमध्ये नोकरी करता करता, कंपनीचं अकाउंट्स सांभाळता सांभाळता कधी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांचं त्यांनाच कळलं नाही. साधारण एक दीड वर्षानंतर प्रसादने जॉब बदलला. अदिती मात्र तिथेच परमंनंट झाली. नोकरी बदलली असली तरी प्रेम मात्र तसूभरही कमी झालं नव्हतं. प्रसादच ऑफीस चर्चगेट तर अदितीचं बांद्र्याला, दोघं विरुद्ध दिशेला, त्यामुळे रोज भेटणं शक्यच नव्हतं. एखादया रविवारी भेटायची ती त्याला. पण दर रविवारी जमायचं नाही तिला. आदितीचे वडील रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर, घरात कडक शिस्त. थोडा देखील उशीर झालेला चालायचा नाही त्यांना.
“जरा जरी कुणकूण लागली ना आपल्या प्रेमाची तर नोकरी सोडायला लावून, बाबा लग्न लावून देतील माझं” अदिती नेहमी म्हणायची.
मुलाचे वडील रेल्वेत, आई गृहिणी, वडिलांचा ठाण्यात आलिशान टूबीएचके. पण मुलाच काय…? तो अजून सेटेल नाही. हे असं कोणी म्हंटलेल आदितीला नको होतं आणि अर्थात प्रसादलाही म्हणून दोघांनी काही काळ थांबायचे ठरवले. प्रसाद सेटेल झाल्यावर घरी सांगायचे ठरवले.
तोपर्यंत आदितीला स्थळ सांगून यायला लागली. कधी पत्रिका जमली नाही. तर कधी मुलाकडून नकार तर कधी बाबांना जावई नापसंत.
बहुतेक आमच्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या असणार म्हणून नकार येतात अदिती मनोमन खूष व्हायची.
बहुतेक आमच्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या असणार म्हणून नकार येतात अदिती मनोमन खूष व्हायची.
दीड दोन वर्षात टू व्हीलर वरून फिरणाऱ्या प्रसादकडे फोरव्हीलर आली. बॅक बॅलन्स वाढला. नोकरीत मनोजोक्त पॅकेज मिळू लागलं. दरम्यान बहिणीच लग्न सुद्धा झालं. त्याचे बाबा रिटायर्ड झाले असले तरी पेन्शन येत होती. अदितीची कायमस्वरूपी नोकरी चालूच होती. हीच योग्य वेळ आहे असं म्हणत दोघांनी घरी आपल्याबद्दल सांगितलं.
दोन्ही कुटुंब समजूतदार, सुस्वभावी, सुशिक्षित होती. त्यामुळे विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता. देवाब्रह्मणांच्या साथीने, आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत प्रसाद,आदितीचा विवाह दणक्यात संपन्न झाला. कुलाचार आटपून दोघं हनिमूनला जाऊन आले.
लग्न ठरण्यापूर्वी, लग्न ठरल्यानंतर, अगदी चार दिवसांपूर्वी कुलू मनाली वरून येईपर्यंत सगळं ठीकठाक चालू होत. अचानक काय झालं आदितीला काय माहित, मला टाळू लागली. माझा कंटाळा आला की काय तिला? आजही इतक्या दिवसांनी मस्त एकांत मिळाला आहे तर ही स्वयंपाक करत बसली आहे. त्यादिवशी तर चक्क मला बेडरूमच्या बाहेर हाकलून दिलं. उलटसुलट विचार प्रसादच्या डोक्यात फिरू लागले.
प्रसाद आणि आदिती कुलू मनाली वरून आले तरी प्रसादाची बहीण सासरी गेली नव्हती. तिच्या नवऱ्याला अचानक ट्रूरला जावं लागलं. सासू सासऱ्यांची चारधाम यात्रा आधीपासूनच ठरली होती. तेव्हा ती आठ महिन्यांच्या बाळाला घेवून एकटी कशी रहाणार, नवरा बंगलोर वरून परत येईपर्यंत तिने माहेरी रहावं अस सर्वानुमते ठरलं.
त्यात “माझ्या दोन्ही मुलांना तूच अंघोळ, मालिश केलंस ताई, आता नातवाला पण कर” म्हणत प्रसादच्या आईने स्नेहाने आपल्या मोठ्या बहिणीला थांबवून घेतलं होत. लग्नासाठी कोकणातून आलेली ताई मावशी सुद्धा आनंदाने, बाळाचं कौतुक करायला थांबली होती.
प्रसाद, आदीती नव्हते तेव्हा पल्लवी आणि छोटा रुद्रांश त्यांच्या रूममध्ये झोपत होते. बाबा हॉलमध्ये बाहेर आणि आई, मावशी आईबाबांच्या खोलीत. हे दोघं परत आल्यावर कोणाला कुठे अॅडजेस्ट करायचं स्नेहाताईंना मोठा प्रश्न पडला. त्या स्वतः कंबरेच दुखणं असल्यामुळे खाली झोपू शकत नव्हत्या. बहिण त्यांच्यापेक्षा मोठी तिला कसं सांगणार खाली हॉलमध्ये खाली झोप. त्यात त्यांची खोली छोटी त्या तिघी, छोटा रूद्रांश तिथे मावणं शक्य नव्हतं.
“प्रसाद झोपेल आई बाहेर, मी, पल्लू ताई आणि पिल्लू आमच्या रूममध्ये झोपू” आदितीने चुटकीसरशी प्रश्न सोडवला. किती कौतुक वाटलं स्नेहाला आपल्या सुनेचं !
प्रसादने नाईलाजाने हॉलला लागून असलेल्या टेरेसवर आपली पथारी पसरली. हवेत सुखद गारवा होता. ढगांआडून चंद्र हळूच डोकवत होता. त्याच्या बाजूला त्याच्या सख्या चांदण्या चमचमत होत्या. ह्या धुंद वातावरणात आदिती जवळ हवीच. तो हळूच आत गेला पण बेडरूमचं दार आतून बंद. त्याने बाहेर ये,आदितीला मेसेज केला. ती जागी असणार याची त्याला खात्री होती.
आता…तिने रिप्लाय दिला.
हो…आत्ताच.
ती हळूच बाहेर आली. त्याने तिला जवळ घेत कपाळावरील बट बाजूला केली.
इतक्यात आईने आरोळी ठोकली. “झोपला नाहीस का रे अजून, जास्त वेळ मोबाईल बघत बसू नकोस” स्नेहाताई बाथरूमला जायला उठल्या होत्या.
बाजूला बघतो तर आदू नाही. ती दाराची करकर ऐकताच आत पळाली होती. ‘लग्नाआधी पण तेच लग्नानंतरही तेच मेसेजवर समाधान’ प्रसादने दात ओठ खात डोक्यावरून घट्ट दूलई लपेटून घेतली.
बास झालं. आत्ताच जाब विचारतो आदितीला. घरातल्या सगळ्यांच्या आवतीभवती भिरभिरते आणि माझ्याकडे साफ दुर्लक्ष करते. तो रागाने किचनमध्ये गेला. तोपर्यंत तिचा कुकर लावून झाला होता. भाजी चिरणाऱ्या तिला त्याने हाताला घट्ट धरून डायनिंग टेबल जवळील खुर्चीवर बसवले.
“असं का वागतेस माझ्याशी आदिती?”
“कशाबद्दल बोलतोस”
त्याला पटकन काय बोलावं ते सुचेना. पण तिला मात्र त्याच्या मनातली खदखद बरोबर कळली. लग्नाला अवघा महिना दीड महिना झाला असला तरी त्याआधीच्या सहा वर्षांपासून ती त्याला ओळखत होती.
“सकाळी आई मला स्वयंपाक घरात फिरकू पण देत नाहीत, डबा काय पाण्याची बाटली सुद्धा हातात देतात. मग संध्याकाळी तरी मी थोडीफार
मदत नको का करायला? आपल्या लग्नाच्या आधी तुमच्याकडे पोळ्यांना बाई नव्हती पण मला ऑफिसमधून आल्यावर जास्त करायला लागू नये म्हणून आईनी लगेच बाई लावली. त्या इतक्या समजूतदारपणे वागतात तर मी थोडं तरी शहाण्यासारखं नको का वागायला?”
मदत नको का करायला? आपल्या लग्नाच्या आधी तुमच्याकडे पोळ्यांना बाई नव्हती पण मला ऑफिसमधून आल्यावर जास्त करायला लागू नये म्हणून आईनी लगेच बाई लावली. त्या इतक्या समजूतदारपणे वागतात तर मी थोडं तरी शहाण्यासारखं नको का वागायला?”
“समाजात राहायचं तर सामजिक भान पाळावं लागतं तसचं एकत्र कुटुंबात रहायचं तर सगळ्यांचा विचार करावा लागतो. आत्मकेंद्रित राहून फक्त तुझा आणि माझा विचार करायचा असेल तर आपण वेगळं राहू. राहू शकतोस आईबाबांशिवाय?”
त्याने नकारार्थी मान हलवली.
“ताई अजून बाळाला फीड करते अशावेळी ती बाहेर उघड्यावर झोपलेली चांगलं वाटेल का? म्हणून…”
“काही दिवसांचा तर प्रश्न आहे. रविवारी ती चालली सासरी. मग आहेच की आपली बेडरूम आपली” तिने हळूच त्याच्या गालावर चापट मारली.
“हे सगळं माझ्या लक्षातच आलं नाही, सॉरी”
“उगाच नाही म्हणत काही गोष्टी पुरूषांना कळतं नाहीत.”
“आली मोठ्ठी” तो तिला चिडवत म्हंटला.
“माझं पण चुकलंच प्रसाद मी तुला आधी सांगायला हवं होत.”
“लग्नाअधी फक्त आपल्या दोघांचंच विश्व होतं. पण आता मला सून, नणंद, बायको अशा तिहेरी भूमिका वठवायच्या आहेत. पहिल्या दोन भूमिका बजावताना तुझ्याकडे थोडं दुर्लक्ष झालं. हक्काने तुला गृहीत धरलं गेलं. एवढ्याने दुरावा यायला, तुटायला, इतकं तकलादू आहे का रे आपलं नातं.” बोलता बोलता अदितीच्या डोळ्यात पाणी आलं. प्रसादने तिला कवेत घेत ते अलगद टिपलं. कान पकडत मनापासून तिची माफी मागितली.
गॅस बंद करत स्वतःला सावरत अदिती पुन्हा स्वयंपाकाला लागली. प्रसादला तिची भूमिका पटली होती. सगळा रुसवा फुगवा कूकरच्या शिटीसमेत हवेत विरला होता. तो तिला मदत करण्यासाठी बटाटे सोलू लागला. इतक्या वेळ आडमुठेपणा करत बसलेल्या त्याच्यातला हा बदल तिला सुखावून गेला आणि खऱ्या अर्थाने त्यांचा संसार सुरू झाला.
त्या रात्री प्रसादने न कुरकुरता आनंदाने आपली गादी टेरेसवर टाकली. आदितीला कधीच न दुखावण्याचा, तिच्या प्रत्येक भूमिकेत मनापासून साथ देण्याचा मनोमन निर्धार करत, आपल्या संसारात डोकावणाऱ्या चंद्राला साक्षी मानत समाधानाने झोपी गेला.
©® मृणाल महेश शिंपी.
09.01.2024
09.01.2024
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा