Login

नवीन आयुष्य.

सुदाच्या आयुष्याची दुःखद गोष्ट...!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

नवीन आयुष्य

" आई गं, वाचवा..." सुधाने पायऱ्यांवरून पडताना तिच्या घरच्यांना हाक दिली.

सुधा सहा महिन्यांची गरोदर होती. आज ती सकाळ सकाळ कामं आवरून धुतलेल्या कपड्यांची जड बादली हातात घेऊन वर गच्चीवर जाणाऱ्या पायऱ्या चढू लागली. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पायऱ्या संपूर्ण ओल्या होत्या. ती वर शेवटच्या पायरीवर पाय ठेवणार इतक्यात तिचा मागचा पाय मागच्या मागे सरकला आणि सरळ तिच्या पोटावर खाली पडून तशीच पायऱ्यांवरून खाली घसरत आली.

पडल्यावर ती वेदनेने जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकून तिचे सासू सासरे धावत तिथे आले. तिला खाली जमिनीवर बेशुद्ध पडलेली बघून ते घाबरून गेले. त्यांनी लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. त्यांनी आधीच कामाला गेलेल्या तिच्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं.

हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बाहेर सगळे काळजी करत उभे असताना तिचा नवरा सुदेश तिथे आला.

" आई बाबा, काय आणि कसं झालं हे? डॉक्टर काय म्हणाले?" तिथे येताच तो त्यांना प्रश्न करू लागला.

" काय माहित रे बाबा, वेंधळी एक नंबरची बायको तुझी. पायऱ्या चढताना लक्ष नसेल ठेवले आणि मग पडली घसरून . डॉक्टर अजून काही बाहेर आले नाही. काही सांगितलं नाही आम्हाला कोणी काही." सुदेशची आई त्याला म्हणाली.

त्यांचं संभाषण चालू असताना वॉर्डमधून बाहेर आले. ते बाहेर येताच सुदेश पुढे होऊन त्यांना सुधा आणि त्यांचं बाळ कसं आहे ह्या बद्दल विचारू लागला.

" काळजी करण्यासारखं काही नाही त्या एकदम सुखरूप आहेत. तुम्ही त्यांचे मिस्टर ना?" डॉक्टरांनी सुदेशला विचारले. त्यावर त्याने होकारार्थी मान हलवली.

" तुम्ही माझ्यासोबत माझ्या केबिनमध्ये या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे." इतकं बोलून ते तिथे निघून गेले. सुदेश घाई घाईने त्यांच्या मागून त्यांच्या केबिनमध्ये गेला. त्याचे आई बाबा बाहेर उभे राहून त्याची वाट बघू लागले. नक्की काय झालं आहे हे त्यांना कळेना झाले.

काही वेळाने सुदेश केबिन मधून उदास चेहऱ्याने बाहेर आला. त्याला उदास बघून ते दोघे त्याला काय झाल्याचं विचारू लागले.

" डॉक्टर म्हणाले, सुधा वाचली, पण तिच्या पोटातली मुलगी गेली. ते तिला नाही वाचवू शकले." सुदेश त्यांना म्हणाला.

" काय म्हणतोस? मुलगी होती? मग बरंच झालं की, आपल्याला असं ही मुलगी नको होती. ती अशीच गेली ते बरं झालं नाही तर, आपण काय केले असते." आई त्याच्या जवळ जाऊन हळूच त्याला म्हणाली.

" हो आई, तुझं बरोबर आहे, पण ह्या पुढे आता सुधा कधीच आई बनू शकणार नाही." सुदेश उदास होऊन हळू आवाजात आईला म्हणाला.

ते ऐकून मात्र त्या दोघांच्या पाया खालची जमीन सरकली. ते दोघे ही सावरून एकमेकांच्या आधाराने मागच्या खुर्चीवर बसले.

" औदसा मेली, आपल्या घराला वारस नाही देऊ शकत मग काय फायदा तिचा. ज्यासाठी हिला त्या गरीब खाण्यातून उचलून आणले होते. तेच आपलं स्वप्न जरही पूर्ण करणार नसेल, तर हिचा फायदा काय? अशीच हिला इथे सोडून निघून जाऊ." त्याची आई चिडूनच म्हणाली.

" थांब आई, आता इथेच आपण असं तिला टाकून जाऊ शकत नाही, आपण फसू. आपण तिला घरी घेऊन जाऊ आणि तिथून तिची हकालपट्टी करू." सुदेश आईला म्हणाला.

सुधा लहानाची मोठी आश्रमात झाली होती. मोठी झाल्यावर आश्रमासाठी, ती नोकरी करू लागली. ती अतिशय साधी आणि सुंदर मुलगी होती. एकच ऑफिसमध्ये कामाला असताना सुदेश आणि सुधा एकमेकांना आवडू लागले. त्यांनी दोघांनी लग्न केलं. त्याच्या घरच्यांनी तिला अगदी आवडीने स्वीकारले. तिच्यावर प्रेम करू लागले, पण त्यांचा त्या मागचा हेतू तिला ठाऊक नव्हता.

सुदा डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांनी तिला घरी आणले. घरी आल्यावर तिच्या सोबत घरच्यांचं वागणं बदलल्याचं तिला जाणवू लागलं. तिने कित्येकदा सुदेशला ते विचारण्याचा प्रयत्न केला, पण हल्ली तिला त्याच्याकडून फक्त शिव्या आणि मारच मिळत होता. ती आता अतिशय दुःखी आणि घरात सांभाळून राहायला लागली.

तिच्या दुःखाला सीमा नव्हती. तिने आधीच तिचे बाळ गमावले होते. त्यात ती आयुष्यात परत कधीच आई होऊ शकत नव्हती हा आयुष्याचा सगळ्यात मोठा धक्का तिला बसला होता. त्यातून सावरण्या आधीच तिला घरच्यांच्या वागण्याला सामोरे जावं लागत होतं. त्याचं कारण देखील तिला स्पष्ट कोणी सांगत नव्हतं.

एक रात्री तिच्या सासूने मुद्दाम भांडण उकरून काढलं आणि ते इतक्या टोकाला गेलं की, त्यांनी तिघांनी मिळून तिला घराबाहेर काढली. ती त्यांच्यासमोर खूप रडली, खूप विनवण्या केल्या पण त्यांनी तिचं काही ऐकलं नाही.

शेवटी ती तिथून निघाली, रात्रीची रडत रस्त्याने चालत जवळच असलेल्या एस टी डेपोत गेली. तिथे जाऊन ती प्रवाश्यांना थांबायला जागा असते तिथे एक कोपऱ्यात जाऊन बसली. तिथे बसून तिच्या डोक्यात विचारांची आणि डोळ्यांमध्ये अश्रूंची धार लागली. तिथून कुठे जावं, तर त्यासाठी तिच्याकडे एक रुपया देखील नव्हता. तिला जगणं अशक्य वाटू लागलं. ती तशीच रडत रडत त्या लांब सिमेंटच्या बाकावर पडली आणि रडता रडता कधी तिला झोप लागली तिचं तिलाच समजले नाही.

अचानक झोपेत तिच्या कानावर लोकांचा आवाज येऊ लागला. तिने घाबरून डोळे उघडले तर, आता सकाळ झाली होती. तिथे प्रवाशांची गर्दी वाढली होती. ती लगेच उठून सावरून बसली.

बसल्यावर तिला कळलं की, तिच्या उशाशी एक लहान ८ ते ९ वर्षाची मुलगी एकटीच बसली होती. सुधा तिच्या जवळ सरकून तिला ती कोण असल्याचं विचारू लागली.

" काकू, मी परी इथे बस डेपोत फुलं, गजरा आणि वेण्या विकते. तुम्हाला हवा का गजरा? घ्या तुम्ही, खूप छान दिसेल तुमच्या केसांमध्ये." परी हसतच तिला टोपलीतले गजरे दाखवत म्हणाली.

तिचं ते गोड बोलणं ऐकून सुधा स्वतःला स्वतःचे सारे दुःख भुलून गेली.

" नको गं बाळा, मी काय करणार ह्या गजाऱ्याचं. माझ्याकडे पैशे सुद्धा नाहीत. तू एकटीच इथे गजरा विकतेस का? तुझे आई बाबा कुठे असतात?" सुधा तिला प्रश्न विचारू लागली.

" मला आई बाबा नाहीत मी एकटीच राहते फुलवाल्या आजी आजोबांसोबत." परी उदास होऊन तिला म्हणाली.

" काय? आणि मग तुझी शाळा?" सुधा ते आश्चर्यचकित होऊन तिला विचारलं.

" नाही मी शाळेत नाही जात. दिवस भर फुलं विकते आणि मिळतील ते पैसे आजी आजोबांना देते. त्यांच्या सोबत राहते ना, मग असंच कसं राहणार." परी सुधाला म्हणाली.

त्या इवल्याश्या मुलीकडून त्या गोष्टी ऐकून सुधा थक्क होऊन तिच्याकडे बघत बसली. तिला लहानपणीची स्वतःची आठवण झाली.

" बाळा, मी पण तुझ्या सोबत आजी आजोबांकडे राहायला आली तर चालेल का गं? तुझ्या सारखं माझंही ह्या जगात कोणी नाही. मी तुझ्यासोबत राहू शकते का?"

सुधा डोळ्यात अश्रू आणून तिला हलक्या आवाजात भीत भीत तिला विचारू लागली. जणू तिला तिच्या नकाराची भीती होती. तिच्या रुपात तिला जगण्याची किरण दिसत होती.

" हो, पण एक अटीवर..." परी सुधाला म्हणाली. तसंच सुधाने लगेच तिला तिची अट विचारली. तिला तिच्या सोबत राहण्यासाठी कोणतीही अट मान्य होती.

" मी तुला आई म्हणू शकते का गं...?" परीने देखील डोळ्यात अश्रू आणून तिला गोड आवाजात अट घातली.

तिचे ते शब्द ऐकून सुधाने सरळ रडत आनंदाने तिला उराशी कवटाळले. जणू ती तिच्या आयुष्यालाच नव्याने मिठीत घेत होती.