Login

नवीन शिक्षिका १

गौरीचा बी. एड झाल्यावरचा पहिला दिवस.
भाग १

थंडीच्या सकाळी ‘परांजपे विद्यालय’ च्या फाटकात एक तरुणी भीतीने पाऊल टाकत होती. हातात छोटीशी वही, खांद्यावर पर्स, डोक्यात थोडे दडपण घेऊन ती शाळेत प्रवेश करत होती, गौरी इंगळे नाव होते तिचे. नुकतीच बी.एड. करून पहिल्यांच फटक्यात मुलाखतीत पास होऊन नोकरीस लागलेली शिक्षिका होती, तसे बघायला गेले तर वयाच्या मानाने ती लहानच होती आता कुठे तिचे बाविसावे वर्ष सुरू होते.

शाळेचा पहिला दिवस तिच्यासाठी जणू एखादे स्वप्नच होते. मनामध्ये लहानपणीचा काळ आठवत होता. शाळेतला पहिला विद्यार्थी दशेतला दिवस आणि आताचा शिक्षक बनल्यावरचा दिवस दोघात अंतर असूनही दडपण तेच होते. शाळेच्या अंगणात मुले इकडून तिकडे धावत होती, कोणी झाडावरच्या झुल्यावर बसले होते, तर काही वर्गाच्या खिडक्यांमधून ओरडत एकमेकांना चिडवत होते.

मुख्याध्यापिका कर्वे बाई त्याच्या कार्यालयात बसल्या होत्या. गौरी त्यांच्याशी नम्रपणे म्हणाली,

“नमस्कार बाई, मी गौरी इंगळे. आज या शाळेत रुजू होण्याचे पत्र मला आले आहे.”

कर्वे बाई स्मित करून म्हणाल्या,

“हो मला सांगितले गेले आहे, स्वागत आहे गौरी! तुला १० वी ‘ब’ वर्ग मिळेल. थोडा खोडकर वर्ग आहे, पण तू नक्की जमवशील असे मला वाटते.”

तेवढ्यात दारातून एक उंच, रागीट चेहऱ्याचे शिक्षक आत आले, आम्ले सर. ते शाळेतील सर्वांत जुने शिक्षक होते, असा कुठलाही विषय नव्हता जो त्यांनी आतापर्यंत शाळेत शिकवला नव्हता. अगदी शारीरिक शिक्षणाचा वर्ग देखील ते घेऊ शकायचे, सर्वात महत्वाचे म्हणजे ते कडक शिस्तीसाठी ओळखले जायचे. त्यांनी गौरीकडे पाहून कर्वे बाईंना विचारले,

“याच त्या नव्या मॅडम का?”

“हो, गौरी इंगळे.”

आम्ले सर हलकेसे हसले, पण त्यात थोडीशी खिल्ली होती.

“ही तर एवढुशी मुलगी आहे, आठवी ब ची मुले तर हिला गुंडाळूनच ठेवतील. बाई तुम्हाला कधी मदत लागली तर माझी वेताची छडी घेऊन जा.”

गौरीला थोडे अवघडल्यासारखे झाले, पण तिने चेहऱ्यावर आत्मविश्वास ठेवला.

“सर, मी शिकवायला आलेय, मारून मुले शिकत नाहीत त्याने ती कोडगी होतात आणि मग अजून अभ्यासाची टाळाटाळ करतात.”

कर्वे बाई हसल्या. “अगदी बरोबर, जा, तुझा वर्ग वाट बघतोय.”

वर्ग १० वी ‘ब’ मध्ये पाऊल टाकताच गौरीच्या डोळ्यांसमोर गोंधळाचे चित्र दिसू लागले. कोणी बाकांवर उभे होते, कोणी फळ्यावर विचित्र चित्रे काढत होते, तर काहीजण एकमेकांवर कागदाचे गोळे फेकत होते. सगळीकडे सावळा गोंधळ चालू होता. ती फळ्याजवळ गेली आणि गोड आवाजात म्हणाली,

“शुभ प्रभात मुलांनो”

कोणीच प्रतिसाद दिला नाही. उलट मागून कोणीतरी गुपचूप म्हणाले,

“बाई, तुम्ही शिकवणार?  की आमच्या बरोबर शिकायला आला आहात?
वर्गात हशा पिकला.

गौरी काही क्षण शांत राहिली. मग खडू उचलून फळ्यावर मोठ्या अक्षरात लिहिले.

“विद्या विनयेन शोभते”

ती वळली आणि म्हणाली,

“मी तुम्हाला ओरडून नाही, समजावून शिकवणार आहे, पण त्यासाठी.मला तुमचीच मदत लागणार आहे, करणार ना मग मदत?"

क्षणभर सगळे गप्प झाले. तिच्या आवाजातला आत्मविश्वास आणि प्रेम अनपेक्षित होते. शाळेतले सगळे शिक्षक या वर्गातील मुलांना नेहमी काही न काही शिक्षा करत असत, किंवा ते कसे खोडकर आहेत हे जाणून त्यांच्याशी तेवढे प्रेमाने बोलत नसत, पण या बाईंनी काही क्षणातच वर्गात शिकवायला सुरुवात केली. तिने गणिताचा धडा सुरू केला. दोन-तीन मुले लक्ष देत होती, बाकीचे अजूनही खोड्या करायचा प्रयत्न करत होती.  पण गौरीने त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले.

ती बोलता बोलता एखाद्या विद्यार्थ्याचे नाव घेत त्याच्याकडून उत्तर वदवून घेत होती, उत्तर चुकीचेच असायचे आणि त्यानंतर ती शांतपणे सगळे पुन्हा समजावून सांगत होती. एका तासातच वर्गात थोडा बदल झालेला कर्वे बाईंना वर्गाबाहेरहून फेरी मारताना जाणवला.

मधल्या सुट्टीत शिक्षकांचा स्टाफरूम गप्पांनी भरलेला होता. कुणीतरी गौरीला विचारले,

“कशी जमली पहिली तासिका गौरी?

"मस्त झाला तास, मुले थोडी खोडकर आहेत पण त्यांच्या कलेने घेतले की नक्की आपल्याबरोबर जुळवून घेतील." गौरी त्यांना म्हणाली.

आम्ले सर हसले,

“अजून दोन दिवसांत कळेल. १० वी ‘ब’ म्हणजे शाळेचा वादळी वर्ग आहे, कधी वावटळ येईल आणि गौरी बाई त्यात सापडतील त्यांनाच कळणार नाही.”

गौरीने चहा घेत स्मित केले.

“वादळात उभे कसे राहायचे हे आपल्याला बी .एड करतानाच शिकवतात सर, पळून काहीही साध्य होणार नाही.”

त्या रात्री घरी गेल्यावर ती खूप विचार करत राहिली. वर्गातील मुले, त्यांचा खोडकरपणा, त्यांची अवहेलना, सगळे तिच्या डोक्यात फिरत होते, त्यांना पुढे कशा पद्धतीत शिकवायचे यावर मनातल्या मनात आडाखे बांधात राहिली.

“मी त्यांना माझ्या पद्धतीने शिकवेन. त्यांचा राग नाही, पण त्याचा विश्वास नक्कीच जिंकून दाखवीन.”


क्रमशः

Ⓒ ®भालचंद्र नरेंद्र देव 

जलद लेखन कथा स्पर्धा नोव्हेंबर २०२५
’कानामागून आली अन् तिखट झाली’
0

🎭 Series Post

View all