भाग २
दुसरा दिवस उजाडला गौरीने वर्गात पाऊल टाकले, तेव्हा १० वी ‘ब’ आधीच खोड्या काढायला सज्ज झाली होती.
आज त्यांनी ठरवले होते “नवीन बाईंना सळो कि पळो करून सोडायचे !”
आज त्यांनी ठरवले होते “नवीन बाईंना सळो कि पळो करून सोडायचे !”
ती फळ्यावर लिहायला गेली, आणि तितक्यात मागून कोणीतरी ओरडला,
“बाई, तुमच्या चप्पलला गोंद लागलाय!”
तीने खाली बघितले तर खरेच तिच्या चप्पलच्या मागच्या भागाला काळा काळा चिकट पदार्थ लागला होता आणि त्याचे ठसे तिच्या आजूबाजूला उमटत होते. वर्गात दडपून हशा पसरला. दुसऱ्या बाकावर बसलेल्या प्रशांतने कागदाच्या गोळ्याने मित्राला इशारा केला “झाले काम !”
गौरीने काहीही न बोलता चप्पल काढून शांतपणे कोपऱ्यात ठेवली, फळ्याजवळ गेली आणि पुन्हा लिहायला सुरुवात केली.
“सगळ्यांना हसू आले ना? बरे झाले, चला आता पाहू कोणाला शिकायच्या वेळी हसू येते ते!”
वर्ग गप्प झाला. काही क्षणातच पुन्हा मागून एक पातळ आवाज आला.
“बाई, तुम्ही शाळेत शिकवायला आलात की वर्गाची फरशी घाण करायला ?”
वर्गात पुन्हा एकदा हशा पिकला.
गौरीच्या चेहऱ्यावर हलके स्मित आले, कितीही झालं तरी राग करायचा नाही हे तिने ठरवले होते तिने आवाजातला संयम सोडला नाही.
“ज्यांना ज्यांना माझी शिकवण्याची पद्धत आवडत नाही , त्यांनी हात वर करा, मग मी फक्त बाकीच्यांना गणित शिकवीन.”
कोणीच हात वर केला नाही, तिने शिकवणे सुरू केले.
थोड्याच वेळात आम्ले सर निरीक्षणासाठी त्या वर्गाजवळून जात होते. त्यांना आतून गोंधळाचे आवाज ऐकू आले, ते आत शिरले.
त्यांनी बघितले, एक मुलगा गौरी पाठमोरी असताना कागदाच्या बोळ्याने खेळत होता. काही बाकांवर गोंधळ सुरू होता.
आम्ले सरांचा चेहरा रागाने लाल झाला.
“ही कसली शिस्त? ह्या सगळ्यांना अजून दांडा मिळालेला नाही वाटते!”
त्यांनी जोरात ओरडत एकेकाला बाहेर काढले. प्रशांत, नामदेव, आभा, महेश सगळ्यांना रांगेत उभे केले.
“गौरी बाई नवीन आहेत, त्या तुम्हाला शिकवायला येतात, आणि तुम्ही तमाशा करत बसता? असे शिकणार तुम्ही?”
त्यांनी प्रशांतच्या कानाखाली एक चापट मारली. गौरी दचकली.
“सर, थांबा… त्यांना मारू नका.”
“नाही, ह्यांना समजायला हवे ते कुठे चुकत आहेत ते !” आम्ले सर रागाने म्हणाले.
पण गौरी पुढे आली, मुलांसमोर उभी राहिली आणि ठाम आवाजात म्हणाली.
“सर, चूक त्यांची नाही… माझी आहे.”
आम्ले सर थबकले.
“काय म्हणालात?”
“मी नवीन आहे, अजून त्यांना नीट ओळखले नाही. मी वर्ग नीट हाताळू शकले नाही, म्हणून असे झाले. मुले शिकायला तयार आहेत, पण मी त्यांना तसे वातावरणच दिले नाही. त्यांना मारू नका.”
“तुमचे हृदय मोठे आहे बाई, पण शाळा हे दयाळूपणाचे ठिकाण नाही, शिस्त हवीच. असो… पुढच्या वेळी असे होऊ देऊ नका.” ते बाहेर गेले.
मुले थक्क झाली. काहींच्या डोळ्यांत पाणी आले होते. आम्ले सर धुसफुसत पुढे गेले, पण ही घटना एका दुसऱ्या बाजूने कर्वे बाई देखील पाहत होत्या, त्यांना गौरीचे कौतुक वाटू लागले.
वर्गात काही क्षण शांतता होती. गौरीने हळूच पहिले, सगळे विद्यार्थी तिच्याकडे अपराधी नजरेने पाहत होते.
ती म्हणाली, “ठीक आहे, आता वर्ग सुरू करूया. तुमच्या डोळ्यात मला अभ्यासाची जिज्ञासा दिसू दे, ती दिसली नाही , तर मला सर्वात जास्त वाईट वाटेल.”
त्या एका वाक्याने वर्गात सगळे बदलले. नामदेव हळूच म्हणाला,
“बाई , आम्हाला माफ करा … आम्ही फक्त मजा करत होतो.”
“ठीक आहे. मजा करायची, पण अभ्यासाच्या वेळी नाही, त्यासाठी मी तुम्हाला वेगळा वेळ देईन.”
त्या दिवशी वर्गात पहिल्यांदा खरी शांतता निर्माण झाली. मुलांनी पहिल्यांदा कोणालाही त्रास न देता अभ्यास करण्याचा प्रयत्न सुरु केला.
मधल्या सुट्टीत आम्ले सर स्टाफरूममध्ये कर्वे बाईंना म्हणाले,
“ती गौरी आहे ना, थोडी जास्तच मवाळ आहे. मुलांवर चालणार नाही तिचे, तिला सगळे गुंडाळून ठेवतील.”
कर्वे बाई फक्त हसल्या,
“शिस्त फक्त ओरडून किंवा मारून नाही, तर काही वेळा प्रेमाने देखील शिकवता येते, आज तुम्ही पहिले असेल कि तिच्या तासिकेनंतर वर्ग खूप शांत झाला आहे नाही का? .”
गौरीची पहिली परीक्षा संपली होती आणि ती मुलांच्या बरोबर मुख्याध्यापक कर्वे बाईंच्या विश्वासाला देखील उत्तीर्ण होत होती.
क्रमशः
Ⓒ ®भालचंद्र नरेंद्र देव
जलद लेखन कथा स्पर्धा नोव्हेंबर २०२५
’कानामागून आली अन् तिखट झाली’
’कानामागून आली अन् तिखट झाली’
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा