भाग ३
गौरी मॅडम आता शाळेचा एक भाग झाली होती. तिच्या वर्गातून आता गोंधळ कधीच ऐकू यायचा नाही, अभ्यास देखील व्यवस्थित सुरु झाला होता. चाचणी परीक्षेत प्रत्येकाचे मार्क याची साक्ष देत होते. गौरी कधी गोष्ट सांगून गणित शिकवायची, तर कधी चित्रकलेतून. मुले तिच्या तासाची वाट बघू लागली होती.
एके दिवशी मुख्याध्यापिका कर्वे बाई अचानक पर्यवेक्षणासाठी वर्गात आल्या आणि मागच्या बाकावर जाऊन बसल्या. वर्गात गौरीने एका छोट्या प्रयोगातून धडा शिकवण्याची तयारी केली होती. टेबलावर काही चमचे, कार्डबोर्ड, आणि घड्याळाचे छोटे मॉडेल ठेवलेले होते. गौरी म्हणाली,
“बघा मुलांनो, आपण आज पायथागोरसचा सिद्धांत शिकणार आहोत घड्याळाच्या काट्यांनी आपण कोन कसे बदलतात आणि त्याचे क्षेत्रफळ आपण कुठल्या सूत्राने काढू शकतो हे तुम्हाला लगेच कळेल.”
मुले विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होती. कुठेही गोंधळ नव्हता, फक्त एक उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.
कर्वे बाई काही वेळ शांत पाहत राहिल्या आणि तास संपल्यावर त्यांनी टाळ्या वाजवल्या.
कर्वे बाई काही वेळ शांत पाहत राहिल्या आणि तास संपल्यावर त्यांनी टाळ्या वाजवल्या.
“खूप छान गौरी! तुझी शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. मुलांच्या डोक्यात नव्हे, तर मनात घर करून बसते.”
त्या दिवसानंतर कर्वे बाईंच्या नजरेत गौरीचा सन्मान खूप जास्त वाढला होता. एका आठवड्यात शाळेच्या शैक्षणिक समितीच्या बैठकीत कर्वे बाईंनी सांगितले.
“शाळेतील विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक उपक्रम आणि शैक्षणिक नियोजनाचे नेतृत्व आता गौरी बाई सांभाळतील.”
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण एका चेहऱ्यावर मात्र नाराजी स्पष्ट दिसत होती, ते म्हणजे आम्ले सर होते. इतक्या वर्षांपासून ही सर्व जबाबदारी त्यांच्या हातात होती. त्यांनी चेहऱ्यावर कृत्रिम हसू आणून विचारले,
“मॅडम, मी ह्या जबाबदाऱ्या अनेक वर्षे सांभाळतोय, त्यात काही चूक झाली का? आता अचानक बदल का?”
कर्वे बाई म्हणाल्या,
“आम्ले सर, तुमचे काम उत्कृष्ट आहे, पण आता नवीन पिढीतल्या पद्धतींनाही वाव द्यायला हवा. गौरीकडे काही नवे प्रयोग आहेत. तुम्ही तिच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहाल.”
आम्ले सरांचे कपाळावर आठ्या पडल्या.
“मार्गदर्शक? म्हणजे मी आता फक्त सल्ला देणारा राहिलो का ? हे योग्य नाही, मॅडम.”
कर्वे बाई त्यांची समजूत काढत म्हणाल्या,
“शाळा ही सगळ्यांची आहे सर, प्रत्येकाला कधी ना कधी संधी मिळायला हवी.”
त्या गेल्यानंतर शिक्षकवर्गात कुजबुज सुरू झाली.
“आम्ले सरांना बाजूला केलं म्हणे…”
“गौरी बाईंना सगळी जबाबदारी दिली…”
“आता शाळा तरुणांच्या हाती जाऊ लागली आहे !”
“गौरी बाईंना सगळी जबाबदारी दिली…”
“आता शाळा तरुणांच्या हाती जाऊ लागली आहे !”
आम्ले सर रागाने स्टाफरूममधून उठले. दुपारच्या सुट्टीत त्यांनी थेट गौरीकडे जाऊन म्हटले,
“बाई, तुम्हाला काय वाटते, दोन महिन्यांच्या अनुभवावर सगळी जबाबदारी घेणे योग्य आहे?”
गौरी तिचे नेहमीचे स्मित करत नम्रपणे म्हणाली,
“सर, मी काही मागितले नव्हते. कर्वे बाईंनी विश्वास दाखवला, म्हणून स्वीकारले, आणि मला तुमचे मार्गदर्शन नक्की लागणार कारण मी एकटी हे नाही सांभाळू शकणार.”
“मार्गदर्शन?” आम्ले सर उपरोधिकपणे हसले.
“तुमच्या पिढीला वाटते, जुने सगळे चूक आणि नवीनच बरोबर. पण शिक्षण म्हणजे प्रयोग नव्हे मॅडम, त्यात खूप जुनी परंपरा आहे!”
मीनल शांत राहिली. तिला वाद घालायचा नव्हता.
“सर, मी फक्त मुलांना शिकवायला थोडे वेगळे करत आहे. तुम्हाला चुकीच वाटत असेल, तर मी नाही करणार.”
“नाही!” आम्ले सर ओरडले.
“तुम्ही काहीही बदलू नका. कारण आता कर्वे बाईंना तुम्ही आवडता, तुमच्या हातात पुढची सत्ता आलीये. पुढे काय, कदाचित मुख्याध्यापक पदही तुम्हालाच मिळेल!”
त्यांच्या उपहासाच्या वक्तव्याने गौरीचे डोळे पाणावले. ती काहीही बोलली नाही, फक्त शांतपणे वर्गात परत गेली आणि मुलांना शिकवू लागली, त्या दिवशी पहिल्यांदाच तिच्या डोळ्यांत नेहमी दिसणारे हसू नव्हते. हे मुलांना देखील कळून चुकले होते.
संध्याकाळी कर्वे बाई तिला भेटायला आल्या.
“गौरी , तुला आज कसला त्रास झाला का?” ती हळूच म्हणाली,
“नाही मॅडम… आम्ले सर फक्त आपला अनुभव व्यक्त करत होते.” कर्वे बाई थोडे हसल्या, “तू बरोबर चालली आहेस. पण लक्षात ठेव, नवा मार्ग शोधणाऱ्याला नेहमी दगड लागण्याची शक्यता असते.”
त्या शब्दांनी गौरीचा आत्मविश्वास पुन्हा परतला. ती खिडकीतून बाहेर पाहत होती, शाळेच्या मैदानात तिच्या वर्गातील मुले धावत होती, हसत होती.
"काही लोकांना माझा मार्ग पटणार नाही, पण ह्या मुलांच्या डोळ्यांतला उत्साह मला पुढे जाण्यासाठी मोकळा मार्ग दाखवेल."
क्रमशः
Ⓒ ®भालचंद्र नरेंद्र देव
जलद लेखन कथा स्पर्धा नोव्हेंबर २०२५
’कानामागून आली अन् तिखट झाली’
’कानामागून आली अन् तिखट झाली’
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा