Login

नवीन शिक्षिका ४

गौरी तिची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण करते.
भाग ४

डिसेंबरचा महिना सुरू झाला होता. शाळेत उत्साहाचे वातावरण होते. वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी सुरू झाली होती.

सगळ्यांचे गट तयार झाले होते. यावर्षी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन गौरी मॅडमच्या हवाली करण्यात आले होते.

शिक्षक वर्गात घोषणा झाली:

“यावर्षीचा सांस्कृतिक कार्यक्रम ‘नव्या भारताची स्वप्ने’ या विषयावर असेल याची प्रमुख जबाबदारी गौरी इंगळे यांना देण्यात आली आहे."

सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण आम्ले सरांच्या चेहऱ्यावर पुन्हा नाराजी उमटली होती.

ते हळूच म्हणाले,

“पूर्वी हे सगळे मी बघायचो. आता ही ‘नवी पिढी’ सगळे बदलून टाकेल.”

गौरी मात्र निर्धाराने कामाला लागली. तिने ठरवले कार्यक्रम फक्त नाच गाणी यातच अडकवायचा नाही, तीने सगळ्या मुलांना एकत्र बोलावले.

“यावर्षीचा कार्यक्रम तुम्हीच घडवणार आहात. प्रत्येकाने काहीतरी जबाबदारी घ्यायची. मंचावर जे असतील तेवढेच नाही, मंचामागे काम करणारेही तितकेच महत्त्वाचे असतात हे देखील लक्षात ठेवा.”

तीने वेगळ्या कल्पना मांडल्या, एका नाटकात शेतकरी, वैज्ञानिक आणि सैनिक यांचा संवाद दाखवायचा आणि त्यांच्यात श्रेष्ठ कोण हा संवाद दाखवून  शेवटी सगळेच राष्ट्रासाठी किती महत्वाचे आहेत हे सांगून नाट्य संपवायचे;


एका लघुनाटिकेत प्लास्टिक प्रदूषणावर हास्यरसातून संदेश द्यायचा तर शेवटी विद्यार्थ्यांच्या रचनेतून  ‘भारत २०४०’ या कवितेवर आधारित नृत्यनाट्य सादर करायचे.

विद्यार्थी उत्साहाने उड्या मारत कामाला लागले. गौरी प्रत्येक गटात बसून त्यांना मार्गदर्शन करू लागली.
कोणी संवाद लिहीत होते, कोणी त्यासाठी लागणारे साहित्य तयार करत होते, कोणी दिव्यांची रचना कशी ठेवायची यावर  खलबते करत होती.

तीने आम्लेसरांनाही आमंत्रण दिले.

“सर, तुम्ही पारंपरिक नृत्याचा भाग बघाल का? त्यात तुमचा अनुभव कामाला येईल.”


पण सर म्हणाले,  “माझे मत जेव्हा विचारायचे होते, तेव्हा विचारले गेले नाही. आता केवळ औपचारिकतेसाठी बोलवता आहात का?”

गौरीने काही न बोलता त्यांना मनातल्या मनात कोपऱ्यापासून नमस्कार केला.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी शाळेत रंगीत तालीम सुरू होती. कर्वे बाई सर्वात शेवटी बसून पाहत होत्या. व्यासपीठावर छोट्या मुलांनी प्लास्टिकमुक्त गावावर नाटिका सादर केली. तेव्हा संपूर्ण शिक्षक वर्गाने टाळ्यांचा गजर केला. कर्वे बाईंच्या डोळ्यांत आनंद चमकत होता.

कर्वे बाईं गौरीला बोलावून म्हणाल्या,

 “खरं सांगते गौरी, इतका सर्जनशील कार्यक्रम मी वर्षानुवर्षं पाहिलेला नाही. शाळेतल्या जवळ जवळ सगळ्या मुलांनी यात कुठेना कुठे भाग घेतला होता, प्रत्येकाची काही ना काही  करून दाखवण्याची जिद्द तू बाहेर आणलीस.”

दुसऱ्या दिवशी कार्यक्रम झाला. पालक, ग्रामपंचायत सदस्य, आणि शिक्षण अधिकारी सगळे उपस्थित होते. शाळेच्या छोट्याशा मैदानात रंगमंच उजळून निघाला होता. प्रत्येक सादरीकरणानंतर प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत होता.
कर्वे बाई अभिमानाने म्हणाल्या,

“हे आहे आपल्या ‘परांजपे विद्यालयाचे नवे रूप!’”

कार्यक्रम संपल्यावर पालकांनीही कौतुक केले. प्रत्येक जण गौरी बरोबर येऊन त्यांची प्रशंसा करत होता,

 “आमच्या मुलांमध्ये इतका आत्मविश्वास येईल, हे स्वप्नातही कधी वाटले नव्हते.”

दुसऱ्या दिवशी सकाळी शिक्षक वर्गाची बैठक झाली. कर्वे बाईंनी सर्व शिक्षकांसमोर जाहीर केले,

 “या वर्षीच्या यशस्वी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गौरी इंगळे यांचे अभिनंदन. तसेच, शाळेच्या पर्यवेक्षक समितीत मी त्यांची नियुक्ती करत आहे.”

सगळ्यांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या. पण आम्ले सर टेबलावरचा पेन घट्ट पकडून बसले होते, त्यांच्या चेहऱ्यावर भयंकर राग ओसंडत होता.

बैठक संपल्यावर त्यांनी कर्वे बाईंना थांबवले.

“मॅडम, इतके कौतुक करून तुम्ही एका नवीन शिक्षिकेला खूप वर नेत आहात, ते सुद्धा जेष्ठ लोकांना डावलुन, हे योग्य नाही.”

मुख्याध्यपकांनी त्यांना शांतपणे उत्तर दिले, “मी कुणालाही वर नेत नाही, फक्त तिच्या कामाला योग्य स्थान देत आहे. तुम्हीही तिला प्रोत्साहन द्यायला हवे.”

“प्रोत्साहन?” आम्लेसर उपरोधाने हसले.

“उद्या ही मुलगी तुमच्याच खुर्चीवर बसेल, आणि मग तुम्ही परत म्हणाल ‘बदलाची गरज होती!”

कर्वे बाई फक्त हसल्या, पण त्याने वातावरण गंभीर झाले होते.

क्रमशः 

Ⓒ ®भालचंद्र नरेंद्र देव 

जलद लेखन कथा स्पर्धा नोव्हेंबर २०२५
’कानामागून आली अन् तिखट झाली’


0

🎭 Series Post

View all