Login

नवरा माझा, घर तिचं 2

Story Of Couple
आकांक्षाचं आयुष्य आता थोडं स्थिर होऊ लागलं होतं, पण सगळं काही परफेक्ट नव्हतं.
ती सकाळी लवकर उठायची, पूजा करायला मदत करायची, स्वयंपाक शिकायचा प्रयत्न करायची — पण माधुरीताईंच्या नजरेत तिच्या प्रत्येक कृतीवर एक हलकी तपासणी असायची.
“मीठ जास्त झालंय आज,”
“भाजी थोडी कोरडी झालीये,”
“वहिनी, आपण असं करत नाही, आईंना आवडत नाही,” —
राधिका नेहमीच असं काहीतरी बोलायची.
आकांक्षा गप्प राहायची. ती राग न धरता स्वतःलाच समजवायची,
“ठीक आहे, नवं घर आहे, सगळं शिकायला वेळ लागतो.”
पण मनाच्या आत कुठेतरी ती थोडी हरवू लागली होती.
कधी वाटायचं — “मी एवढं प्रयत्न करतेय, पण मला का कुणी बघतच नाही?”
एक संध्याकाळ आठवते — राधिकेचं ऑफिसचं presentation होतं.
ती खूप तणावात होती. आकांक्षाने तिच्यासाठी कॉफी केली आणि थोडं बोलायला गेली.
“तू छान करशील. तुझं काम खूप नीट असतं.”
राधिकेने काही न बोलता फक्त मान हलवली.
कदाचित त्या क्षणीही तिच्या मनात होतं, “ही मला समजणार कशी?”
दुसऱ्या दिवशी सकाळी, आकांक्षा भाजी कापत असताना, राधिकेचा चष्मा सापडला नाही.
“वहिनी! माझा चष्मा कुठे ठेवला तुम्ही?” ती ओरडली.
आकांक्षा चकित झाली, “मी नाही ठेवला, तूच काल टेबलावर ठेवला होतास ना?”
पण वातावरण आधीच ताणलेलं होतं.
माधुरीताई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि म्हणाल्या,
“आकांक्षा, तू घरातल्या वस्तू हाताळताना थोडं लक्ष दे बाळ, राधिकेला रोज उशीर होतोय.”
त्या क्षणी आकांक्षाच्या डोळ्यात पाणी आलं.
“आई, खरंच मी नाही ठेवला...” ती हळूच म्हणाली.
पण त्या आधीच राधिकेने आपला चष्मा बॅगेत सापडला होता.
क्षणभर सगळे शांत. कोणी काहीच बोललं नाही.
त्या रात्री रोहित घरी आला, आणि घराचं वातावरण काहीसं जडच होतं.
“काय झालं पुन्हा?” तो विचारतो.
आकांक्षा गप्प. मग ती म्हणाली,
“मी काही चुकीचं केलं नाही, तरीही प्रत्येक वेळेला दोष माझाच का?”
रोहित थोडा गप्प राहिला. त्यालाही समजत नव्हतं काय बोलावं.
“आईंचं मन अजून तुला ओळखत नाही, थोडा वेळ दे,” तो म्हणाला.
आकांक्षा डोळे पुसून म्हणाली,
“वेळ तर देतेय मी, पण स्वतःला कुठे हरवतेय, हे तुला दिसतंय का?”
त्या रात्री दोघं वेगवेगळ्या बाजूला झोपले.
खिडकीतून हलका पाऊस येत होता, आणि आकांक्षाला फक्त एकच विचार येत होता —
“मी फक्त या घरात राहत नाही, मी या घरासाठी झगडतेय.”
पुढच्या सकाळी, काहीतरी बदल झालं.
माधुरीताई देवपूजा संपवून बाहेर आल्या आणि आकांक्षाला म्हणाल्या,
“आजचा चहा छान झाला.”
एक छोटं वाक्य. पण त्या शब्दांनी आकांक्षाचं मन थोडं उजळलं.
तिला समजलं — बदल लगेच दिसत नाही, पण होत असतो.
थोडं तिचं कमी, थोडं माझं जास्त — असं काहीतरी मधलं संतुलन सुरू झालं होतं.
0

🎭 Series Post

View all