"रागिणी अगं कसा नवरा हवा तुला? आता तरी बोलशील का नाही तू."
"अगं मी काय बोलणार! तुमच्या दोघींची लग्न झालेली आहे तर तुम्ही सांगा ना काहीतरी."
वेदा लगेच उठली आणि म्हणाली,
"अगं नवरा कसाही असो गं फक्त तो मुठीत ठेवता आला पाहिजे, आता बघ ना...."
वेदाचं बोलणं पूर्ण नाही होत तोच रक्षा बोलली ,
"एकच नंबर बोलली वेदा तू, सुखी संसाराची परिभाषा आहे ती, नवरा मुठीत हवा बाकी काही का असेना."
वेदा आणि रक्षा दोघी जोरात हसायला लागल्या.रागिणी मात्र दोघींकडे बघत होती आणि विचारात मग्न झाली.
रूम मधला आवाज ऐकून आई रूममधे आली.
"काय झालं गं हसायला? बाहेर आवाज येतोय आणि एवढा आनंद कशासाठी झाला? रागिणीला मुलगा फक्त बघून गेलाय अजून होकार नाही कळवला त्यांनी."
"मावशी....अहो तो ही मिळणारच अशी मुलगी शोधून नाही सापडणार त्यांना."
आईने चहाचा ट्रे खाली ठेवला आणि कप उचलणार तोच वेदा म्हणाली,
" मावशी..अहो राहू द्या...घेतो ना आम्ही."
चहा घेऊन दोघी मैत्रिणी घरी जायला निघाल्या.
"रागिणी लक्षात ठेव बरं का आम्ही काय सांगितलं."
रागिणी हलकीशी हसली, तिघी उठल्या आणि बाहेर आल्या.
"मावशी आम्ही निघतो बरं का आता."
"अगं थांबा आता लागतेच मी स्वयंपाकाला, खाऊन जा थोडं थोडं."
दोघीही एकदम बोलल्या,
"नको.. नको..."
"मावशी, अहो मला घरी जाऊन पटकन स्वयंपाकाला लागावं लागेल नाहीतर सासूबाई एकाचे दोन सांगतील आणि मग आमच्यात वाद सुरू होतील. त्यापेक्षा मी घरीच गेलेली बरी." सोफ्यावरची पर्स उचलत रक्षा म्हणाली.
"तुझी सासू तरी आहे पण माझा तर नवराच सासू आहे माझी. सासूची काहीच कमी वाटत नाही मला. जरा का काही उशीर झाला कोणत्या गोष्टीला की ह्याच भाषण सुरू. त्यापेक्षा आपलं काम आणि आपण भल. पटकन आवरून मोकळं व्हायचं."
आता मात्र रागिणी हसली.
तिला हसलेलं बघून आई तिला म्हणाली,
" रागिणी काय झालं गं हसायला? काही दिवसांनी तुझ्या ही पदरात हेच पडणार आहे.असं तिन्ही सांजेला तुलाही बाहेर पडता येणार नाही कळलं!!!"
" आई अगं मान्य आहे मला खरं तर ते तेव्हाचं तेव्हा बघू.पण ह्या दोघी मला समजून सांगत होत्या की नवरा मुठीत हवा म्हणून मला हसायला येत आहे,बाकी काही नाही."
"घे हसून आमच्यावर दोन दिवसात लग्न करून सासरी जाशील ना की तेव्हा कळेल तुला. प्रत्येक शब्द अन् शब्द आठवेल मग आम्ही काय म्हणत होते ते."
" बघू ...काय होतं ते."
"चला मावशी...निघतो आम्ही आणि काही फोन वैगरे आला होकाराचा तर कळवा आम्हाला."
"बाय रागिणी.."
"बाय...रक्षा आणि वेदा."
"बाय..बाय..."
रागिणी दोघींना सोडून घरात आली. सोफ्यावर विचार करत बसली.
आईने स्वयंपाक घरातून आवाज दिला.
" रागिणीsss अगं ऐ रागिणीsss"
रागिणी विचारत एवढी मग्न होती की तिला आईचा आवाज ऐकू आला नाही.
आई स्वयंपाक घरातून बाहेर आली.
"रागिणीssss अगं ऐ रागिणीssss"
तरीही रागिणीचे लक्ष भलतीकडेच होते म्हणून आईने तिला हलवलं...
" बाळा रागिणी, काय झालं?"
" अं... अं..काही बोललीस का आई तू."
" अगं किती वेळची हाक मारत होते मी, कुठे हरवली बाळा? एवढी काळजी नको करू पहिलाच तर मुलगा बघायला आला तुला, नाही पसंत आलीस तर बिघडलं कुठे?"
" आई अगं मी तो विचार करतच नव्हते. तुला तर माहीत आहे मला हे असं कांदे पोहे आणि चहाचा ट्रे घेऊन त्यांच्या समोर प्रदर्शनाची बाहुली व्हायला नाही आवडतं. पण आता आत्याने पाठवलं स्थळ आहे म्हणून गेले समोर नाहीतर आत्याने बाबांना नाही तुलाच टार्गेट केलं असतं."
"असं काही नाही गं..चांगला शिकला सवरलेला आहे, दिसायलाही चांगला आहे, तुला शोभेल तसा आहे म्हणून आम्ही बोलावलं घरी."
" ठीक आहे ना! मी त्याबद्दल बोलले नाही आई पण माझ्या मैत्रिणी जसं म्हणतात की नवरा हा मुठीत पाहिजे तर खरचं तुला त्यांच म्हणणं पटलं का? "
" हे बघ... नंतर बोलू या विषयावर, पटकन आवर आणि जरा बाहेर जाऊन ये बर. थालीपीठ करणार आहे तुझ्या बाबांना दह्या शिवाय होत नाही. घेऊन ये लवकर जा पळ."
रागिणी उठली आणि बाबा घरी यायच्या आत दही घेऊन आली.
काही वेळातच बाबा पण घरी आले.बाबा आज एकदम आनंदात दिसत होते.
" अहो.. काय आज एकदम खुशीत! प्रमोशन झालं की काय?"
" हो तसेच समज."
" काय झालं बाबा? आई काय झालं गं?"
" थांबा..... सांगतो जरा आधी हातपाय धुऊन येतो आणि लगेच वाढायला घे, खुप भूक लागली आहे."
बाबा हातपाय धूवून येईपर्यंत आईने जेवण गरम केलं.
" जा रागिणी बॅग मध्ये मिठाईचा डब्बा आहे तो घेऊन ये बाळा."
" बाबा !! चक्क मिठाई!!!"
रागिणी धावतच गेली आणि मिठाईचा डब्बा आणला. मिठाई बाबांनी रागिनीला खाऊ घातली आणि दुसरी आईला खाऊ घातली. दोघींनी एकमेकींकडे बघितलं, दोघींच्या डोळयात प्रश्न दिसत होते.त्या प्रश्नाचं उत्तर फक्त बाबांकडे होते.
बाबा फक्त हसले...
का आणली असेल बाबांनी मिठाई? खरचं त्यांचं प्रमोशन झालं असेल का? की अजून काही असेल वाचुया पुढच्या भागात.
क्रमशः
©®कल्पना सावळे
क्रमशः
©®कल्पना सावळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा